मुंबई ( २६ जून २०१९ ) : पालघर जिल्ह्यात चिकू महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी नोंदणीकृत आणि अनुभवी रूरल एन्ट्पिनर्स वेलफेअर फाउंडेशन या संस्थेला काम देण्यात आले. सदर संस्थेस महोत्सवासाठी २४ लाख रुपये देण्याचे ठरले होते मात्र, पाच लाख रुपये दिले आहेत. कोणत्याही रक्कमेचे अतिप्रदान अथवा गैरव्यवहार झाला नसल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी विधानसभेत दिली.
बोर्डी येथील चिकू महोत्सवातील आयोजकांनी केलेल्या गैरव्यवहारासंदर्भात सदस्य पास्कल धनारे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यास उत्तर देताना डॉ. उईके बोलत होते.
डॉ.उईके म्हणाले, बोर्डी येथे आयोजित चिकू महोत्सवामध्ये आदिवासी समुदायाच्या सहभागाबाबत रू. २४ लाख इतकी रक्कम विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आली होती. परंतु, त्याबाबत वेगवेगळ्या संघटनांकडून तक्रारी आल्यानंतर सदर प्रकरणाची एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालयाकडून स्थापन करण्यात आलेल्या त्रिस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात आली. स्टॉल, नृत्यसादरीकरण आणि भोजनसाठी संस्थेस पाच लाख देण्यात आले. उर्वरित रक्कम अद्याप देण्यात आली नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकार अतिप्रदान अथवा गैरप्रकार झालेला नसल्याचे डॉ. उईके यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा