(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); दुष्काळ हटवायचा असेल तर प्रत्येकानं दोन रोपं लावली पाहिजेत… | मराठी १ नंबर बातम्या

दुष्काळ हटवायचा असेल तर प्रत्येकानं दोन रोपं लावली पाहिजेत…


रिक्षा चालक प्रकाश माने झाले वृक्ष लागवडीचे प्रेरणादूत…

मुंबई (१ जून २०१९ ) : दुष्काळ हटवायचा असेल ना, तर प्रत्येकानं दोन रोपं लावून ती जगवली पाहिजेत असा आग्रह धरणारे दहिसरचे रिक्षाचालक प्रकाश सुरेश माने यांनी आपली रिक्षा अगदी अनोख्या पद्धतीने सजवली आहे. त्यांनी आपल्या रिक्षाला जिथे शक्य आहे तिथे रोपं लावून ती हिरवाईने नटवली आहे.

आपल्या या आगळ्यावेगळ्या रिक्षाबद्दल सांगताना माने म्हणाले, वेगवेगळ्या रोपांनी सजवलेली माझी रिक्षा जेव्हा रस्त्यावरून धावते तेव्हा ती लोकांना खूपच आवडते. रिक्षात बसणारे लोक म्हणतात, आम्हाला रिक्षात नाही तर उद्यानात बसल्यासारखं वाटतं. मनाला खूप प्रसन्नता आणि आनंद मिळतो. लोकांच्या या प्रतिक्रिया मला खूप प्रोत्साहित करतात.

आपल्या सगळ्यांनाच झाडांची आणि निसर्गाची खूप ओढ असते. दररोजच्या धकाधकीच्या प्रवासात लोक माझ्या रिक्षात कधी पंधरा मिनिटे, कधी अर्धा तास तर कधी एक तास बसतात.. मग मी त्यांना कुठल्या प्रकारे आनंद देऊ शकतो याचा मी विचार केला आणि मग प्लास्टिकचे फुलं, रंगीबेरंगी पताका लावण्यापेक्षा ती अधिक सजीवपणे उठून दिसण्यासाठी माझ्या रिक्षाला वेगवेगळ्या ठिकाणी मध्यम आणि लहान ऊंचीची १० रोपं बांधून घेतली. यात पांढरं तगर आहे, जास्वंद आहे, तुळस आहे, मनी प्लांट आहे, कडिपत्त्याचं रोपं आहे आणि इतर ही रोपं आहेत.


माझ्या घरात आईसह माझी पत्नी आणि तीन मुलं आहेत माने सांगत होते, त्यांना सगळ्यांना झाडं लावण्याची खूप आवड आहे. आम्ही केतकीपाडा, दहिसर येथील आदिवासी पाड्यात राहातो. निसर्गाच्या सान्निध्यात राहात असल्याने झाडांची आवड होतीच.. त्यातून ही कल्पना सूचली.

लोकांना माझी रिक्षा खूप वेगळी वाटते. सिग्नल ला थांबलं तर लोक रिक्षा जवळ येऊन "सेल्फी" काढतात, गाडीत बसलेले लोक गाडीतून हाताने "खूप सुंदर" असं सांगतात. एवढच कशाला रिक्षात बसणारे लोक झाडासाठी म्हणजे रोपासाठी पैसे देतात.. म्हणतात, आमच्या नावानं रिक्षात एक रोप लावा… कालच एका प्रवाशाने ५० रुपये काढून दिले म्हणाले, आणखी एखादं चांगलं रोप विकत घ्या आणि रिक्षाला लावा… अशी ही माझी रिक्षा सबसे निराली है, माझी वृ(रि)क्षा राणी आहे, जी वृक्ष लागवडीचा, पर्यावरण रक्षणाचा संदेश देते…लोकांना आनंद होतो आणि त्यांच्या आनंदात मी आनंदी होतो…
रिक्षाचालक  प्रकाश माने वृक्ष लागवडीचे प्रेरणादूत- सुधीर मुनगंटीवार
पोटापाण्यासाठी लोक विविध प्रकारचे उद्योग-व्यवसाय करतात. पण हे करत असतांना सामाजिक भान जपून पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे येणारे, हरित महाराष्ट्रासाठी योगदान देणारे रिक्षाचालक प्रकाश माने यांच्यासारखे योद्धे हे खऱ्या अर्थाने पर्यावरण रक्षणाचे, वृक्ष लागवडीच्या मोहिमेचे प्रेरणादूत ठरतात अशी प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. 
वन विभागाने तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून आतापर्यंत १७ कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पापोटी राज्यात २१ कोटीहून अधिक लागवड झाली आहे. तर येत्या पावसाळ्यात आपल्या सर्वांना मिळून ३३ कोटी वृक्ष लागवड करावयाची आहे. राज्य दुष्काळाने  त्रस्त असताना  अधिकाधिक वृक्ष लावून पडणाऱ्या प्रत्येक पाण्याचा थेंब जमिनीत मुरवण्यासाठी आणि भूजलपातळी वाढवण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची पराकाष्ठा होणे गरजेचे आहे. प्रकाश माने यांच्यासारखी माणसं या मोहिमेचा आधार असून हरित महाराष्ट्राच्या निर्मितीचे ते खरे शिल्पकार आहेत असं मला वाटतं असंही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
००००
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget