(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या कार्यातून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मराठी १ नंबर बातम्या

स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या कार्यातून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर ( १३ जून २०१९ ) : राजर्षि शाहू महाराजांनी बहुजन हिताय बहुजन सुखायचा मार्ग दाखविला. शेवटच्या माणसाच्या विकासाचा, सर्व सामान्य माणासाच्या उत्थानाचा मार्ग त्यांनी दाखविला. यातून महाराष्ट्रात निर्माण झालेल्या परंपरेचे स्व. राजे विक्रमसिंह घाटगे पाईक होते. तळागाळातील सर्व सामान्य माणूस, शेतकरी यांच्या विकासाचे, परिवर्तनाचे ध्येय घेवूनच त्यांनी जीवनभर सामाजिक कार्य केले. त्यांच्या दूरदृष्टीतून उभारलेल्या विविध संस्थामुळे कागल परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडले असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कागल येथील स्व. राजे विक्रमसिंह घाटगे पुतळा अनावरण सोहळ्यानिमित्त श्रीमंत जयसिंगराव घाटगे पटांगणात आयोजित शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी श्री छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, खा. श्रीमंत छत्रपती संभाजीराजे, खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, आमदार सर्वश्री सुरेश हळवणकर,उल्हास पाटील,प्रकाश आबिटकर,अमल महाडिक, कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुहास वारके,जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अमन मित्तल, जिल्हा पेालीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, राजे प्रविणसिंह घाटगे, श्रीमंत राजे मृगेंद्रसिंह घाटगे,सुहासिनी घाटगे, पश्चिम देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, गोकुळचे संचालक बाबा देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण सर्वसामान्य जनतेचे उत्तरदायी आहोत. या भावनेतून स्व. विक्रमसिंह राजे घाटगे यांनी मोठ्या प्रमाणात सहकारी संस्थांची उभारणी केली. त्यातून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविले. सहकार, क्रिडा, शिक्षण अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी संस्था उभारल्या. कर्णबधिर मुलांकरीता शाळा, अनाथ मुलांसाठी विविध सुविधा याबाबी त्यांच्यातील संवेदनशीलता अधोरेखित करतात. कोणत्याही परिस्थितीत धैर्य न सोडता काम केल्यास संपूर्ण समाज पाठिशी राहतो त्यामुळे विक्रमसिंह राजे घाटगे यांच्या मार्गाचाच अवलंब करीत रहा, असेही त्यांनी राजे समरजितसिंह यांना सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ऊस, साखर कारखानदारी यांच्याबाबत अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. गतवर्षी 99.95 टक्के एफआरपी दिली तर यावर्षी आतापर्यंत 96 टक्के एफआरपी दिली आहे. उर्वरीतही लवकरच देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना एफआरपी वेळेत देता यावी यासाठी किमान विक्रीमूल्य (minimum selling price) देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतल्यामुळे अडचणीत असलेली साखर कारखानदारी सावरली आहे, असे सांगितले.

बाजारपेठेत साखरेची मागणी कमी झाल्यामुळे साखरेचे उत्पादन आणि मागणी यात मोठी तफावत आहे. त्याकरीता सहउत्पादनांच्या पॅकेजच्या योजना तयार केल्या आहेत. इथेनॉलच्या उत्पादनाला चालना देण्यात येत आहे. यापुढे साखर कारखान्याचे साखर हे बायप्रोडक्ट होईल व उप उत्पादने प्रमुख होतील व त्यातून साखर कारखानदारी अधिक सक्षम होईल व त्यातून शेतकऱ्यांचे कल्याण होईल, असेही ते यावेळी म्हणाले.

पाण्याचा उचित वापर करून अनिर्बंध पाणी वापराला आळा घालणे व त्याचवेळी शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी छत्रपती शाहू साखर कारखान्याचे चालू असलेले प्रयत्न, महिला शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज हे उपक्रम स्तुत्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी विक्रमसिंहराजे यांनी अनंत अडचणीचा सामना करत श्री छत्रपती शाहू साखर कारखाना उभारला. त्यातून या परिसराचा विकास झाला. या कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांना चांगला दर दिला असून या परिसराच्या विकासाचे श्रेय विक्रमसिंहराजे यांना जाते असे सांगितले. यावेळी त्यांनी नुतन खासदारांनी भरीव काम करून जिल्ह्याच्या विकासात महत्वपूर्ण योगदान द्यावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कागल परिसराच्या सर्वांगीण विकासात विक्रमसिंह राजे घाटगे यांचे अत्यंत महत्वाचे योगदान असून त्यांनी पाणीपुरवठा,शैक्षणिक,सामाजिक संस्था उभ्या केल्या. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी कागलच्या तळागाळातील जनतेच्या विकासाचे ध्येय ठेवले. लोकशाहीमध्ये समाजाच्या हिताचे काम करण्याची प्रेरणा घेऊन समरजितसिंह घाटगे काम करीत आहेत, असे सांगून त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी शेतकऱ्यांच्या सर्वांगीन विकास हेच राजे विक्रमसिंह घाटगे यांचे ध्येय होते, असे सांगून यासाठी त्यांनी 16 पाणी पुरवठा संस्था सुरू केल्या. शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी कागल को-ऑपरेटीव्ह बँकेचा विकास केला, मुलांसाठी शाळा, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती असे अनेक उपक्रम त्यांना राबविले. आज कारखान्याने 5 हजार 232 हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी आंबेओहोळ प्रकल्पाला निधी मंजूर करून अनेक वर्षापासून रखडलेला प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल आणि गडहिंग्लजच्या हद्दवाढीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. मेक इन गडहिंग्लज संकल्पना राबवून गडहिंग्लज, उत्तूर परिसरात एमआयडीसी सुरू करावी व त्यातून रोजगार निर्मिती करावी. कागल हे विकासाच्या मुद्यावर पुढे नेऊन विक्रमसिंह घाटगे यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी साथ द्यावी,असे आवाहन केले.

या कार्यक्रमात नव्याने निवडूण आलेले खा. संजय मंडलिक व खा. धैर्यशील माने यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुतळ्याचे आर्किटेक्चर अमर चौगले व पुतळाकार किशोर पुरेकर यांचाही सत्कार करण्यात आला. कारखान्याच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश सुपुर्त करण्यात आला. यामेळाव्याला परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget