मुंबई, दि. 26 : म्हाडाच्या जागेवर वसाहतीचा विकास करण्यासंदर्भात अंधेरी येथील डी.एन.नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आठ इमारतीमधील ४८० सदनिकांसंदर्भात् अनियमितता झाली आहे. या संबंधित रूस्तमजी रियॅलटी प्रा. लिमिटेड या विकासकावर तसेच संबंधित म्हाडाच्या अधिका-यांवर तातडीने कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
विधानसभेत अंधेरी येथील म्हाडाच्या जमिनीवर गृहसंस्थांचा विकास करण्यासंदर्भात अनियमितता झाल्याबाबतची लक्षवेधी सदस्य मो. अरिफ नसीम खान यांनी मांडली होती. त्यास उत्तर देताना विखे पाटील बोलत होते.
विखे-पाटील म्हणाले, डी.एन.नगर सहकारी गृहनिर्माण संस्था आणि वैदही आकाश हाऊसिंग प्रा. लि. यांच्यात २००५ साली विकास करार करण्यात आला. सदर विकासकाने करारानाम्यातील अटींचे उल्लंघन केल्याने सदर विकासाचे काम रूस्तमजी रिअेल्टर्स प्रा.लि. यांना देण्यात आले. मात्र, यातही अनियमितता झाल्याने, या बांधकामास स्थगिती देण्यात येणार असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, ४८० सदनिकांच्या रहिवाशांसोबत अन्याय होऊ देणार नाही तसेच शासन या गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना संरक्षण देणार नाही. त्याचबरोबर जे म्हाडा अधिकारी दोषी असतील त्यांना निलंबित करण्यात येईल. रूस्तम बिलर्डच्या संचालकांवरही चौकशीअंती कारवाईचे निर्देश देण्यात येतील, असेही विखे-पाटील यांनी सांगितले.
यावेळी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, सदस्य सर्वश्री जयंत पाटील, एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला होता.
टिप्पणी पोस्ट करा