(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन | मराठी १ नंबर बातम्या

ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई ( २२ मार्च २०१९ ) : महाराष्ट्राच्या मनामनात रुजलेले विख्यात संगीतकार आणि गायक सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांचे सन 2018-19 हे जन्मशताब्दी वर्ष आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने बाबुजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दि. 25 ते 29 मार्च 2019 या कालावधीत पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे त्यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र, पेंटिंग्ज, ऑडिओ-व्हिडिओ, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळयाचे उद्घाटन ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके व ज्येष्ठ गायक व लेखक आनंद माडगुळकर यांच्या हस्ते दि. 25 मार्च 2019 रोजी सायं.6.30 वाजता होणार आहे. सांस्कृतिक जगतातील मानबिंदू असलेल्या संगीतकाराचा सांगीतिक प्रवास या महोत्सवाच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. रविंद्र नाट्य मंदिराच्या कलांगण प्रांगणात दररोज संध्याकाळी 6 वाजल्यापासून सर्व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. दि. 25 मार्च 2019 रोजी ग.दि.माडगूळकर विरचित आणि सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या ʻगीतरामायणाचेʼ प्रख्यात संगीतकार श्रीधर फडके सादरीकरण करणार असून आनंद माडगूळकर निरुपण करणार आहेत. श्रीधर फडके व आनंद माडगुळकर या द्वयींचे गीतरामायण सादरीकरण ही मुंबईकरांसाठी मोठीच पर्वणी ठरणार आहे. दि.26 मार्च 2019 रोजी रघुलीला एंटरप्रायझेस,मुंबई निर्मित ʻशब्द सूर त्रिवेणीʼ, दि.27 मार्च रोजी कलाअर्पिता, पुणे निर्मित स्वयंवर झाले सीतेचेʼ ही नृत्य नाटिका, दि. 28 मार्च रोजी संवादसेतू,पुणे निर्मित इथेच टाका तंबूʼ या बाबुजी व गदिमांच्या स्वरयात्रेचा कार्यक्रम तसेच दि.29 मार्च रोजी षड्ज पंचम, मुंबई निर्मित ʻअशी पाखरे येतीʼ या सांस्कृतिक कार्यक्रमांची सर्व रसिक प्रेक्षकांना मेजवानी मिळणार आहे. दि. 26 मार्च रोजी सुधीर फडके निर्मित व संगीतबद्ध केलेल्या ʻवीर सावरकरʼ, दि.27 मार्च रोजी ʻजगाच्या पाठीवरʼ तसेच दि. 28 मार्च रोजी ʻमुंबईचा जावईʼ या चित्रपटांचा महोत्सव मिनी थिएटर, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अमादमी येथे रोज दु.3.30 वाजता होणार आहे.

या गानमहर्षींच्या जीवनावर आधारित दि.25 ते 29 मार्च या कालावधीत दुपारी.12 ते रात्रौ.8 वाजेपर्यंत आर्ट गॅलरी, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे चित्रांकित आलेख दर्शविणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन तसेच
याच कालावधीत कलांगण, रविंद्र नाट्य मंदिराचे प्रांगण येथे नामवंत लेखकांच्या दर्जेदार साहित्याचे प्रदर्शन या महोत्सवाच्या निमित्ताने मांडले जाणार आहे. जन्मशताब्दीच्या निमित्ताने बाबूजींच्या आठवणींना
पुन्हा एकदा उजळा मिळणार असल्याने कार्यक्रमासाठी व प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य आहे. रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालक स्वाती
काळे यांनी केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget