(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); गिरीश कर्नाड यांचं निधन | मराठी १ नंबर बातम्या

गिरीश कर्नाड यांचं निधन

मुंबई ( १० जून २०१९ ) : नाटककार, अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक गिरीश कर्नाड यांचे सोमवारी बंगळुरूत निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाड आजारपणाशी झुंज देत होते. गिरीश कर्नाड यांच्या निधनाने कलाक्षेत्रात शोककळा पसरली आहे.

बेंगळुरूतील राहत्या घरी त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथंच त्यांनी आज सकाळी सहाच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे पत्नी सरस्वती, मुलगा रघु आणि पत्रकार, लेखिका कन्या राधा असा परिवार आहे.

जागतिक स्तरावरील साहित्य आणि कला यामधील योगदानाबद्दल त्यांना १९९९ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील माथेरान इथं १९ मे १९३८ साली त्यांचा जन्म झाला. कर्नाटक विद्यापीठातून १९५८ साली त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केलं. पुढं फेलोशिप मिळवून उच्च शिक्षणासाठी त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथं त्यांनी एमएची पदवी घेतली. ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र व अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं होतं. अफाट वाचन, चिंतन आणि प्रयोगशीलता ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खास वैशिष्ट्ये होती. त्यांच्या साहित्य व नाट्यकृतीतून त्यांची ही सर्जकता सतत प्रतिबिंबित होत राहिली.

सत्यजित रे यांचे चित्रपट पाहून गिरीश कर्नाड प्रभावित झाले आणि त्यांनी सिनेमाकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ‘कानुरू हेगाडीथी’ (१९९९) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, तर ‘इक्बाल’ (२००५) आणि ‘लाइफ गोज ऑन’ (२००९), एक था टायगर अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.

त्यांना चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून त्यापैकी तीन पुरस्कार कन्नड चित्रपट वंश वृक्ष (१९७२), काडू (१९७४), ओन्दानुंडू कालाडल्ली (१९७८) या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी आणि ‘गोधुली’ (१९८०) या चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी मिळाला आहे.

याशिवाय उंबरठा या मराठी चित्रपटामध्येही त्यांनी काम केले होते. १९९४ साली साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. संस्कार चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

१९६४ साली रंगभूमीवर आलेल्या त्यांच्या 'तुघलक' या नाटकानं इतिहास घडवला. या नाटकामुळं त्यांचं नाव देशभरात गेलं. साहित्यातील अमूल्य योगदानाबद्दल १९९८ साली त्यांना 'ज्ञानपीठ' पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी गिरीश कर्नाड यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.


प्रतिभावंत नाटककार, अभिनेते, लेखक, दिग्दर्शक व विचारवंत असलेले गिरीश कर्नाड हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांनी निवडलेल्या सर्वच क्षेत्रांमद्धे आपला वेगळा असा ठसा उमटवला. त्यांनी निर्मित केलेल्या नाट्यकृती त्यांच्या उच्च प्रतिभेची साक्ष देतात. समाजाच्या विविध प्रश्नांवर त्यांनी आपली मते परखडपणे मांडली. त्यांच्या निधनामुळे देशभरातील नाट्य चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे, या शब्दात राज्यपालांनी कर्नाड यांना आपली श्रद्धांजली वाहिली.

कला, साहित्य आणि वैचारिक क्षेत्रातील महान व्यक्त‍िमत्त्वाचा अस्त - मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली


नामवंत अभिनेते-दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांच्या निधनाने साहित्य, कला आणि वैचारिक क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, कर्नाड हे एक बहुपेडी व्यक्तिमत्त्व होते. साहित्य, चित्रपट, रंगभूमी यासह वैचारिक क्षेत्रातही त्यांचा समर्थ वावर होता. विशेषत: एक महान रंगकर्मी म्हणून त्यांचे भारतीय नाट्यक्षेत्रातील योगदान सदैव स्मरणीय असेल. ज्ञानपीठ, कालिदास सन्मान, साहित्य अकादमी, संगीत अकादमी यांच्यासह विविध प्रतिष्ठेचे पुरस्कार व नागरी सन्मानांनी झालेला गौरव हा त्यांच्या कार्याचे महत्त्व विशद करणारा आहे. ययाति, तुघलक, नागमंडल, हयवदन यासारखी नाटके आणि उत्सव या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून त्यांची विशेष ओळख होती. भारतीय पौराणिक कथांना समकालीन प्रश्नांशी जोडत त्यावर भाष्य करणारे त्यांचे लेखन केवळ समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे नव्हते तर ते विचार प्रवाहित करणारे होते. भारतीय नाट्यक्षेत्राची पुनर्रचना करणाऱ्यांमध्ये ते अग्रणी होते. ऑक्सफर्डसारख्या नामांकित विद्यापीठाचे स्कॉलर असलेल्या कर्नाड यांचा विविध सामाजिक विषयांचा मोठा अभ्यास होता.

माथेरान येथे जन्मलेल्या कर्नाड यांचा महाराष्ट्राशी अनोखा ऋणानुबंध असल्याने मराठी चित्रपटसृष्टी-रंगभूमी तसेच साहित्य क्षेत्राशीही त्यांचा निकटचा संबंध होता. जब्बार पटेल दिग्दर्शित उंबरठा चित्रपटातील त्यांची भूमिका रसिकांच्या सदैव स्मरणात राहील.

बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या निधनाने कला, साहित्य क्षेत्राची मोठी हानी - विनोद तावडे


पद्मश्री आणि पद्मभूषण आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त गिरीश कर्नाड यांच्या निधनाने कला, साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची प्रतिक्रिया सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली.

गिराश कर्नाड यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते, आपले साहित्य जागतिक स्तरावर पोहचविण्यात त्यांचा मोठा सहभाग होता, त्यांचे लेखन सृजनशील व विचार करायला लावणारे आहे. त्याचप्रमाणे नवदृष्टी देणारे त्यांचे दिग्दर्शन आणि प्रभावी अभिनय यामुळे त्यांनी भारतीय साहित्य व कला क्षेत्रावर स्वत:ची वेगळी छाप उमटवली. सार्वजनिक कामात सहभागी होणाऱ्या कर्नाड यांनी दूरदर्शनच्या ‘टर्निंग पॉईंट’ या कार्यक्रमातील त्यांनी केलेली निवेदकाची भूमिका असो किंवा पुकार, इक्बाल या सारखे हिंदी आणि उंबरठा सारखा मराठी सिनेमात केलेली भूमिका असो, तसेच कन्नड सिनेमांचे दिग्दर्शन असो, प्रत्येक कलाकृतीत त्यांनी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या निधनाने कला, साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे तावडे यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget