(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विशेष लेख : अहिल्यादेवींना पुण्यश्लोक बनवणारे पाच महान गुण | मराठी १ नंबर बातम्या

विशेष लेख : अहिल्यादेवींना पुण्यश्लोक बनवणारे पाच महान गुण

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याजवळ लोकोत्तर ठरणारे अनेक महान गुण होते. त्या गुणांच्या जोरावर त्यांनी केवळ माळवा प्रांतातीलच नव्हे तर भारत वर्षातील जनतेच्या मनात अमीट ठसा उमटवला. सम्राट चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, छत्रपती शिवराय यांच्या परंपरेतील लोकराज्याचा वारसा अहिल्यादेवींनी पुढे नेला. अहिल्यादेवींना पुण्यश्लोक बनवणारे पाच महान गुण जागतिक अभ्यासकांनी अधोरेखित केले आहेत. ते महान गुण अहिल्यादेवींच्या चरित्रात दिसून येतात.

पहिला गुण-

आपण जे घडविले त्याचे प्राणपणाने रक्षण

अहिल्याबाई होळकरांचा जन्म ३१ ऑगस्ट १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडी या खेड्यात झाला. माणकोजी शिंदे-पाटील यांची अहिल्या नावाची ही मुलगी लहानपणापासूनच धाडसी होती. तसेच राज्यकर्त्यांना आवश्यक असणारे सर्व गुण तिच्याजवळ लहानपणापासूनच होते.

एकदा चोंडीगावात थोरले बाजीराव पेशवे यांच्या सैन्याचा तळ पडला होता. सीना नदीच्या काठी असलेल्या एका देवालयात दर्शनासाठी म्हणून छोटी अहिल्या आपल्या आईबरोबर गेली होती. तेथे नदीच्या वाळूत खेळताना अहिल्येने वाळूचे एक शिवलिंग बनविले. तेवढ्यात सैन्यदलातील एकाचा घोडा उधळला. उधळलेला घोडा आपल्याच दिशेने येत असल्याचे पाहून अहिल्याबरोबरच्या मैत्रिणी भिऊन पळून गेल्या. मात्र अहिल्या मुळीच डगमगली नाही. तिने आपण तयार केलेल्या शिवलिंगावर पालथे पडून त्या शिवलिंगाचे रक्षण केले.

तेवढ्यात पाठीमागून आलेल्या श्रीमंतांनी थोड्याशा जरबेच्या आवाजातच अहिल्येला म्हटले, पोरी तुला घोडय़ाने तुडवले असते तर? त्यावर अहिल्याबाई आपले डोळे श्रीमंतावर रोखत म्हणाली, हे शिवलिंग मी घडविले आहे व आपण जे घडविले आहे त्याचे प्राणपणाने रक्षण करावे असे थोरली माणसे सांगतात. मी तेच केले आहे. तिचे बाणेदार उत्तर ऐकूण श्रीमंत तर खूष झालेच परंतु त्यांच्याबरोबर असलेले सरदार मल्हारराव होळकर यांनी छोटय़ा अहिल्येला आपली सून करून घेण्याचे ठरविले. त्याप्रमाणे मल्हाररावांनी तिला आपली सून करून घेतली आणि अहिल्याबाईंनी देखील नंतर मल्हाररावांचा निर्णय सार्थ ठरविला व होळकर घराण्याची कीर्ती सर्वदूर पोहोचविली.

दुसरा गुण

प्रजासेवा ती देवपूजा

बळ, बुध्दी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो. अशी अहिल्यादेवी होळकर यांची धारणा होती. राजाने प्रजासेवा हीच देवपूजा मानवी या उदात्त विचारांनी त्यांनी राज्य केलं. त्यांच्या राज्यकारभारात याचे प्रतिबिंब ठायी ठायी दिसत

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या आग्रहावरून सती जाण्यापेक्षा जनहित महत्त्वाचे मानले. अहिल्यादेवी म्हणत ‘‘सती जाणे कोणत्या शास्त्रात नाही आणि सती गेल्याने कोणताही मोक्ष किंवा पुण्य मिळत नाही. अशा परंपरेची पद्धत बंद केली पाहीजे.’’ सती प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.

अहिल्यादेवींनी आपल्या होळकर शाहीत दत्तक वारसा मंजू्र करून लोकांच्या संसारात सुखाची लाट निर्माण केल. अहिल्यादेवींनी आपल्या राज्यातील लोकांना जाती किंवा धर्माच्या नावाखाली अस्पृश्यता पाळण्यावर बंदी घातली आणि सर्वांना समान शिकवण दिली. महात्मा फुले यांनी आपल्या शाळेचे नाव अहिल्या आश्रम ठेवले तर राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यसाठीच्या दवाखान्याला अहिल्या स्मरणार्थ दवाखाना असे नाव दिले.अशी ही थोर समाजसुधारक राणी होती.

तिसरा गुण

ममता आणि समता

अहिल्यादेवींनी जंगलतोडी कुऱ्हाडबंदी आणली.प्रत्येक घरातील माणसाच्या नावावर पाच झाडे असे गणित देऊन झाडे लावून घेतली.जे झाडे लावत नाहीत त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचा आदेश काढला. आपल्या स्वतःच्या मुलीचा आंतरजातीय विवाह करून स्वतःच्या घरापासून सुधारणेची सुरूवात केली. अहिल्यादेवींनी त्याकाळी हुंडा विरोधी कायदा करून हुंडा देणाऱ्या घेणाऱ्या व मध्यस्ती करणाऱ्यांवर दंड ठोठावला. परराज्याशी सलोख्याचे संबध रहावे म्हणून त्यांनी पंधरा राज्यात आपले वकील नेमले होते. इतर राज्यातील नऊ वकील होळकर राज्याच्या दरबारात होते. मातोश्री अहिल्यादेवींनी निर्माण केलेल्या प्रशासन व्यवस्थेत प्रजेची उन्नती व विकास, सामाजीक शांतता, सुव्यवस्था, समता व ममत्व,न्याय,स्वातंञ्य या मुलभूत मानवी मुल्यांचा प्रत्यक्ष आस्वाद त्या काळात जनता घेत होती. यापासून आजच्या प्रशासनाला खूप काही शिकण्यासारखे आहे.

चौथा गुण

लोकांची गाऱ्हाणी ऐकावी राजाने

इ.स. १७६५ मध्ये सत्तेसाठी झालेल्या एका लढाईदरम्यान लिहिलेल्या एका पत्रावरून मल्हाररावांचा अहिल्यादेवींच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता हे दिसून येते. "चंबळ पार करून ग्वाल्हेर येथे जावा. तेथे तुम्ही ४-५ दिवस मुकाम करू शकता.तुम्ही मोठे सैन्य ठेवू शकता व त्यांचे शस्त्रांसाठी योग्य तजवीज करा.....कूच करतांना,मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा."

पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर, अहिल्यादेवींनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली. त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्यादेवींच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. अहिल्यादेवी सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपऱ्यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत, असे म्हणतात.

पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने तिला विरोध केला होती त्यास चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून, अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. अहिल्यादेवींनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. जरी राज्याची राजधानी ही नर्मदातीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही, इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे, हे अहिल्यादेवींनीप केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले, हिंदू मंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून अनेक दाने दिली., माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या.

पाचवा गुण

देव, देश आणि धर्मासाठी सारे काही

भारतीय संस्कृती कोशात अहिल्यादेवी होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आहे-काशी, गया, सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी वगैरे. अहिल्यादेवींस, सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे. परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला होता, असे दिसते.

अहिल्यादेवींनी जनतेच्या/रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्यादेवींच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्यादेवींनी दत्तक विधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून, सन १९९६ मध्ये, इंदुरातील नागरिकांनी अहिल्यादेवींच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला. तो, दरवर्षी, जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला.त्यांच्या स्मरणार्थ, इंदूर विद्यापीठास अहिल्यादेवी होळकर असे नाव दिलेले आहे.

भिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद अहिल्यादेवीनी सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्या लोकांना पहाडातील निरुपयोगी जमीन दिली आणि त्यांना, त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा 'कर' घेण्याचा अधिकार दिला. याही बाबतीत, (आंग्ल लेखक) 'माल्कम' यांच्यानुसार, अहिल्यादेवींनी 'त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवले'.

महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संस्थाच होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंतफंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्यादेवींनी आश्रय दिला. कारागीर, मूर्तिकार व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणीपण सुरू केली.

एकोणीसाव्या व विसाव्या शतकातील, भारतीय, इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात, अहिल्यादेवी होळकरांस माळवा व महाराष्ट्रात, त्या काळी व आताही, संताचा सन्मान दिला जातो. इतिहासाच्या कोणाही अभ्यासकास ते मत खोडून काढण्याजोगे आजवर काहीही सापडलेले नाही. या पाच महान गुणांशिवाय अहिल्यादेवी यांच्याजवळ असंख्य गुण होते. त्यामुळे त्यांचं जीवन तत्वज्ञानी राणी म्हणून ख्यातकीर्त झालं. पण ढोबळमानाने पाच महान गुण या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्या गुणांचा आजही अभ्यास होत आहे. कोणत्याही काळात राज्यकर्त्यांना या गुणांपासून प्रेरणा मिळेल अशी मला खात्री वाटते.

अहिल्यादेवी यांच्या लोकोत्तर प्रेरणांचा जागर करत त्यांना अभिवादन, वंदन करण्यासाठी 31 मे रोजी जयंती महोत्सव समिती सालाबादप्रमाणे लोकोत्सव साजरा करणार आहे. या लोकोत्सवात आपण सर्वजण सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो.

- प्रा. राम शिंदे

जलसंधारण आणि ओबीसी कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget