(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम | मराठी १ नंबर बातम्या

मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम

व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन

मुंबई ( २६ जून २०१९ ) : मासिक पाळी संदर्भात समाजामध्ये बऱ्याच गैरसमजूती आहेत, त्या दूर करून मुली व महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व युनिसेफ मार्फत दिनांक २८ मे ते ३० जून, २०१९ दरम्यान रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियातील १००० गावांमध्ये विविध उपक्रम घेऊन किशोरी मुली व महिलांना मासिक पाळी व्यवस्थापनाचे तांत्रिक मार्गदर्शन करून, त्यांचे ज्ञान व कौशल्य वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

ग्रामीण व विशेषत: आदिवासी भागांतील किशोरी मुली व महिलांच्या मासिक पाळी दरम्यान अनेक गैरसमजूती, जुन्या चालिरीती व अंधश्रध्दा आहेत. वास्तविक त्या ४ दिवसांमध्ये किशोरी मुली व महिला यांना सकस आहार व आरामाची गरज असते. तसेच त्यांनी वैयक्तिक स्वच्छता जपली पाहीजे. या कार्यात महिलांना कुटुंबाकडून सहकार्याची मदतीची आवश्यकता असते. तथापि, मासिक पाळी ही बाब कुटुंबामध्ये लपविली किंवा गोपनीय ठेवली जाते. आई-वडिल किंवा पती पत्नींमध्ये या विषयावर सकारात्मक संवाद होताना दिसत नाही. परिणामी, त्याचा विपरीत परिणाम किशोरी मुली व महिलांच्या आरोग्यावर होतो. यावर प्रतिबंध व्हावा व कुटुंबियांमध्ये या विषयावर सकारात्मक सुसंवाद निर्माण व्हावा, यासाठी ही मोहीम राज्यातील गावांमध्ये घेण्यात आली.

या मोहीमेमध्ये जागतिक मासिक पाळी दिनाला राज्यस्तरावरून रेड डॉट अभियान घेऊन मोहीमेचा प्रारंभ करण्यात आला. गावस्तरावरील किशोरी मुली, गर्भवती माता, स्तनदा माता व सर्व साधारण महिलांना अंगणवाडी व शाळांमध्ये विविध उपक्रम घेऊन, मासिक पाळी संदर्भात समुपदेशन करण्यात आले. तसेच महिलांना मासिक पाळी व्यवस्थापनावरील काही चित्रफीत दाखवून त्यांचे ज्ञान व कौशल्ये वाढविण्याचाही प्रयत्न करण्यात आला. सदर मोहीमेमध्ये दिनांक २८ ते ३० जून दरम्यान विविध उपक्रमांचे गावस्तरावर आयोजन करण्यात आले. त्यामध्ये युनिसेफ मार्फत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील महिला ग्राम परिवर्तक यांची क्षमता बांधणी प्रशिक्षण आयोजित केले गेले. दिनांक ३१ मे ते १५ जून २०१९ दरम्यान प्रशिक्षित महिला ग्राम परिवर्तकांनी आपल्या ग्राम पंचायतींमध्ये गावातील किशोरी महिला व इतर महिलांमध्ये विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यानंतर १५ ते ३० जून दरम्यान शाळास्तरावर किशोरी मुलींना मासिक पाळी व वैयक्तिक स्वच्छता ठेवण्ण्यासाठी संवादात्मक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येत आहे.

या मोहीमध्ये मासिक पाळीसंदर्भात किशोरी मुली व महिलांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्यांना विविध विषयांवर माहिती देण्यात आली. त्यामध्ये किशोरावस्थेतील शारीरिक व मानसिक बदल व आत्मविश्वास निर्माण करणे, मासिक पाळी दिवसात आरोग्याची काळजी व पोषण आहार, वैयक्तिक स्वच्छता जपणे, सॅनिटरी नॅपकीनचा वापर करणे, मासिक पाळीसंदर्भातील गैरसमजूती व अंधश्रध्दा दूर करणे अशा विषयांवर जनजागृती करण्यात आली. सदर मोहिम यशस्वी करण्यासाठी राज्यातील ५५ महिला ग्रामपरिवर्तक व २० जिल्हा समन्वयक यांची निवड करून, त्यांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. या मोहिमेमध्ये महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तनातील १००० गावांमध्ये ही मोहीम सुरू असून, त्यातून १५० पेक्षा जास्त ग्रामपंचायतीतील ७५०० पेक्षा जास्त किशोरी मुली, महिला व पुरुषांना मासिक पाळी व्यवस्थापनाची तांत्रिक माहिती देण्यात आली आहे.
रेड डॉट चॅलेंज कॅम्पेनच्या अहवालाचे प्रकाशन
मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जनजागृतीसाठी सुरू असलेल्या रेड डॉट चॅलेंज कॅम्पेनच्या अहवालाचे प्रकाशन डॉ. यास्मिन अली हक (प्रतिनिधी संयुक्त राष्ट्र बाल कोष भारतीय कार्यालय) यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्र युनिसेफच्या मुख्य क्षेत्राधिकारी राजेश्वरी चंद्रशेखर, वॉश अधिकारी युनिसेफ मुंबईचे युसुफ कबीर, मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिएसटीएफ रामनाथ सुब्रमण्यम, कार्यकारी संचालक श्वेता शालिनी, कार्यकारी संचालक व्हिएसटीएफ उमाकांत दांगट, अभियान व्यवस्थापक व्हिएसटीएफ दिलीपसिंग बायस व युनिसेफ व व्हिएसटीएफ चे अधिकारी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget