(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून पाणी टंचाई निवारणासाठी प्रयत्न करावेत | मराठी १ नंबर बातम्या

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून पाणी टंचाई निवारणासाठी प्रयत्न करावेत

अमरावती जिल्हा दुष्काळ आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई ( १३ मे २०१९ ) : अमरावती जिल्ह्यात ज्या भागात पाणीटंचाई आहे तेथे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तहसीलदार यांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज 'ऑडीओ ब्रीज सिस्टम'द्वारे अमरावती जिल्ह्यातील सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. गावागावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या अडचणी समजून घेतल्या. या संवादात जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचाही सहभाग होता. जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, मोर्शी, अचलपूर, वरूड, चिखलदरा तालुक्यातील सरपंचांशी त्यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, रोजगार हमी योजनेतून 28 प्रकारची लोकोपयोगी कामे करता येतील. त्यामुळे गावात लोकांना रोजगार देखील मिळू शकेल. पाणी पुरवठ्याच्या योजना असलेल्या विहीरींवर वीज जोडणी आहे याची खात्री करावी. जेथे नाही तेथे तत्काळ उपलब्ध करून द्यावी. काही गावात जलकुंभ जुने झाल्याची तक्रार सरपंचांनी केली तेथे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यक्तीश: लक्ष घालून त्यांच्या दुरूस्तीची कामे करून घ्यावीत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीस मुख्य सचिव अजोय मेहता, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, पदूम विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, जलसंधारण आणि रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंह, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अमरावती जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना

अमरावती जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. त्यापैकी मोर्शी, अंजनगाव सुर्जी , चिखलदरा, अचलपूर, वरुड या पाच तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.

● अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यांपैकी 5 तालुक्यांमध्ये 21 गावे व 21 वाड्या-वस्त्यांमध्ये एकूण 20 टँकर सुरु आहेत. त्यामध्ये चिखलदरा-8, चांदूर रेल्वे-6, मोर्शी- 3, अमरावती- 2, अंजनगाव- 1 असे एकूण- 20 टॅंकर्स सुरू आहेत.

● पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ अमरावती जिल्ह्यात 182 विंधन विहिरीद्वारे, 8 नळपाणी पुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करुन 7 तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. 120 विहिरींचे अधिग्रहण करुन पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याची दक्षता घेण्यात आली आहे.

● पिण्याच्या पाण्याच्या नळपाणी पुरवठा योजनांची 4.24 कोटी रुपये विद्युत देयकांची रक्कम महावितरण कंपनीस देण्यात आलेली आहे. सर्व नळपाणी पुरवठांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

● अमरावती जिल्ह्यात सध्या एकही शासकीय चारा छावण्या सुरु नाही.

● अमरावती जिल्ह्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 5 तालुक्यातील 775 गावातील 1 लाख 99 हजार 227 शेतकऱ्यांना रु.183.26 कोटी इतकी रक्कम वाटप करण्यात आलेली आहे.

● अमरावती जिल्ह्यातील एकूण 1 लाख 38 हजार 752 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेंतर्गत नोंदणी केली होती. सदर हंगामात नुकसान भरपाईपोटी रु. 6.65 कोटी अदा करण्यात येणार असून संपूर्ण रु. 6.60 कोटी इतकी रक्कम 7 हजार 666 शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.

● प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यातील 1.76 लक्ष शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी 35 हजार शेतकऱ्यांना रु. 2000/- प्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी एकूण रुपये 7 कोटी इतके अर्थसहाय्य देण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु आहे.

● महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यात 3 हजार 426 कामे सुरु असून त्यावर 35 हजार 359 मजूर उपस्थिती आहे. जिल्ह्यामध्ये 38 हजार 017 कामे शेल्फवर आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget