(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); जुन्या नळपाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी विशेष प्रयत्न करावेत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मराठी १ नंबर बातम्या

जुन्या नळपाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी विशेष प्रयत्न करावेत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई ( १४ मे २०१९ ) : ‘आमच्या गावाला टँकरच्या अधिक फेऱ्यांची आवश्यकता आहे’... ‘जनावरांसाठीही टॅंकरने पाणी मिळावे’...‘गावची पाणीपुरवठा योजना जुनी झाल्याने नवीन योजना मिळावी’... अशा अनेक मागण्या आणि त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला संवेदनशीलपणे तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश असे स्वरुप होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिंगोली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील सरपंचांशी साधलेल्या ऑडिओ ब्रीजचे अर्थात संवाद सेतूचे!

फडणवीस यांनी आज ऑडिओ ब्रीजच्या प्रणालीद्वारे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, कळमनुरी व हिंगोली या दुष्काळी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. सरपंचाच्या मागण्यांवर तत्काळ कार्यवाहीचे निर्देश देऊन दुष्काळी जनतेला दिलासा दिला.

सरपंचांनी केलेल्या टँकर, विंधण विहिरी, नळपाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, चारा छावण्या आदींबाबत मागण्या व तक्रारींची तसेच जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या व्हाट्सॲप क्रमांकावर येणाऱ्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी व त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला यावेळी दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हिंगोली तालुक्यातील अनिता टेकाळे, अरुणाबाई अडसूळ, शांताबाई शेळके, प्रल्हाद पठाडे, रंजनाबाई घुगे, पंढरी मुंडे, सेनगाव तालुक्यातील कोकाटे, बी.जी. राठोड, आर. बी. साठे, एस.एस. वाघ, सोनाली राठोड, छत्रपती गडदे, बी. एम. मुळे, आर. व्ही. खंदारे, कळमनुरी तालुक्यातील पी. एस. शिरडे, एस. जी. शिंदे, टी. एस. रंधवे यांच्यासह इतर सरपंचांशी मोबाईलवरून संपर्क साधला.

जुन्या नळपाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी विशेष प्रयत्न करावेत

जुन्या झालेल्या नळपाणी पुरवठा योजना सुव्यवस्थित कार्यान्वित व्हाव्यात यासाठी विशेष दुरुस्ती अंतर्गत पाईपलाईन बदलणे अथवा नवीन पाईपलाईन करण्याबाबत प्रशासनाने प्रयत्न करावा. आवश्यकतेप्रमाणे टँकर सुरू करणे, विंधण विहिरी घेणे आदी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज दिले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी सध्याची स्थिती पाहून चारा छावणी, टँकर पुरवठा, नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती आदी तातडीच्या उपायांवर भर द्यावा. त्याचबरोबर ज्या गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना नाहीत, अशा ठिकाणी या योजना सुरू करण्यासंदर्भातील अहवाल तयार करावे. राष्ट्रीय पेयजल योजना तसेच मुख्यमंत्री पेयजल योजनेची कामे लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने कामांना गती द्यावी. टँकरची मागणी असल्यास पाहणी करून तहसीलदारांनी तत्काळ प्रस्ताव मंजूर करावेत. जनावरांची संख्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे टँकरच्या संख्येत वाढ करावी. नवीन विंधण विहिरींची मागणीच्या प्रकरणात असल्यास भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या अहवालाप्रमाणे कार्यवाही करावी.

टँकरच्या फेऱ्यांचे प्रमाण योग्य राखण्यासह सर्वांना प्रमाणशीर पाणीपुरवठा होईल याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, असे निर्देश देऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दुष्काळी परिस्थितीमध्ये प्रशासनाने संवेदनशीलपणे काम करणे अपेक्षित असून लोकांशी सतत संवाद साधावा. जनतेच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय पेयजल योजना आणि मुख्यमंत्री पेयजल योजनेतून मंजूर पाणीपुरवठा योजनांना निधीची अजिबात कमतरता नाही. राष्ट्रीय पेयजल योजनेत निवड न झालेल्या गावांचा आणि पाणीपुरवठा योजना नसलेल्या गावांचा समावेश मुख्यमंत्री पेयजल योजनेत व्हावा यासाठी प्रस्ताव सादर करावेत.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जिल्हयात 645 कामे सुरू असून त्यावर 6 हजार 985 इजके मजूर उपस्थित आहेत. जिल्हयामध्ये 5 हजार 96 कामे शेल्फवर आहेत. निधीची कमतरता नसून 15 दिवसांच्या आत रक्कम दिली जाते. मजुरीची रक्कम वेळेत दिली जाईल याबाबत प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजेनिंबाळकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते.

हिंगोली जिल्ह्यातील टंचाई निवारण विषयक माहिती :

· ‍हिंगोली जिल्ह्यात सेनगांव, कळमनुरी, हिंगोली या 3 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला असून या 3 तालुक्यातील गावांची संख्या 433 आहे. हिंगोली तालुक्यात 17, सेनगांवमध्ये 14 तर कळमनुरी तालुक्यात 11 टँकर सुरु आहेत. जिल्ह्यात आज अखेर 415 विहिरींचे व बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

· नळ पाणी पुरवठा योजनांची 1 कोटी 19 लाख रुपये इतकी विद्युत देयकांची रक्कम महावितरण कंपनीस देऊन सर्व नळ पाणी पुरवठांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

· ‍दुष्काळ घोषित केलेल्या 3 तालुक्यातील 433 गावातील 1 लाख 13 हजार 869 शेतकऱ्यांना 121 कोटी 42 लाख रुपये इतकी रक्कम वाटप करण्यात आलेली आहे.

· ‍हिंगोली जिल्ह्यातील एकूण 2 लाख 59 हजार 833 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेतंर्गत नोंदणी केली होती. आज अखेर 7 कोटी 30 लाख रुपये इतकी रक्कम 18 हजार 487 इतक्या पात्र शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.

· प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत जिल्ह्यातील 1 लाख 43 हजार शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. आतापर्यंत 5 कोटी रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget