(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); सुवर्ण पदक विजेत्यांना १ लाख, रौप्य विजेत्यांना ७५ हजार आणि कांस्य विजेत्यांना ५० हजाराचे पारितोषिक | मराठी १ नंबर बातम्या

सुवर्ण पदक विजेत्यांना १ लाख, रौप्य विजेत्यांना ७५ हजार आणि कांस्य विजेत्यांना ५० हजाराचे पारितोषिक

मुंबई ( ३१ जानेवारी २०१९ ) : केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित द्वितीय “खेलो इंडिया युथ गेम्स २०१९” मध्ये तब्बल २२७ पदके प्राप्त करून महाराष्ट्र राज्य देशात अव्वल ठरला आहे. खेळाडूंच्या गुणवत्ता उंचावण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्यावतीने सुवर्ण पदक विजेत्यांना एक लाख रूपये, रौप्य पदक विजेत्यांना ७५ हजार तर कांस्य पदक विजेत्यांना प्रत्येकी ५० हजार रूपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे, अशी घोषणा क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आज केली.

“खेलो इंडिया युथ गेम्स २०१९” नुकतेच यशस्विरित्या पुणे येथे पार पडले. राष्ट्रस्तरीय या गेम्समध्ये महाराष्ट्राला ८५ सुवर्ण, ६१ रौप्य आणि ८१ कांस्य असे पदके मिळविण्याचा मान मिळाला आहे. या खेळाडूंचा अभिनंदन सोहळा आज मुंबईत आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री. तावडे बोलत होते. या कार्यक्रमास अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, क्रीडा विभागाचे आयुक्त सुनील केंद्रेकर, उपसचिव राजेंद्र पवार आदींसह राज्यभरातून आलेले खेळाडूंचे प्रशिक्षक आणि पालकही उपस्थित होते.

राज्यातील उत्तोमोत्तम खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण आणि अर्थसहाय्य मिळावे यासाठी राज्य शासन नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगत श्री तावडे म्हणाले, या विजयानंतर खेळाडूंची जबाबदारी आणखीनच वाढली असून,सर्वांच्या अपेक्षाही खेळाडूंकडून वाढल्या आहेत. आगामी आशियाई आणि २०२८ मधील ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचा तिरंगा फडकवण्याचे ध्येय खेळाडूंनी आता बाळगावे, असे आवाहन श्री. तावडे यांनी केले.

शालेय शिक्षण घेत असताना या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा विद्यार्थ्यांचा विचार करून, राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य मुक्त मंडळ स्थापन केले असून, खेळांचा सराव करत असताना खेळाडूंना आपले शिक्षणही पूर्ण करता येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांनाही याचा लाभ घेता येणार आहे, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.

श्री. तावडे म्हणाले, भविष्यात खेळाडूंना अधिक प्रोत्साहन मिळावे आणि गुणवंत आणि उदयोन्मुख खेळाडू देशाला मिळाले यासाठी, तालुका स्तरावर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात पाच गुण, जिल्हास्तर, राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंना अनुक्रमे १०, १५, आणि २० गुण प्रदान करण्यात येणार आहेत. याचबरोबर, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंसाठी शासकीत सेवेत सामावून घेण्यासाठी पाच टक्के आरक्षण देण्यात येत आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर विजेत्या खेळाडूंना थेट शासकीय नोकरीत सामावून घेतले जाणार असल्याचेही श्री तावडे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी श्री. तावडे यांनी खेलो इंडिया मधील विजेते खेळाडू/प्रशिक्षक व पालकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. खेळाडूंच्या तसेच प्रशिक्षकांच्या समस्यांना सोडविण्यासंदर्भात शासन सकारात्मक भूमिका घेईल, असेही श्री. तावडे यांनी स्पष्ट केले.

केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने द्वितीय खेलो इंडिया युथ गेम्स, २०१९ चे शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे व मुंबई येथे ८ ते २० जानेवारी २०१९ या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशातून ७ हजार ५०० खेळाडू, १ हजार ५०० तांत्रिक अधिकारी व स्वयंसेवक, संयोजन समिती, वैद्यकीय व सुरक्षा इ. साठी सुमारे १ हजार अधिकारी व कर्मचारी सहभागी झालेले होते.

खेलो इंडिया युथ गेम्स क्रीडा बाबी- जिम्नॅस्टिक्स, वेटलिफ्टिंग, ज्युदो, कुस्ती, बॅडमिंटन, ॲथलेटिक्स, शुटींग, फुटबॉल, हॉकी, खो-खो, जलतरण, बॉक्सींग, कबड्डी, लॉन टेनिस, व्हॅालीबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस, आर्चरी अशा १८ खेळांच्या क्रीडा स्पर्धा १७ ते २१ वर्षाखालील मुले व मुलीसाठी आयोजित करण्यात आल्या होत्या.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget