ठाणे ( १७ एप्रिल २०१९ ) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून विविध पक्षाचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी प्रचाराला लागले आहेत व आपला उमेदवार निवडून आला पाहिजे, यासाठी आपली नोकरी व व्यवसाय सांभाळून प्रचारामध्ये सहभाग घेत आहेत. निवडणुकीचा प्रचार म्हणजे बाहेर फिरणे व खाणे आले तसेच सध्या महाराष्ट्रामध्ये उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून अंगाची लाही लाही होतेय. उन्हाळा हा बाहेर फिरण्यासाठी योग्य सीजन नसल्यामुळे प्रचारासाठी उतरलेल्या कार्यकर्त्याना विविध आजारांना सामोरे जावे लागेल अशी भीती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
उन्हाच्या तीव्रतेमुळे चक्कर येणं, उलट्या होणं, ताप येणं तसंच नाकातून रक्तस्राव होणं आदी विकार मुंबई व लगतच्या शहरांमध्ये वाढत आहेत. याविषयी अधिक माहिती देताना मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलच्या नाक कान घसा विकार तज्ञ डॉ नीपा वेलीमुट्टम सांगतात, " नाक कान व घसा विकारांची सर्वात जास्त लागण उन्हाळ्यामध्ये होते. बाहेरचे तापमान अती उष्ण असल्यामुळे नाकातील रक्तवाहिन्या प्रसरण पावल्यामुळे तेथील श्लेष्मल पदार्थ वितळून रक्तस्राव होतो. उन्हाळ्यातील कोरड्या हवेमुळे नाकाच्या अंतर्भागातील श्लेष्मल पदार्थ कोरडा व शुष्क बनतो व नाकात रक्तस्राव होण्याचा त्रास सुरु होतो.
उन्हाळ्यामध्ये आपण शीत पेये, बर्फ़ाचा गोळा, तसेच बाहेरील निंबू सरबत व विविध थंड पेये घेत असतो यामध्ये वापरात असलेल्या बर्फामध्ये जर कोलाय विषाणू असतील तर तुमच्या घशामध्ये जंतुसंसर्ग होण्याचा धोका निर्माण होतो.एप्रिल महिन्यातच आपल्याकडचे तापमान ४० ते ४५ अंश सेल्सिअसच्याही वर जाऊन पोहोचले असून नाक कान व घशाच्या आजारांमध्ये २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पाच पैकी तीन व्यक्ती तरी या दिवसांत हमखास सर्दीमुळे हैराण झालेल्या आहेत. वातावरणातल्या बदलाला, उष्णतेला शरीराने दिलेलं हे पहिलं उत्तर असतं. या दिवसांत जमिनीची धूप होत असल्याने बऱ्याचदा बाहेर धुळीचे प्रमाणही अधिक असते. परिणामी, ज्या लोकांना धुळीची ऍलर्जी असते, त्यांना सर्दी पटकन होते. ही सर्दी नाकात, श्वासनलिकेत, फुफ्फुसांत साठून राहते व श्वसनविकारांची सुरुवात होते."
वाढत्या उष्म्यामुळे या सीजनाला नागरिकांमध्ये मुतखड्याचा त्रासही वाढण्याची शक्यता वाढते याविषयी अधिक माहिती देताना निरामय हॉस्पिटलचे लॅप्रोस्कॉपीक शल्यचिकित्सक डॉ अमित थडानी सांगतात, " भारतात साधारणतः सत्तर लाख लाख पेशंट मुतखडा विकाराने ग्रस्त आहेत आणि साधारणपणे भारतीय लोकसंखेच्या ४/१००० रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज भासते. तापमान वाढीमुळे उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये मुतखडा होण्याची शक्यता जवळ जवळ चाळीस ते पन्नास टक्क्यांनी वाढते. पोलीस कर्मचारी, फेरीवाले, पोस्ट व कुरियर कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी, होम डिलिव्हरीची कामे करणारी अशा अनेकांना ४० ते ४५ डिग्री तापमानात वातावरणात काम करावे लागते व कामाच्या वेळापत्रकामुळे दिवसभरात पुरसे पाणी पिण्यास वेळ मिळत नाही, अशा व्यक्तींना मुतखडा होण्याची शक्यता सर्वाधिक असते.
उन्हाळ्यात घामावाटे आपल्या शरीरातून मोठ्या प्रमाणात पाण्याचे उत्सर्जन होते; मात्र तेवढ्या प्रमाणात पाणी आपल्या शरीरात जात नाही. या पाण्याच्या कमतरतेमुळे मूत्र संग्रहण होण्यास कारणीभूत ठरतो, ज्यामुळे मुतखडा होण्याचा धोका ३० टक्क्यांनी वाढतो. मुतखडा हा लघवी निर्माण करण्याच्या प्रक्रियेला बाधा निर्माण करतो त्यामुळे किडनीच्या स्वास्थावर विपरीत परिणाम होतो. प्रचाराला निघताना प्रत्येक नागरिकाने किमान एक लिटर पाण्याची बाटली सोबत घेणे महत्वाचे आहे."
टिप्पणी पोस्ट करा