मुंबई ( २६ जून २०१९ ) : मराठा समाजाचा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गामध्ये (एस.ई.बी.सी.) समावेश करण्यात आला आहे. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्याकरिता पूरेशी यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या एस.ई.बी.सी. प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी संबंधित जात पडताळणी समितीकडे जात पडताळणीसाठी अर्ज दाखल केला आहे अशा विद्यार्थ्यास प्रवेशाच्या वेळी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती करण्यात येणार नाही, अशी माहिती निवेदनाद्वारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषद व विधानसभेत दिली. तावडे म्हणाले, व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, वि.जा.भ.ज., इ.मा.व. व विशेष मागास प्रवर्ग या सर्व प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांकडे अर्ज दाखल करते वेळी जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, अशा विद्यार्थ्यास प्रवेशाची दुसरी फेरी सुरु होण्यापूर्वी प्रवेश नियामक प्राधिकरण निश्चित करेल अशा दिनांकापर्यंत जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्याची मुदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या बाबत संबंधित विभागाकडून आदेश निर्गमित करण्यात येत असल्याची माहिती तावडे यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा