(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मुख्यमंत्र्यांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा पावसाळ्यात आपत्ती घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मराठी १ नंबर बातम्या

मुख्यमंत्र्यांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा पावसाळ्यात आपत्ती घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई (१ जून २०१९ ) :  पावसाळ्यात पूर, इमारत पडणे, पाणी साचणे अशा घटना घडू नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे. तसेच आपत्कालीन नियंत्रण कक्षात मनुष्यबळाने सतर्क राहून सर्व संपर्क क्रमांक सुरू असतील, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या राज्यस्तरीय मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह विविध विभागाचे सचिव, तीनही सैन्य दलाचे अधिकारी, तटरक्षक दलाचे अधिकारी, राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दल, सर्व विभागीय आयुक्त, विविध महानगरपालिकांचे आयुक्त तसेच केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पावसाळ्यातील तयारीसंदर्भात सर्व यंत्रणांनी चांगली तयारी केली आहे. या काळात पुनर्वसन व योग्य तयारी केल्यास संभाव्य आपत्ती टाळू शकतो. मागील काही वर्षात सर्व यंत्रणांनी पावसाळ्यात चांगल्या प्रकारे काम केले आहे. त्या अनुभवावरून पुढील काळात आणखी चांगले काम करता येईल. मात्र, त्यावरच अवलंबून न राहता, संस्थागत ज्ञान, अनुभव व दूरदृष्टी ठेवून योग्य तयारी केल्यास आपत्ती टाळता येईल.

या काळात मुंबई बरोबरच नागपूर, नाशिक, पुणे आदी शहरांमधील पूर परिस्थिती, धोकादायक इमारती आदींवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. शहरांमध्ये पावसाचे पाणी साचू नये, तसेच पावसामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी कमांड व कंट्रोल रुमच्या माध्यमातून सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात यावे. मुंबईमधील धोकादायक व नादुरुस्त रेल्वे पूल, इमारती याबद्दल महानगरपालिका व रेल्वे विभागाने समन्वयाने निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

आपत्ती निवारण दलाच्या पथकाने सतर्क रहावे. तसेच आपत्ती काळात वापरण्यात येणारी यंत्रे, साधने ही सुस्थितीत असतील याची काळजी घ्यावी. तसेच आपत्ती घडल्यानंतर त्या ठिकाणी कमीत कमी वेळेत मदत पोहचावी यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. आपत्ती प्रतिसाद केंद्रातील संपर्क यंत्रणा चोवीस तास सतर्क राहतील व त्या ठिकाणी कर्मचारी उपस्थित असतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

मदत व पुनर्वसन मंत्री पाटील म्हणाले, राज्यातील विविध विभागानी पावसाळ्यात घडणाऱ्या आपत्ती निवारणासाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. तसेच या तयारीची माहितीही नागरिकांपर्यंत पोहचवावी. या काळात यंत्रणांनी सतर्क रहावे. मंत्रालयातील नियंत्रण कक्षही अद्ययावत करावा.

मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी राज्य शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या आपत्त्कालीन नियंत्रण कक्षाची माहिती दिली. भारतीय हवामान खात्याचे के. एस. होसळीकर यांनी राज्यातील मोसमी पावसाचा अंदाजाची माहिती दिली. राज्यात 17 जूनपर्यंत सर्वत्र पावसाची उपस्थिती जाणवणार आहे. तसेच राज्यात यंदा सरासरी 96 ते 104 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) 18 व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) 3 पथके सदैव तैनात असणार आहेत. त्यापैकी एनडीआरएफची तीन फिरती पथके ही कोणत्याही क्षणी मदतीसाठी तयार ठेवण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सैन्य दलाच्या वतीनेही आपत्ती निवारण दले सज्ज ठेवण्यात आली असून गरज पडल्यास हेलिकॉप्टरही उपयोगात आणण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. रेल्वे, हवामान खाते, विविध विभागीय आयुक्त, कोस्टगार्ड, तीनही सैन्य दले यांनीही मान्सूनपूर्व तयारीचे सादरीकरण केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget