(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); जागतिक पर्यावरण दिन साजरा | मराठी १ नंबर बातम्या

जागतिक पर्यावरण दिन साजरा

प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो, इलेक्ट्रीक बसेसच्या वापरावर भर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई ( ४ जून २०१९ ) : राज्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो, इलेक्ट्रीक बसेस आणि लहान इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरावर भर देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ते आज पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयोजित केलेल्या जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमात बोलत होते. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झाला. यावेळी पर्यावरण मंत्री
रामदास कदम, राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी पर्यावरण विभाग सातत्याने प्रयत्नशील असून देशभर कामाचे कौतुक होत आहे. प्लास्टिक बंदीच्या बाबतीत आपण देशात एक नंबरवर आहोत. वातावरणीय बदलामुळे शेतीवर मोठे संकट उभे आहे. दुष्काळ, तीव्र पाणी टंचाईमुळे शेतकरी संकटात आहे. या तापमान वाढीच्या परिणामामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. शहरात वाहतुकीमुळे प्रदूषण वाढलेले आहे. नद्या, समुद्र किनारे प्रदूषित होत आहेत. यावर उपाय म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन स्वच्छतेकडे अधिक लक्ष देत आहोत. समुद्रात किंवा नदी नाल्यात रासायनिक, प्रदूषित पाणी सोडले जाणार नाही. याची दक्षता घेण्यात येत आहे. येत्या दोन ते तीन वर्षात मुंबई हे शहर पर्यावरणपूरक शहर बनेल त्याचबरोबर येथील समुद्रकिनारे स्वच्छ असतील.

राज्यातील 150 नगरपरिषदांनी कचऱ्यावर प्रक्रिया करुन चांगले खत तयार केले आहे. त्याचा उपयोग शेतकऱ्यांना होत आहे. यापुढे डंपींगकरिता कुणालाही जागा दिली जाणार नाही. असा निर्णय घेतला. भविष्यात पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेसाठी प्रयत्न सुरु असून मेट्रो आणि इलेक्ट्रीक बसेसचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर द्यावा लागणार आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरुन वीज निर्मितीचे प्लांट सुरु केले आहेत. पर्यावरणाचे काम हे देशसेवेचे काम असून पर्यावरणाच्या रक्षणासाठी
सर्वांचा सहभाग आवश्यक आहेत, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले, राज्यात पुढील दोन महिन्यात प्लास्टिक बंदी नव्वद टक्क्यांवर आणू. हवा प्रदूषणाद्वारे नियंत्रण ठेवण्यासाठी 200 यंत्रे राज्यात कार्यरत आहेत. त्यामुळे हवेची गुणवत्ता कळते. पुढील काळात कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्याचे सेंद्रीय खत करण्याकडे लक्ष द्यावे लागेल. याच कार्यक्रमात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्लास्टिक बंदीचे स्वागत करुन पुढील काळात पर्यावरणावर अधिक काम करावे लागेल, असे सांगितले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री यांच्या हस्ते वसुंधरा पुरस्काराचे वितरण तसेच हवा गुणवत्ता अहवाल आणि ‘प्लास्टिक बंदीचे शिवधनुष्य’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

प्रारंभी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई.रविंद्रन यांनी प्रास्तावीक केले. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला प्रधान सचिव अनिल डिग्गीकर उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget