(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); गुरुवारी होणाऱ्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज | मराठी १ नंबर बातम्या

गुरुवारी होणाऱ्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

लोकसभा निवडणूक :

सुमारे 1400 मतदान केंद्रांचे होणार लाइव्ह वेबकास्ट

मुंबई ( १० एप्रिल २०१९ ) : राज्यात सात मतदार संघात उद्या गुरुवार दि. 11 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून मतदान केंद्रांसाठी नियुक्त केलेले कर्मचारी रवाना झाले आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण 116 उमेदवार असून 14 हजार 919 मतदान केंद्र आहेत. तर 1 कोटी 30 लाख 35 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यंदा पहिल्या टप्प्यातील सुमारे 1400 मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट होणार असून त्यामध्ये संवेदनशील मतदान केंद्रांचा देखील समावेश आहे. राज्यात सर्वाधिक 30 उमेदवार नागपूर मतदार संघात असून सर्वात कमी 5 उमेदवार गडचिरोली-चिमूर मतदार संघात आहे.

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदार संघामध्ये उद्या मतदान होणार आहे. त्यासाठी 44 हजार ईव्हीएम यंत्र (बॅलेट युनिट आणि सेंट्रल युनिट) आणि 20 हजार व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले आहेत. सुमारे 73 हजार 837 कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रात सखी मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे. गडचिरोली- चिमूर, गोंदिया या लोकसभा मतदार संघातील दुर्गम भागात असणाऱ्या आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी आणि अर्जुनी मोरगाव या विधानसभा मतदार संघात मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 अशी आहे.

यंदा सुमारे 10 टक्के मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्ट केले जाणार असून जिल्हा निवडणूक अधिकारी, राज्यस्तरावर मुख्य निवडणूक अधिकारी आणि केंद्रीय निवडणूक अधिकारी हे लाइव्ह वेबकास्ट पाहतील.

पहिल्या टप्प्यात मतदान होणारे मतदार संघ : वर्धा- 2026 मतदान केंद्र (एकूण मतदार 17 लाख 41 हजार). रामटेक - 2364 मतदान केंद्र (एकूण मतदार 19 लाख 21 हजार), नागपूर - 2065 मतदान केंद्र, (एकूण मतदार 21 लाख 60 हजार), भंडार-गोंदिया - 2184 मतदान केंद्र (एकूण मतदार 18 लाख 8 हजार), गडचिरोली-चिमूर - 1881 मतदान केंद्र (एकूण मतदार 15 लाख 80 हजार), चंद्रपूर - 2193 मतदान केंद्र (एकूण मतदार 19 लाख 8 हजार), यवतमाळ-वाशिम - 2206 मतदान केंद्र (एकूण मतदार 19 लाख 14 हजार)

15 पेक्षा जास्त उमेदवार तसेच मतदान यंत्रावरील ‘नोटा’ पर्याय यामुळे अशा मतदान केंद्रांवर 2 बॅलेट युनिट बसविण्यात येतात. त्यासोबत 1 कंट्रोल युनिट असते. पहिल्या टप्प्याकरिता 26 हजार बॅलेट युनिट आणि 18 हजार कंट्रोल युनिट देण्यात आले असून 20 हजार व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

मतदान करण्यासाठी मतदाराचे नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे. त्याशिवाय मतदान करता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या ओळखपत्राशिवाय अन्य अकरा प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेहएक ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

मतदानासाठी आवश्यक 11 दस्तावेज

मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल आणि मतदार यादीत नाव असेल तर अशा वेळी अन्य अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल. यामध्ये पासपोर्ट (पारपत्र), वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड यांचा समावेश आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget