(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); रस्ते सुरक्षेबाबत लोकप्रबोधनासाठी प्रसिद्धी माध्यमांची भूमिका महत्वाची - परिवहन आयुक्त शेखर चन्ने | मराठी १ नंबर बातम्या

रस्ते सुरक्षेबाबत लोकप्रबोधनासाठी प्रसिद्धी माध्यमांची भूमिका महत्वाची - परिवहन आयुक्त शेखर चन्ने

मुंबई ( ५ फेब्रुवारी २०१९ ) : राज्यात मागील वर्षी रस्ते अपघातात सुमारे १३ हजार मृत्यू झाले. आधीच्या वर्षीच्या तुलनेत हे मृत्यू ४ टक्क्यांनी अधिक आहेत. शिवाय यातील बहुतांश मृत्यू हे वाहतुकीचे नियम न पाळल्याने मानवी चुकांमुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर रस्ते सुरक्षेबाबत लोकप्रबोधन अत्यावश्यक असून याकामी प्रसिद्धी माध्यमांची भूमिका महत्वाची आहे. माध्यमांनी रस्ते सुरक्षेबाबत लोकशिक्षणाच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी आज येथे केले.

परिवहन आयुक्तालय, मुंबई प्रेस क्लब, राधी फाउंडेशन यांच्यामार्फत आज येथे पत्रकारांसाठी ‘रस्ते सुरक्षा आणि अपघातांचे वार्तांकन’ याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सी. पी. जोशी, पोलीस अधीक्षक (महामार्ग पोलीस) विजय पाटील, सहपरिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, राधी फाउंडेशनच्या संस्थापक संचालक डॉ. रिटा सावला, संचालक आसिफ रेशमवाला, मुंबई प्रेस क्लबचे चेअरमन धर्मेंद्र जोरे, सेक्रेटरी लता मिश्रा, उपप्रादेशिक परिवहन
अधिकारी संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. प्रकाश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

विकसनशील देशांमधील अपघाती मृत्यूंचे प्रमाण २०२० पर्यंत ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्धार केला आहे. आपल्या राज्यानेही तेच उद्द‍िष्ठ ठेवले आहे. या कामात रस्ते आणि वाहनांमधील अभियांत्रिकी सुधारणा, अंमलबजावणी याबरोबर लोकशिक्षण महत्वाचे आहे. रस्ते वाहतूक करताना घ्यावयाची काळजी, हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर, दारु पिऊन तसेच मोबाईलवर बोलताना वाहन न चालविणे आदीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. याकामी प्रसार माध्यमांनी योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी सहपरिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी केले.

अपघातांच्या बातम्या लिहिताना त्यात अपघाताच्या कारणांचा उल्लेख केल्यास ते रस्ते सुरक्षेबाबत जनजागृतीच्या दृष्टीने महत्वाचे ठरेल, असे यावेळी पोलीस अधीक्षक (महामार्ग पोलीस) विजय पाटील म्हणाले. एखादा अपघाती मृत्यू हेल्मेटच्या वापराअभावी किंवा वाहतुकीचे नियम न पाळल्याने झाल्यास
बातमीमध्ये त्याचा आवर्जून उल्लेख केल्यास इतर लोकांना त्यातून बोध मिळू शकेल, असे ते म्हणाले.

राधी फाउंडेशनच्या संस्थापक संचालक डॉ. रिटा सावला म्हणाल्या की, रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूमुळे जितके नुकसान होते त्यापेक्षा जास्त नुकसान रस्ते अपघातात लोक जखमी झाल्यामुळे होते. अनेक लोक कायमचे जायबंदी होतात. देशाच्या सक्षम मनुष्यबळाचे हे फार मोठे नुकसान असून रस्ते अपघातांमुळे
देशाच्या जीडीपीचेही मोठे नुकसान होते, असे त्यांनी नमूद केले.

कार्यशाळेत मुंबईतील विविध वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि रेडीओ वाहिन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget