(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीचे गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मराठी १ नंबर बातम्या

मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीचे गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड (जिमाका) ( ३ जून २०१९ ) : विविध योजनांच्या माध्यमातून मराठवाडयाचा सर्वांगिण विकास आणि दुष्काळमुक्तीचे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न आम्ही पूर्ण करु, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परळी येथील गोपीनाथ गड येथे केले.

गोपीनाथराव मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथगड परिसरात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री पंकजा मुंडे, राज्याचे दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर, राष्ट्रीय कृषि आयोगाचे उपाध्यक्ष पाशा पटेल, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, खासदार डॉ. प्रितम मुंडे, खासदार सर्वश्री सुजय राधाकृष्ण विखे पाटील, संजय ( बंडू ) जाधव, सुधाकर श्रृंगारे, प्रताप पाटील चिखलीकर, जय सिध्देश्वर स्वामी, रणजित नाईक निंबाळकर, ओमराजे निंबाळकर, हेमंत पाटील यासह आमदार, पदाधिकारी, शासकीय अधिकारी आणि मोठया संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व होते. गरीब आणि वंचिताच्या विकासासाठी ते शेवटपर्यंत झटले. मराठवाड्याच्या विकासाबरोबरच हा भाग दुष्काळमुक्त व्हावा हे त्यांचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी शासन सर्वोत्वपरी प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्याने पश्चिम वाहिन्या नद्यांचे पाणी समुद्रात जावू नये यासाठी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याशिवाय मराठवाडा वॉटरग्रीड अंतर्गत मराठवाडयात पाण्याचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी इस्राईल सोबत करार करण्यात आला असून पाच विकास आराखडयांना मान्यता देण्यात आली आहे. याकरिता 20 हजार कोटी खर्च लागणार आहे. बंद पाईपद्वारे हे पाणी गावागावात शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करुन दिले जाईल.

बीड जिल्ह्याच्या विकासाबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कृष्णा खोऱ्यातील 25 टी.एम.सी. पाणी मराठवाड्याला मिळण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे. याचा लाभ बीड जिल्हयाला होणार आहे. बीड जिल्हयातील जनतेच्या जिव्हाळ्याचा रेल्वेचा प्रश्न लवकरच सुटणार असून नगर-बीड-परळी रेल्वे लाईनचे काम वेगाने सुरु आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरीब आणि वंचितांच्या कल्याणासाठी कामकाज करतांना अनेक निर्णय घेतले आहेत. शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा करण्यात येत आहे. राज्यात विविध भागातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी अनेक उपाययोजनांची सध्या अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येत आहे. जनावरांसाठी चारा छावण्या उघडण्यात आल्या आहेत. दुष्काळनिवारण्यासाठी केंद्र सरकारकडून 1300 कोटी रुपयांचे दुष्काळी अनुदान प्राप्त झाले आहे. या शिवाय निधी लागल्यास शासनाच्या तिजोरीतून दिला जाईल त्यामुळे जनतेने कुठल्याही प्रकारची काळजी करु नये, शासन आपल्या पाठीशी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आपण घडल्याचा उल्‍लेख करीत ते म्हणाले की, गोपीनाथराव मुंडे यांचे व्यक्तीमत्व, नेतृत्व क्षमता अफाट होती. त्यांच्या परिसस्पर्शामुळे राज्यात अनेक नेते घडले. मुंडे साहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आम्ही निश्चितपणे उभा करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या सोबत अनुभवलेल्या क्षणांचा उलेख करुन त्यांच्या आठवणी सांगितल्या. पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोपीनाथराव मुंडे हे अखेरच्या श्वासापर्यंत वचितांच्या विकासासाठी झटले. त्यांचे कार्य आजही विसरण्यासारखे नाही. वंचितांसाठी हा दिवस उर्जा देणारा आहे. या दिवसाचे महत्व पाहता गरीब बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून प्रतिष्ठान आणि दिनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास अभियानाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी असलेल्या योजना पोहचविण्याचा या मेळाव्याचा व प्रदर्शनाचा उददेश होता असे मुंडे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी पांगरी येथे आल्यानंतर प्रथम चाराछावणीस भेट दिली व शेतकरी, जनावरांचे मालक यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व मार्गदर्शन केले. त्यानंतर गोपीनाथगड येथील गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी दर्शन घेवून श्रध्दांजली वाहिली. त्यांनी मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित रोजगार मेळाव्याचे आणि या निमित्ताने आयोजित प्रदर्शनाचे उदघाटन केले.

व्यासपीठावर उपस्थित नवनिर्वाचित सर्व खासदारांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खा. प्रितम मुंडे यांनी केले. यावेळी सत्काराला उत्तर देतांना खा. विखे पाटील, नाईक निंबाळकर, जाधव, चिखलीकर यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी आमदार सर्वश्री सुरेश धस, भीमराव धोंडे, आर. टी. देशमुख, सुजितसिंग ठाकूर, तानाजी मुरकुटे, लक्ष्मण पवार, मोहन फड, अतुल सावे, तुषार राठोड, संगिता ठोंबरे, स्नेहलता कोल्हे, मोनिका राजळे, माधुरी मिसाळ आदीसह भारतभूषण क्षीरसागर, स्वरुप हजारी, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे आदी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget