(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); बालगृहातील सुधारणासाठी नवीन धोरण आणणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मराठी १ नंबर बातम्या

बालगृहातील सुधारणासाठी नवीन धोरण आणणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चिल्ड्रेन्स एड सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

मुंबई ( १६ जून २०१९ ) : बालगृहातील बालकांची सुरक्षा, सकस आहार, कौशल्य विकास, शिक्षण, खेळ आणि सोयीसुविधेच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील आहे. तसेच बालगृहातील बालकांच्या सुधारणासाठी शासन नवीन धोरण आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

मुख्यमंत्री तथा चिल्ड्रेन्स एड सोसायटीचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. सभेस महिला व बालविकास मंत्री तथा उपाध्यक्षा पंकजा मुंडे, सोसायटीचे कार्याध्यक्ष सुनील राणे, महिला व बालविकास विभागाच्या सचिव विनिता वेद-सिंघल, आयुक्त ऋषिकेश यशोद यांच्यासह सोसायटीचे सभासद उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, चिल्ड्रेन्स एड सोसायटी बालकांच्या संगोपनाचे उत्कृष्ट काम करीत आहे. त्यांचा आहार व आरोग्याकडे सोसायटीचे लक्ष आहे. हे बालकांच्या कल्याणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. नोबेल शांती पुरस्कारप्राप्त, बाल अधिकार कार्यकर्ता कैलाश सत्यार्थी यांच्या सल्ल्याने सोसायटीला शासन मदत करेल. येत्या काळात ही सोसायटी देशातील एकमेवाद्वितीय अशी संस्था बनवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यापुढे सोसायटीची सर्वसाधारण सभा प्रत्येक वर्षी होईल, यासाठी सोसायटीच्या नियमात सुधारणा केली जाईल. येत्या दोन महिन्यात सर्वांना अभिमान वाटावा असा सर्वांगिण विकास बालगृहाचा केला जाईल. सोसायटीमध्ये 12 सदस्यांपैकी सहा सदस्य शासन नियुक्त आहेत, उर्वरित नवीन अभ्यासू सभासद येण्यासाठी पुन्हा अर्ज मागविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. सभासदांना सभेची आगाऊ माहिती देण्यासाठी नामांकित वृत्तपत्रात जाहिरात देण्यात यावी, शिवाय सभासदांचे मतही विचारात घ्यावे, सात दिवस अगोदर सभेचा अजेंडा सभासदांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

शासनाने अनाथ विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीमध्ये एक टक्का आरक्षण दिले आहे, याचा लाभही सर्वांना करून देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

मुंडे म्हणाल्या, सोसायटीने बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले निर्णय घेतले आहेत. विविध उपाययोजनांमुळे बालकांच्या आरोग्यावर चांगला परिणाम दिसून येत आहे. बालगृहातील बालकांचे आधारकार्डाचे व ओळखपत्राचे कामही उत्कृष्ट झाले आहे. शिवाय अनाथ प्रमाणपत्र दिले जाणार असल्याने त्यांना नोकरीसाठी फायदा होणार आहे.

चिल्ड्रेन्स एड सोसायटी ही आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था असून बालकांच्या शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसनाचे कार्य अधिक आधुनिक पद्धतीने करण्यासाठी संस्थेला शासन सर्वतोपरी मदत करेल, असेही श्रीमती मुंडे यांनी सांगितले.

बैठकीत सोसायटीच्या 2014 ते 2017-18 हे वार्षिक प्रशासकीय अहवाल, 2012 ते 2018 या कालावधीतील हिशोब तपासणी निवेदन, सनदी लेखापाल नेमणूक, नियामक परिषदेचे इतिवृत्त, जीर्ण व मोडकळीस आलेल्या इमारत दुरुस्तीसाठी निधी याबाबींना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली.

सभासदांनी बालगृहाबाबत विविध सूचना केल्या. सोसायटीचे कार्याध्यक्ष राणे यांनी गेल्या तीन महिन्यात बालगृहात केलेल्या सुधारणांचे सादरीकरण केले. मुख्य अधिकारी विजय क्षीरसागर यांनी सोसायटीच्या अहवालाचे सादरीकरण केले. सभेला शरद दवे, विश्वनाथ चौधरी, अरूणा आचार्य, भंडारे, निलेश पवार, शैलजा म्हात्रे, डॉ.चेतना पाटील, पोलीस सहआयुक्त विनयकुमार चोबे, उपायुक्त राजेंद्र दाभाडे आदी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget