(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); दुष्काळी उपाययोजनांचा दिलासा देणारा मुख्यमंत्र्यांचा 'संवादसेतू' | मराठी १ नंबर बातम्या

दुष्काळी उपाययोजनांचा दिलासा देणारा मुख्यमंत्र्यांचा 'संवादसेतू'

'ऑडीओ ब्रीज' तंत्रज्ञानाने मुख्यमंत्र्यांसह सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा आणि राज्य प्रशासन एकाचवेळी होते कनेक्ट

मुंबई ( १० मे २०१९ ) : ''नमस्कार मी देवेंद्र फडणवीस बोलतोय..दुष्काळाबाबत आपल्या समस्यांवर तातडीच्या उपाय योजना करण्यासाठी आपणाशी संवाद साधत आहे''...गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील सरपंचांच्या भ्रमणध्वनीवर हा आवाज कानी पडत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकप्रतिनीधी, जिल्हा प्रशासन आणि राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकाचवेळी 'कनेक्ट' करणारा 'संवादसेतू' सध्या दुष्काळावरील उपाय योजनांसाठी ग्रामस्थांना दिलासा देत आहेत.

बुधवारपासून मुख्यमंत्री दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील सरपंच, जिल्हा प्रशासनातले अधिकारी आणि राज्य प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत विविध समस्या जाणून घेत आहेत. आतापर्यंत औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, बीड, परभणी, अहमदनगर, सोलापूर, नाशिक या जिल्ह्यांशी संवाद साधला आहे. आतापर्यंत सुमारे 300 च्या आसपास सरपंचांशी थेट संवाद मुख्यमंत्र्यांनी साधला आहे. विशेष म्हणजे आज झालेल्या संवाद सत्रात अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक 53 सरपंचांशी संवाद साधण्यात आला.

प्रथमच 'ऑडीओ ब्रीज' (कॉन्फरन्स कॉलच्या धर्तीवर) तंत्रज्ञानाचा वापर करीत मोबाईलच्या माध्यमातून सरपंच, ग्रामसेवक आणि मुख्यमंत्री यांचा संवाद एकाच वेळी त्या संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऐकत असतात. सरपंच आपल्या गावातील पाणी टंचाई, गुरांसाठी छावण्या, पाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती, टॅंकर्सची मागणी, रोहयोची कामे आदीबाबत मागण्या करीत असताना जिल्हा प्रशासन देखील त्या बाबींची नोंद घेत असते. सरपंचांचे म्हणणे ऐकल्यावर त्याचवेळी मुख्यमंत्री जिल्हा प्रशासनाला योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देत असतात.

जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार या सर्वांना एकाचवेळी निर्देश देण्यासाठी ही अनोखी पद्धत मुख्यमंत्र्यांनी सुरू केल्याने दुष्काळी भागातील जनतेला दिलासा देण्याचे काम करीत आहे.

प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील किमान पाच ते सहा सरपंचांशी मुख्यमंत्री संवाद साधतात आणि त्याचवेळी संबंधित गावाच्या समस्येवर तातडीने उपाययोजना सूचवित प्रशासनाला कालबद्ध कार्यवाहीचे निर्देशही देतात. राज्य प्रशासनात प्रथमच अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करीत ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी 'संवादसेतू' महत्वाची भूमिका बजावताना दिसून येत आहे. सर्वच सरंपचांना मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणे शक्य होत नाही अशावेळी मुख्यमंत्री या संवाद सत्राच्या शेवटी एक व्हाटस्अप क्रमांक देतात आणि त्यावर केवळ दुष्काळाशी संबंधीत समस्या पाठविण्याचे आवाहन करतात. या समस्यांवर 48 तासांत कार्यवाही करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र व्हाटसअप क्रमांक देण्यात येत आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget