(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा | मराठी १ नंबर बातम्या

प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

मुंबई ( २६ जानेवारी २०१९ ) : शेती आणि शेतकऱ्यांचा विकास केंद्रस्थानी ठेवून राज्य शासनाने उपग्रह व ड्रोनच्या सहाय्याने शेतीविषयक समस्या सोडविण्यासाठी ‘महाॲग्रीटेक’ उपक्रम सुरू केला आहे. शेती विकासासाठी महत्वपूर्ण ठरलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेला प्रधानमंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून स्वच्छ भारत अभियानात राज्याला पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. राज्यातील नागरिकांसाठी अनेकविध महत्वाकांक्षी योजना हाती घेऊन राज्याचा सर्वांगीण विकास साधला जात असल्याचे गौरवोद्‌गार राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे काढले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल बोलत होते. यावेळी विशेष निमंत्रित म्हणून मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंदकुमार जगन्नाथ सपत्निक उपस्थित होते. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई, मुंबई उपनगर पालकमंत्री तथा शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुख्य सचिव डी. के. जैन, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा प्रधान सचिव नंदकुमार, बृहन्मुंबई महानगर पालिका आयुक्त अजोय मेहता, मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ
अधिकारी, नौदल, तटरक्षक दल, पोलीस दल आदी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 प्रारंभी जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन राज्यपाल राव म्हणाले की, आपल्या संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या भव्य स्मारकाचे काम सुरू आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करण्याचे काम सुरू आहे.

शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, पायाभूत सुविधा आदी सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे. सन 2022 वर्षापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’अंतर्गत आतापर्यंत सुमारे 41 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण भागात 3 लाख घरे पूर्ण

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत 10.50 लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी नोंदणी केली असून 3 लाख घरे पूर्ण करण्यात आली आहेत. ‘2022 पर्यंत सर्वांना परवडणारी घरे’ हे ध्येय गाठण्यासाठी राज्य शासन
गतीने काम करित आहे.

भारतात होणाऱ्या एकूण थेट विदेशी गुंतवणुकीपैकी 30 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. 2025 वर्षापर्यंत महाराष्ट्र हे पहिले ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था असणारे राज्य बनेल, याची मला खात्री आहे.

जलद वाहतूक : गतीमान राज्य

सार्वजनिक वाहतूक सेवा जलद आणि आरामदायी होण्यासाठी, मुंबई, नागपूर आणि पुणे येथे सुमारे 350 किलोमीटर इतक्या लांबीचे मेट्रो रेल्वेमार्गाचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी
11.1 दशलक्ष इतक्या प्रवाशांना सेवा मिळणार आहे. हायब्रीड अॅन्युइटी मॉडेलअंतर्गत 10 हजार 500 किलोमीटर इतक्या लांबीच्या रस्त्यांच्या नूतनीकरणास मान्यता देण्यात आली असून त्यापैकी 8 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याशिवाय, ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजने’अंतर्गत ग्रामीण भागातील सुमारे 30 हजार किलोमीटर लांबीच्या ग्रामीण रस्त्यांची दर्जावाढ करण्यात येत आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामास प्रारंभ झाला आहे. शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ यापूर्वीच पूर्णपणे सुरु झाले आहे.

जलयुक्त शिवार : जल समृद्ध गावे

राज्याच्या गतीमान प्रगतीसाठी ‘विशेष उपाययोजना कार्यक्रम-2018’ अंतर्गत 22 हजार 122 कोटी रुपये इतक्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी 89 सिंचन प्रकल्पांवर 13 हजार 422 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार योजने’अंतर्गत 15 हजारहून अधिक गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली आहेत. ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत 5 हजार 270 जलाशयांमधून 3.23 कोटी घनमीटर इतका गाळ काढण्यात आला आहे. ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत सुमारे 1.37 लाख इतकी शेततळी बांधण्यात आली आहेत.

पीक विमा आणि मृदाआरोग्य

‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’अंतर्गत 52 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना 2 हजार 700 कोटी रुपये इतकी तर ‘पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजने’अंतर्गत 1 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना 565 कोटी रुपये इतकी नुकसानभरपाई देण्यात आली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना 77 लाखांहून अधिक मृदा आरोग्य पत्रिका देण्यात आल्या आहेत.

सामाजिक न्याय : पुरोगामीत्व जपले

सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता (एसईबीसी) आरक्षण विधेयक संमत केले आहे. या अधिनियमान्वये एसईबीसी प्रवर्गातील नागरिकांना शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण आणि सरकारी सेवेतील पदांवरील नियुक्त्यांकरिता आरक्षण देण्यात येईल. त्यामुळे मराठा समाजातील युवकांना शिक्षण व नोकऱ्यांद्वारे आपली प्रगती साध्य करण्यास निश्चितपणे मदत होणार आहे.

शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी ‘आंतरराष्ट्रीय शाळा’

ग्रामीण भागातील मुलांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी ‘महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ’ स्थापन केले आहे. ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा’ या नावाने पहिल्या टप्प्यात
राज्यात 13 शाळा सुरू झाल्या आहेत.

आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना’ राबविण्यात येत आहे. 1 लाख 59 हजार इतक्या गरोदर महिला आणि स्तनदा मातांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

‘खेलो इंडिया- महाराष्ट्र अग्रेसर’

पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘खेलो इंडिया युथ गेम्स’ मध्ये राज्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावत क्रीडा क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत 85 सुवर्ण, 62 रजत व 81 कांस्य अशी तब्बल 228
पदके मिळवीत महाराष्ट्र अग्रेसर राहिल्याचे गौरवोद्‌गार राज्यपालांनी काढले.

राज्यपाल पुढे म्हणाले की, ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना’ अंतर्गत राज्यातील सुमारे 2.27 कोटी कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. 83 लाख इतक्या अतिवंचित घटकातील कुटुंबांना ‘आयुष्यमान भारत’
योजनेचाही लाभ देण्यात येत आहे.

जनतेला सुरक्षित सायबर सेवा मिळावी, यासाठी राज्यात 44 सायबर प्रयोगशाळा व पोलीस ठाण्यांमार्फत एक सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येत आहे. राज्यात वृक्ष संवर्धन आणि लागवडीला चालना देण्यात येत असून
लोकसहभागातून 50 कोटी इतक्या वृक्षाची लागवड करण्यात येत आहे. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर आणि संगीतकार सुधीर फडके या महाराष्ट्राच्या प्रतिभाशाली सुपुत्रांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा एक भाग म्हणून राज्य शासन विविध कार्यक्रम आयोजित करीत आहे.

ग्रामीण स्वच्छ सर्वेक्षण- 2018 अंतर्गत, सातारा, नाशिक आणि सोलापूर या जिल्ह्यांनी देशातील 10 स्वच्छ जिल्ह्यांमध्ये विशेष स्थान प्राप्त केले आहे. राज्याला हागणदारीमुक्त घोषित करण्यात आले आहे. एक बलशाली, प्रगतीशील व सर्वसमावेशक असा नवीन महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण एकत्रित येऊ या, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यपालांच्या इंग्रजी भाषणाच्या मराठी अनुवादाचे वाचन केले.

यावेळी भारतीय नौदल, तटरक्षक दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, गोवा पोलीस, राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस,
मुंबई रेल्वे पोलीस दल, वाहतूक पोलीस दल, राज्य उत्पादन शुल्क, अग्निशमन दल, मनपा सुरक्षा दल, वन विभाग, सुरक्षा रक्षक मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना, सी कॅडेट कॉर्प्स, मुला-मुलींची रस्ते सुरक्षा पथके, विविध
शाळांमधील मुले आणि मुलींची भारत स्काऊट आणि गाईड्सची पथके यांच्यासह बृहन्मुंबई पोलीस दल, मुंबई रेल्वे पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल यांची बॅण्ड पथके, राज्य राखीव पोलीस बलाचे पाईप बँड पथक, वाहतूक पोलीस मोटार सायकल पथक आदी विविध दलांनी संचलन केले. याप्रसंगी नौदलाची क्षेपणास्त्रे, मुंबई पोलीस दलाची ‘रक्षक’, 'मार्क्समन' 'महारक्षक' बुलेटप्रूफ वाहने तसेच महिला सुरक्षा पथक व्हॅन, वरूण वॉटर कॅनन, मिनी फायर टेंडर, मुंबई फायर कंट्रोल पोस्ट, प्रशिक्षित श्वान पथक वाहन आदी वाहनेही संचलनात सहभागी झाली होती.

यावेळी एमएमआरडीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या प्रतिकृतीचा चित्ररथ, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, म्हाडा, महावितरण, कृषी विभाग, वनविभाग, रोजगार हमी योजना विभाग, आदिवासी विभाग, निवडणूक विभाग, सामाजिक न्याय विभागाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडित स्थळांचा विकास याबाबत माहितीचा, पर्यावरण विभाग आदी विविध विभागांच्या चित्ररथांचे सादरीकरण करण्यात आले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget