(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); सिद्धीविनायक मंदिर परिसरात रोप विक्री स्टॉल | मराठी १ नंबर बातम्या

सिद्धीविनायक मंदिर परिसरात रोप विक्री स्टॉल

सवलतीच्या दरात रोपं

मुंबई ( २६ जून २०१९ ) : राज्यात जुलै ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत लोकसहभागातून ३३ कोटी वृक्षलागवड होणार आहे. अधिकाधिक लोकांनी यात सहभागी होऊन वृक्ष लावावेत यासाठी वन विभागाने १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत नागरिकांना सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून ठाणे वन विभागाच्यावतीने काल सिद्धीविनायक मंदिर परिसरात "सवलतीच्या दरात रोपे" या उपक्रमांतर्गत स्टॉल सुरु केला, त्याचे उद्घाटन देवस्थानचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. येथे २५ जून ते ५ जुलै या कालावधीत सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून देण्यात येतील.

ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनीही या रोप विक्री स्टॉलला भेट दिली तसेच वन विभागाच्या या उपक्रमाचे कौतूक करताना वृक्षलागवड मोहिमेची माहिती ही त्यांनी जाणून घेतली. यावेळी परिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांनी जितेंद्र यांचे बेलाचे रोप देऊन स्वागत केले.

अधिकाधिक लोकांनी वृक्षलागवड कार्यक्रमात सहभाग घेऊन हरित महाराष्ट्राच्या या चळवळीत योगदान द्यावे यासाठी ठाणे वन विभागाने नाममात्र दराने बेल, तुळस, फणस, आंबा, जांभूळ, जास्वंद, प्राजक्त, पेरु, सीताफळ व अन्य रोपे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. ठाण्याचे मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे, उप मुख्य वन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सिद्धी विनायक मंदिर परिसरातील या स्टॉलला पहिल्याच दिवशी खुप चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक भाविक प्रसादरुपी वृक्ष घेऊन गेले आणि ते रोप त्यांनी आपल्या परिसरात लावण्याचा निर्धार व्यक्त केला. ठाणे जिल्ह्यात आणि बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात काही ठिकाणी असे आणखी काही स्टॉल्स १ जुलै पासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती ही रामगांवकर यांनी दिली.
वृक्ष लावू इच्छिणाऱ्यांना सहजतेने रोपं उपलब्ध व्हावीत ही भावना
- सुधीर मुनगंटीवार
नागरिकांना वृक्ष लावण्याची इच्छा असते परंतु ते रोपं कुठून मिळवायचे हा प्रश्न असतो. त्यांना सहजतेने जवळपासच्या क्षेत्रात रोप उपलब्ध व्हावे म्हणून वन विभागाने "रोपे आपल्या दारी" हा कार्यक्रम २ कोटी, ४ कोटी, १३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमात राबविला होता, यावर्षी ही तो राबविण्यात येत आहे अशी माहिती वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
ते म्हणाले की, सहजतेने आणि कमी किंमतीत रोप उपलब्ध झाले की लोक हमखास वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी होतात हा अनुभव आहे. त्यादृष्टीने नुकताच वन विभागाने एक शासन निर्णय ही निर्गमित केला आहे. यात ९ महिन्याचे लहान पिशवीतील रोप जे इतरवेळी १५ रुपयांना विकले जात होते ते या वनमहोत्सवाच्या काळात ८ रुपयांना विकण्यात येईल तर १८ महिन्यांचे मोठ्या पिशवीतील रोप जे इतरवेळी ७५ रुपयांना विकले जात होते ते ४० रुपयांना मिळेल.  सिद्धीविनायक मंदिर परिसरात जागा उपलब्ध झाल्याने सवलतीच्या दरात रोपे या उपक्रमांतर्गत तिथे स्टॉल लावण्यात आला आहे. अशाच पद्धतीने गर्दीच्या ठिकाणी जिथून लोकांना रोप घेऊन जाणे शक्य आहे आणि जागा उपलब्ध होणार आहे तिथे ही सवलतीच्या दरात रोपे उपक्रमांतर्गत स्टॉल  उभारण्यात येतील. उद्देश हाच आहे की, अधिकाधिक लोकांनी या उपक्रमात रोप घेऊन ते लावावंजगवावं.


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget