(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे | मराठी १ नंबर बातम्या

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे

मुंबई ( ३० मे २०१९ ) : नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टर डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

जातीवरून पायल यांचा छळ करण्यात आल्याचा आरोप आहे. डॉ. तडवी आत्महत्या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली होती. तसेच या प्रकरणाची चौकशी अनुसूचित जाती-जमाती आयोगानेही सुरू केली. या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

डॉ. पायलच्या शरीरावर जखमा असल्याने ही आत्महत्या नसून हत्या आहे. त्यामुळे आरोपींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी डॉ. पायलचे वकील नितीन सातपुते यांनी बुधवारी केली होती.

जळगावच्या असलेल्या पायलने (२३) बुधवारी सायंकाळी नायरच्या वसतिगृहातच गळफास लावून घेतला. तीन महिला डॉक्टरच्या छळाला कंटाळून पायल हिने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहे.

३१ मेपर्यंत पोलिस कोठडी
डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्येप्रकरणी मंगळवारी संध्याकाळी डॉ. भक्ती मेहर हिला पोलिसांनी फोर्ट परिसरातून अटक केली. त्यानंतर मंगळवारी रात्री डॉ. हेमा आहुजा हिला अंधेरी येथून, तर डॉ. अंकिता खंडेलवाल हिला बुधवारी पहाटे पुण्याच्या हिंजवडी परिसरातून अटक केली. या तिघींना बुधवारी सत्र न्यायालयाने ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. विशेष म्हणजे अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात पोहोचण्याआधीच पोलिसांनी या तिघींना बेड्या ठोकल्या.

चांगले गुण मिळाल्यामुळे अनुसुचित जातीच्या आरक्षित जागेवर निवड

पायलने सांगलीच्या मिरज येथील मेडिकल कॉलेजातून एमबीबीएसचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी तिने मुंबईच्या नायर मोडिकल कॉलेजात प्रवेश घेतला होता. ती स्त्रीरोगतज्ज्ञ पदव्युत्तर पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. बारावी तसेच 'नीट'मध्ये चांगले गुण मिळाल्यामुळे पायलची अनुसुचित जातीच्या आरक्षित जागेवर निवड झाली होती.

जातीवरून पायल यांचा छळ

चांगले गुण मिळाल्यामुळे पायलची अनुसुचित जातीच्या आरक्षित जागेवर निवड झाली होती. यावरूनच या तीन वरिष्ठ महिला डॉक्टर तिला वारंवार हिणवत होत्या. त्या तिच्याकडून अनेक कामे करून घेत होत्या. याबाबत कूपर रुग्णालयात सहायक प्राध्यापक असलेले आपले पती आणि आई यांना ती या छळाबाबत वेळोवेळी कल्पना देत होती.

तिन्ही आरोपी डॉक्टरांचा परवाना रद्द करावा
आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी विविध सामाजिक संघटना आंदोलन करीत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी बुधवारी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे रजिस्ट्रार अजय देशमुख यांची भेट घेऊन तिन्ही आरोपी डॉक्टरांचा परवाना रद्द करावा, अशी मागणी केली. मागणी मान्य न केल्यास मनविसेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget