मुख्यमंत्र्यांचा बुलडाणा जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद
मुंबई ( ११ मे २०१९ ) : राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता अनेक गावांमधील पाणीपुरवठा योजनांची विद्युत देयके राज्य शासनाने अदा केली आहेत. वीज पुरवठ्याअभावी कोणत्याही गावातील पाणीपुरवठा योजना बंद पडता कामा नये, याची दक्षता जिल्हाधिकाऱ्यांनी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज 'ऑडीओ ब्रीज सिस्टम'द्वारे बुलडाणा जिल्ह्यातील सुमारे 50 सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली, तसेच गावागावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या अडचणी समजून घेतल्या. या संवादात जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचाही सहभाग होता.
मुख्यमंत्री म्हणाले, बुलडाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने टंचाईसंदर्भातील कोणत्याही प्रस्तावावर विनाविलंब निर्णय घ्यावा. प्रशासन आणि नागरिकांच्या एकत्रित सहभागातून या परिस्थितीवर निश्चित मात केली जाईल. त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. तहसीलदारांनी गावातील 2018 ची लोकसंख्या आणि जनावरांची संख्या विचारात घेऊन अतिरिक्त टँकरची मागणी पडताळून पहावी व त्याप्रमाणे टँकरद्वारे पाणीपुरवठा होईल याची दक्षता घ्यावी. दुष्काळी कामांना आचारसंहिता लागू नाही, निवडणूक आयोगाने दुष्काळी कामे करण्यास मान्यता दिली आहे, त्यामुळे आचारसंहितेचे कारण देऊन दुष्काळावरील उपाययोजनांची कामे प्रलंबित ठेऊ नयेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांना अधिग्रहणाचे पैसे तत्काळ द्यावेत
बुलडाणा जिल्ह्यातील सरपंचांनी त्यांच्या भागातील विहिरी अधिग्रहित झालेल्या शेतकऱ्यांना अधिग्रहणाचे पैसे तत्काळ दिले जावेत असा मुद्दा मांडला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तत्काळ कार्यवाही करावी आणि त्याचा अहवाल सादर करावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. मोताळा तालुक्यातील एका सरपंचांनी त्यांच्या भागातील रखडलेली 14गावांची पाणीपुरवठा योजना पूर्ण करावी, अशी मागणी केली. त्याची दखल घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने यात लक्ष घालून योजना गतीने पूर्ण करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.
जुन्या पाईपलाईन बदलून द्याव्यात
बुलडाणा तालुक्यातील एका सरपंचांनी त्यांच्या गावातील पाणीपुरवठा योजनेची पाईपलाइन जुनी झाल्याने ती बदलावी, अशी मागणी केली. याची दखल घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि जिल्हा प्रशासनाने याबाबत आवश्यकतेनुसार कार्यवाही करण्याची सूचना केली. बुलडाणा तालुक्यातील एका सरपंचांनी त्यांच्या गावात मार्चपासूनच पाणीटंचाई असते, त्यामुळे येळगाव धरणातून पाणी मिळावे, अशी मागणी केली. गावाला सध्या टँकरने पाणी सुरू करण्याच्या तसेच येळगाव धरणातून पाणीपुरवठा करण्याच्या मुद्याचा धोरणात्मक निर्णयात सकारात्मक विचार करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
देऊळगाव राजा तालुक्यातील एका सरपंचांने 4 किमी पाईपलाईनची दुरुस्ती करुन मिळावी, अशी मागणी केली. याचीही दखल घेत विशेष दुरुस्तीमधून हे काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. शेगांव तालुक्यातील एका सरपंचांनी त्यांच्या गावात आजपर्यंत एकही पाणीपुरवठा योजना झाली नसल्याचा मुद्दा मांडला. त्याची दखल घेत या गावासाठी योजना देण्याच्या सूचना एमजेपी तसेच जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या.
यावेळी मुख्य सचिव यू.पी.एस. मदान, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, पदुम विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंह, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर उपस्थित होते.
बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी केलेल्या उपाययोजना
• जिल्ह्यातील 13 पैकी 12 तालुक्यांमध्ये टँकर सुरू. यामध्ये खामगाव 29, देऊळगावराजा 28, बुलडाणा 24, शेगाव 22, सिंदखेडराजा 20, नांदुरा 19, मोताळा 18, चिखली 15,मेहकर 14, लोणार 11, मलकापूर 5 तर संग्रामपूर 1. एकूण टँकर संख्या 206.
• पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ जिल्ह्यात 174 विंधन विहिरी, 29 नळ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती, दोन तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित. जिल्ह्यात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी 673 विहिरींचे अधिग्रहण.
• पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणीपुरवठा योजनांची 2.76 कोटी रुपये इतकी विद्युत देयकांची रक्कम महावितरण कंपनीस देण्यात आली आहे. सर्व नळ पाणीपुरवठा योजनांचा विद्युतपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
• बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळ घोषित केलेल्या आठ तालुक्यातील 834 गावांतील 2 लाख 81 हजार 931 शेतकऱ्यांना रुपये 160.52 कोटी इतकी रक्कम वाटप करण्यात आली.
• बुलडाणा जिल्ह्यातील एकूण चार लाख 46 हजार 295 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेंतर्गत नोंदणी केली होती. या हंगामात नुकसान भरपाईपोटी 52.35 कोटी रुपये अदा करण्यात येणार असून त्यापैकी 31.75 कोटी रुपये रक्कम 38 हजार 177 शेतकऱ्यांना अदा करण्यात आली.
• प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील 2.18 लाख शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी 76 हजार शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांप्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी एकूण 15.20 कोटी रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात आले. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरू.
• महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात 1 हजार 066 कामे सुरू असून त्यावर 6 हजार 765 मजूर उपस्थिती आहे. जिल्ह्यात 11 हजार 781 कामे शेल्फवर आहेत.
टिप्पणी पोस्ट करा