(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पुणे मेट्रो प्रकल्पासाठी 2 हजार कोटींचा सामंजस्य करार | मराठी १ नंबर बातम्या

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी 2 हजार कोटींचा सामंजस्य करार

लवकरच युरोपियन बँकेबरोर 4 हजार कोटींचा करार होणार

नवी दिल्ली ( २८ जानेवारी २०१९ ) : पुणे मेट्रो प्रकल्पासाठी एएफडी फ्रांस बॅक आणि केंद्रसरकार यांच्यात आज दोन हजार कोटींचा करार झाला. लवकरच युरोपियन इनव्हेसमेंट बँकेसोबतही चार हजार कोटींचा करार होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.

येथील नॉर्थ ब्लॉक स्थित केंद्रीय आर्थिक विकास विभागाच्या कार्यालयात आज पुणे मेट्रोकरिता एएफडी फ्रांस बँक आणि भारत सरकार यांच्यामध्ये दोन हजार कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्ष-या झाल्या. फ्रांसचे भारतातील राजदूत अलेक्झेंडर झिजर, केंद्रीय मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे अतिरीक्त सचिव डॉ. सी. एस. मोहपात्रा यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. एएफडी फ्रांस बँकेच्या भारतातील उपसंचालक क्लेमेन व्हीडल डी ला ब्लँच, महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आणि पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमन्यम यावेळी उपस्थित होते.

2019 अखेर व्यावसायिक परिचलन तर 2020 मध्ये पहिली लाईन पूर्ण होणार

या कराराविषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत श्री दीक्षित म्हणाले, आजच्या करारामुळे पुणे मेट्रोकरिता दोन हजार कोटींचा निधी कर्ज रूपाने उपलब्ध झाला आहे. सद्य: मेट्रोचे 27 टक्के काम पूर्ण झाले असून या निधीच्या माध्यमातून कामाला गती येणार आहे. यावर्षाअखेर मेट्रोच्या व्यावसायिक परिचलनास सुरुवात करण्यासही याची मोठी मदत होणार आहे. तसेच वर्ष 2021 मध्ये पुणे मेट्रोची 16 कि. मी. ची पहिली लाईन पूर्ण करणे व 2021 पर्यंत मेट्राची दुसरी लाईन पूर्ण करण्याचे उद्दिष्टही गाठण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. एएफडी फ्रांस बँकेकडून 1.2 टक्के व्याजदराने हे कर्ज उपलब्ध झाले असून पुढील 20 वर्षात याची कर्जफेड करायची असल्याचे श्री. दीक्षित यांनी सांगितले.

युरोपियन बॅंकेबरोर चार हजार कोटींचा करार

युरोपियन इन्व्हेसमेंट बँकेकडून पुणे मेट्रोसाठी चार हजार कोटींचे कर्ज लवकरच उपलब्ध होणार आहे. यासदंर्भात काही मंजुऱ्या मिळाल्यानंतर येत्या तीन आठवड्यात सामंजस्य करार करण्यात येईल असे श्री. दीक्षित यांनी यावेळी सांगितले.

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी 11 हजार 400 कोटींचा खर्च

पुणे मेट्रोकरिता एकूण 11 हजार 400 कोटींचा खर्च येणार आहे. यासाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिका, पुणे महानगर पालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकार निधी उपलब्ध करित असून एएफडी फ्रांस बॅक आणि युरोपियन इन्व्हेसमेंट बँक यांच्याकडून एकूण सहा हजार कोटींचे कर्ज घेण्यात येत असल्याचे श्री. दीक्षित यांनी सांगितले.

मेट्रो स्टेशनवर झळकणार पुण्याची गौरवशाली संस्कृती व इतिहास

पुणे शहाराला असणारा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसाही मेट्रोच्या माध्यमातून दिसणार आहे. पुण्याची खास ओळख असलेल्या पुणेरी पगडीच्या आकारात ‘डेक्कन जिमखाना’ व ‘संभाजी पार्क मेट्रोस्टेशन’ तयार करण्यात येत आहेत. तसेच शहराला असणारा संगीताचा वैभवशाली इतिहासही विविध संगीत वाद्य व कलाकृतींच्या माध्यमातून दिसणार आहे. दापोडी, संत तुकाराम नगर आदी औद्योगिक भागातील मेट्रो स्टेशनवर शहराची औद्योगिक क्षेत्रातातील प्रगती दर्शविण्यात येणार आहे.

स्वारगेट येथे मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट हब

पुणे शहरातील स्वारगेट परिसरात वाहनांची मोठी वर्दळ असते. याच ठिकाणी असलेले राज्य रस्ते वाहतूक महामंडळाचे बस स्थानक, पुणे मनपा बस वाहतूक सेवेचे स्थानक व अन्य खाजगी वाहनांच्या गाड्याही असतात रस्त्याहून पादचाऱ्यांचीही गर्दी असते. याच भागात मेट्रो स्टेशन उभारण्यात येत आहे. येथील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता, पुणे मेट्रो प्रकल्पाच्यावतीने ‘मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट हब’ उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून पादचारी, रस्त्यावरील वाहतूक व मेट्रोची वर्दळ सुरळीत होणार असून प्रवासी व नागरिकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. पुणे मनपा, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने 18 एकर जमीन उपलब्ध करून दिल्याचे श्री . दीक्षित यांनी सांगितले.

सिव्हील कोर्ट असणार मेट्रोचे मध्यवर्ती स्टेशन : 30 माळयांचे स्टेशन

शहराच्या शिवाजी नगर परिसरातील सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशन हे पुणे मेट्रोचे मध्यवर्ती स्टेशन राहणार असून याठिकाणी मेट्रोच्या तीनही लाईन एकत्र येतील. हे 30 माळ्यांचे स्टेशन असणार आहे.

सर्व स्टेशनवर सौर उर्जा पॅनल

नागपूर मेट्रोतील यशस्वी प्रयोगानंतर आता महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने पुणे मेट्रो प्रकल्पातही सौर उर्जेच्या वापरावर पूर्ण भर दिला आहे. त्यानुसार प्रत्येक मेट्रो स्टेशन वर सौर ऊर्जा पॅनल बसविण्यात येणार आहेत. मेट्रो करिता लागणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी 65 टक्के वीज सौर ऊर्जेद्वारे निर्मित असणार केवळ प्रती युनीट दीड रूपयात ही वीज उपलब्ध होणार आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीची वास्तूरचना

पुणे मेट्रोच्या वास्तूरचनेसाठी खास आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम होत आहे. यासाठी फ्रांस आणि स्पेनचे वास्तु विशारद तसेच भारतातील नामांकीत वास्तुविशारद हफीज कॉन्ट्रॅक्टर पुणे मेट्रोच्या वास्तूरचनेची जबाबदारी सांभाळत आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget