मुंबई ( २५ जून २०१९ ) : पैठण तालुक्यातील जायकवाडी धरणाखालील दुष्काळी गावांना पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेची प्रलंबित कामे मार्च 2020 पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज विधानपरिषदेत दिली.
ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेची प्रलंबित कामाबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य सतीश चव्हाण यांनी मांडली त्याला उत्तर देताना शिवतारे बोलत होते.
शिवतारे म्हणाले, ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेचा भाग-2 या योजनेस 222.24 कोटी रुपये किंमतीची तृतीय प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण भाग 1 व भाग-2 मिळून एकंदर 18 हजार 787 हे. इतकी सिंचन क्षमता असून, त्यापैकी भाग-1 टप्पा 1 द्वारे 3 हजार 205 हे. वरील सिंचन निर्मिती होऊन योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
या योजनेची दि. 1 एप्रिल 2019 ची अद्यावत किंमत 521.17 कोटी रुपये इतकी असून, योजनेवर मार्च 2019 अखेर भूसंपादनसह 184.48 कोटी रुपये खर्च झालेला आहे. ही योजना पूर्णत्वासाठी आणखी 336.69 कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. त्यापैकी सन 2019-20 मध्ये एकूण 15.00 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. निधी उपलब्धतेनुसार उर्वरित कामे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती शिवतारे यांनी दिली. या चर्चेत सदस्य विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.
टिप्पणी पोस्ट करा