(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); उद्योग व्यवसायात राज्याला अग्रेसर करण्यात महिला उद्योजकांचा मोठा सहभाग - सुभाष देसाई | मराठी १ नंबर बातम्या

उद्योग व्यवसायात राज्याला अग्रेसर करण्यात महिला उद्योजकांचा मोठा सहभाग - सुभाष देसाई

मुंबई ( २८ जून २०१९ ) : राज्यातील उद्योगधंद्यांमध्ये महिला उद्योजकांचा मोठा सहभाग असून उद्योग व्यवसायात राज्याला अग्रक्रम मिळवून देण्यात महिला उद्योजकांचा मोठा सहभाग असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनानिमित्त लघु उद्योग व निर्यात पुरस्कार वितरण सोहळा उद्योग विभाग व वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी देसाई बोलत होते.

राज्यातील उद्योजकांनी आपल्या उद्योगामध्ये निर्माण होणाऱ्या उत्पादनाची गुणवत्ता व दर्जा हा उत्तम ठेवल्यामुळे विदेशातही राज्यातील उत्पादनाला चांगली मागणी असल्याचे दिसून येते. येथील उत्पादनाला असलेली विदेशाची मागणी यामुळे निर्यातीमध्येही राज्य अग्रेसर आहे. उद्योजकांनी आपल्या उद्योगाची क्षमता व गुणवत्तेमध्ये सातत्य ठेवून निर्यात वाढविण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उद्योजक आणि शासक यांच्यामध्ये योग्य समन्वय असल्याने उद्योजकांना येणाऱ्या अडचणी शासकीयस्तरावर वेळोवेळी सोडविल्या जात आहेत. तसेच राज्यातील उद्योजकांनी विदेशात उद्योग स्थापन करुन देशाचे व राज्याचे नाव उज्ज्वल केले असून त्यांच्याशीही समन्वय साधून त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत आहे.

राज्य शासनाच्या उद्योग धोरणाच्या माध्यमातून नवउद्योजक घडविण्यात येणार आहेत. तसेच अर्थसंकल्पामध्ये उद्योगासाठी करण्यात आलेल्या तरतुदीमुळे नवउद्योजकांना प्रोत्साहन मिळणार आहे, असेही देसाई यांनी यावेळी सांगितले.

देसाई यांच्या हस्ते लघु उद्योग व निर्यात पुरस्कार देण्यात आले असून पुरस्कार प्राप्त उद्योजकांमध्ये श्रीधर रामपूरकर, पंकज चड्डा, अनिल पाटील, सुंदरलाल चड्डा, भानूदास पोपळघाट, सतीश मालू, निकुंज बागडीया, अंकिता श्रॉफ, अर्चना झा, कल्पना मालाणी, भावना जनबंधू, आशा राठी, कांताबाई खटींग, सुनीता शेंडे, सावनकुमार झंवर आदींचा समावेश आहे.

यावेळी उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदिप कांबळे, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे उपाध्यक्ष विजय कलंत्री, रुपा नाईक तसेच राज्यातील उद्योजक व नवउद्योजक उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget