(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); सर्व पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करावी - अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे | मराठी १ नंबर बातम्या

सर्व पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करावी - अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे


मुंबई ( १८ फेब्रुवारी २०१९ ) : मतदारांना आपले नाव मतदार यादीत असल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी संकेतस्थळ, टोल फ्री हेल्पलाईन, एसएमएस सुविधा तसेच प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन मतदार यादीची पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मतदारांचे निवडणूक प्रक्रियेतील सहभाग हा लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असून त्यासाठी सर्व पात्र व्यक्तिंनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज केले.

भारत निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या मतदार माहिती व पडताळणी कार्यक्रमाची (वोटर व्हेरिफिकेशन ॲण्ड इन्फॉर्मेशन प्रोग्राम- व्हीव्हीआयपी) माहिती देण्यासाठी मंत्रालय पत्रकार कक्षामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. यावेळी उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड उपस्थित होते.

शिंदे यांनी यावेळी माहिती दिली की, लोकशाही प्रक्रियेमध्ये पारदर्शक, नि:पक्ष निवडणुकांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. सर्व पात्र मतदारांची मतदार नोंदणी होणे, नोंदणी झालेल्या मतदारांचा प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभाग आदी बाबींसाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून जनजागृती व काम सुरू आहे. युवक व महिला मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी मतदार नोंदणी करण्यास 1 जानेवारी 2019 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण झालेले नागरिक पात्र असणार आहेत.

आयोगाच्या सूचनेनुसार ‘व्हीव्हीआयपी’ कार्यक्रमांतर्गत सध्या मतदार असलेल्या आणि मतदार नसलेल्या परंतु, मतदार नोंदणीस पात्र असलेल्या व्यक्तींसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली. ते म्हणाले की, मतदार ओळखपत्र असले तरी मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘1950’ ही टोल फ्री हेल्प लाईन, www.nvsp.in आणि https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा तसेच प्रत्यक्षरित्या मतदार सुविधा केंद्राला भेट देऊन खात्री करता येईल. मतदार यादीत नाव नसल्यास मतदार नोंदणी करणे आवश्यक आहे.


‘1950’ ही टोल फ्री हेल्पलाईन
·  राज्यातील मतदारांनी कोणत्याही जिल्ह्यांतून ‘1950’ हा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक फिरवल्यास त्याला मतदार यादीतील त्याच्या नावाची पडताळणी करुन घेणे शक्य होणार आहे.
·  मतदारांना SMS द्वारेही मतदार यादीतील नावाचा शोध घेता येईल. त्यासाठी मतदाराने<EPIC><SPACE><EPIC NO>असा संदेश (SMS) 1950 वर पाठवावा.
संकेतस्थळाला भेट देऊन नावाची पडताळणी
मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceo.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ आणि राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल अर्थात www.nvsp.in वरही मतदार यादी उपलब्ध करुन देण्यात आली असून त्यावर आपल्या नावाचा शोध घेता येईल.

शिंदे यांनी माहिती दिली, एकाच मतदाराचे एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदार यादीत नाव असणे बेकायदेशीर असून एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंद असल्यास नमुना -7 भरुन इतर ठिकाणाहून आपले नाव वगळून घ्यावयाचे आहे. मतदार यादीतील आपल्या तपशिलामधील त्रुटींची दुरुस्ती करायची असल्यास नमुना- 8, विधानसभा मतदार संघांतर्गत मतदाराचा पत्ता बदलला असल्यास त्याने नमुना- 8अ किंवा इतर विधानसभा मतदार संघामध्ये स्थानांतर झाले असल्यास नमुना- 6 मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.

नवीन मतदार नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर नमुना-6 भरुन मतदार नोंदणी करता येईल. याशिवाय मुख्य निवडणूक अधिकारी किंवा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावरुन नमुना-6 डाऊनलोड करावा. हा नमुना भरुन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, वयाचा दाखला (18-21 वर्ष वयोगटासाठी) आणि रहिवासी दाखला ही कागदपत्रे मतदार नोंदणी अधिकारी (इआरओ) किंवा बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ)यांच्याकडे जमा केल्यासही मतदार नोंदणी केली जाईल.

राज्यात 8 कोटी 73 लाख 30, 484 मतदार

राज्यातील मतदारांची अंतिम यादी दिनांक 31 जानेवारी, 2019 रोजी प्रकाशित करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये एकूण 8 कोटी 73 लाख 30 हजार 484 इतके मतदार आहेत. त्यामध्ये 4 कोटी 57 लाख 2 हजार 579 पुरुष व 4 कोटी 16 लाख 25 हजार 819 स्त्रिया आणि 2 हजार 86 तृतीय लिंगी (थर्ड जेंडर) मतदारांचा समावेश आहे. गेल्यावर्षी एकूण मतदारांची संख्या 8 कोटी 48 लाख 96 हजार 357 इतकी होती. त्या तुलनेत यावर्षीच्या मतदार यादीमध्ये एकूण 24 लाख 34 हजार 127 इतक्या मतदारांची वाढ झाली आहे, अशी माहिती देखील शिंदे यांनी यावेळी दिली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget