(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मंत्रिमंडळ बैठक निर्णय : 4 जून 2019 - कृषी विद्यापीठासह पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता | मराठी १ नंबर बातम्या

मंत्रिमंडळ बैठक निर्णय : 4 जून 2019 - कृषी विद्यापीठासह पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता

महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम 1983 आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम 1998 च्या कलम 9 मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयातून अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना 17 नोव्हेंबर 2000 नंतर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून देण्यात आलेली पदविका प्रमाणपत्रे व पदव्या पूर्वलक्षी प्रभावाने विधिग्राह्य करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. हा निर्णय महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम 1983 आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम 1998 च्या कलम 9 मध्ये सुधारणा होईपर्यंतच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे मत्स्यविद्या शाखेतील पदविका, पदवी, पदव्युत्तर व आचार्य इत्यादी पदव्या देण्याचे अधिकार अपवाद म्हणून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठास देण्यासही मान्यता देण्यात आली.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम 1998 नुसार नागपूर येथे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. या अधिनियमातील कलम 9 मध्ये असलेल्या तरतुदीनुसार कृषी विषयातील पदवी व पदविका प्रमाणपत्र देण्याचे अधिकार कृषी विद्यापीठांना आहेत. या अधिनियमानुसार शिरगाव येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालय तसेच पशु व मत्स्य विज्ञानाशी संबंधित इतर महाविद्यालये, संस्था, प्रशिक्षण केंद्र, संशोधन केंद्र यांना महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांशी संलग्नित करण्यात आले आहे. तथापि, 17 नोव्हेंबर 2000 च्या अधिसूचनेनुसार शिरगाव येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयास पूर्वीप्रमाणेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्नित करण्यात आले. परंतु, महाराष्ट्र
पशु व मत्स्य विज्ञान विज्ञापीठ अधिनियम 1998 आणि महाराष्ट्र कृषी विद्यापीठे अधिनियम 1983 च्या कलमांमध्ये आवश्यक त्या सुधारणा न केल्यामुळे शिरगाव येथील महाविद्यालयातून पदविका, पदवी आणि आचार्य हे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना 17 नोव्हेंबर 2000 नंतर देण्यात आलेल्या पदव्या विधिग्राह्य ठरत नव्हत्या. या वस्तुस्थितीचा विचार करता 17 नोव्हेंबर 2000 ते संबंधित दोन्ही अधिनियमातील कलम 9 मध्ये सुधारणा होईपर्यंतच्या कालावधीमध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी
विद्यापीठाकडून प्रदान करण्यात आलेल्या पदविका, पदवी प्रमाणपत्रे पूर्वलक्षी प्रभावाने विधिग्राह्य करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget