(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); लासूर येथील बजाज चारा छावणीला मुख्यमंत्र्यांची भेट | मराठी १ नंबर बातम्या

लासूर येथील बजाज चारा छावणीला मुख्यमंत्र्यांची भेट

औरंगाबाद (८ जून २०१९ ) : मराठवाड्यात बारमाही दुष्काळ परिस्थिती जाणवते. जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटर ग्रीड, गाळमुक्त धरणे गाळयुक्त शिवार, नदी जोड प्रकल्प, जलशक्ती मंत्रालय आदींच्या माध्यमातून मराठवाड्यातील हा दुष्काळ दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

मराठवाड्यातील पुढील पिढीला दुष्काळमुक्त मराठवाडा दिसेल असा शासनाचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

लासूर येथे भारतीय जैन संघटना, अरित फाऊंडेशन आणि बजाज ऑटो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, आमदार तथा अरित फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत बंब, आमदार अतुल सावे, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा, बजाज समूहाचे सी.पी.त्रिपाठी, एकनाथ जाधव आदींची उपस्थिती होती. तत्पूर्वी बजाज चारा छावणीला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बजाज चारा छावणी राज्यातील आदर्श अशी चारा छावणी आहे. या ठिकाणी जनावरांची निगा, चाऱ्याची व्यवस्था, देखरेख, वैद्यकीय सुविधा, शेतकऱ्यांची जेवणाची व्यवस्था उत्तम प्रकारे गेल्या तीन महिन्यांपासून करण्यात येत आहे. दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यात अशा प्रकारचा उपक्रम स्तुत्य असून मुथा, त्रिपाठी आणि बंब यांच्या या कार्याचे विशेष कौतुक वाटते. राज्य शासनामार्फतही वेळेच्या अगोदर दुष्काळ जाहीर करण्यात आला. दुष्काळात देण्यात येणारी आर्थिक मदत, चारा छावण्यांना परवानगी, चारा छावण्यांसाठी निधीत वाढ आदी कामे करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाने केला. केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या दुष्काळ निवारण्यासाठी चार हजार 700 कोटी रुपये मदत दिली. त्यात राज्य सरकारने भर घालून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा दिला. शासनाच्या महत्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार अभियानामुळे संरक्षित सिंचनाचा लाभ झाला. अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. परंतु झालेले नुकसान जलयुक्त शिवार अभियानामुळे तुलनेने कमी झाले. मराठवाड्याला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी मराठवाडा ग्रीडचा अंतिम विकासकृती आराखडा तयार करण्यात येत आहे. यामध्ये मराठवाड्यातील धरणे एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. या धरणांना पाईपच्या सहाय्याने जोडले जाईल. तसेच प्रत्येक गावात पाणीपुरवठा होण्यास मदत होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. या मंत्रालयाचा पूरेपूर उपयोग करुन शेती आणि गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी शासन योजना तयार करीत आहे. त्यामुळे मराठवाड्यात पाण्याची कमतरता पडू देणार नसल्याचे फडणवीस म्हणाले. राज्य शासनाने शेतीतील गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. मागील चार ते पाच वर्षात दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक शेती आणि शेतीशी संलग्नित कामे यांच्यावर करण्यात आली आहे. यामध्ये जलयुक्त शिवार, सिंचन, शेतकऱ्यांना थेट मदत, यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन यांचा अंतर्भाव आहे. आगामी काळात मराठवाड्यात मराठवाडा ग्रीडच्या माध्यमातून भरपूर प्रमाणात कामे होणार आहेत. वैरण विकासाचा कार्यक्रमही हाती घेण्यात येणार आहे असेही फडणवीस यांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यासाठी सातशे कोटीहून अधिक मदत दुष्काळ जाहीर केल्यानंतर करण्यात आली आहे. त्याचबरोबर ब्रम्हगव्हाण उपसा सिंचनच्या तिसऱ्या टप्प्यासही लवकरच सुरूवात होणार आहे, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

बागडे म्हणाले, पूर्वीच्या दुष्काळापेक्षाही यंदाचा दुष्काळ भयावह आहे. परंतु ‘जलयुक्त शिवार’मुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना लाभ झाला. शासनाने वेळेच्या आत दुष्काळ जाहीर करुन दुष्काळी उपाययोजना केल्या. मात्र, यंदा सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन बागडे यांनी केले.

सुरूवातीला.फडणवीस यांच्या हस्ते माती पूजन करण्यात आले. त्यानंतर आयोजकांमार्फत फडणवीस यांचा गाय-वासरूचे प्रतीक चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. सुमीत मुंदडा 21 गावांना मोफत पाणी देत असल्याने फडणवीस यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. फडणवीस यांच्या हस्ते शेतकऱ्यांना न्युट्रीशिअन किटचे वाटपही यावेळी करण्यात आले.

शासनाच्या एसएमएस सेवेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

मागील वर्षी चाळीस कोटी एसएमएस शेतकऱ्यांना पाठविण्यात आले. या तीन दिवसात पाच कोटी शेतकऱ्यांना खरीप पीक घेताना आणि घेण्यापूर्वी घ्यावयाच्या काळजीबाबत एसएमएस करण्यात आले आहेत. यंदा पाऊस थोडा उशीरा होण्याची शक्यता आहे. म्हणून शेतकऱ्यांनी घाई न करता शासनाच्या माहितीचा, एसएमएस सेवेचा लाभ घ्यावा. त्यामुळे दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर ओढवणार नाही. यंदा हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाड्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाच्या माहितीच्या आधारावरच शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget