(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); बंजारा तांड्यांना ग्रामपंचायतीमध्ये गटाचा दर्जा देऊन विकास - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मराठी १ नंबर बातम्या

बंजारा तांड्यांना ग्रामपंचायतीमध्ये गटाचा दर्जा देऊन विकास - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गोर-बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

मुंबई ( १५ जुलै २०१९ ) : गोर-बंजारा जमातींच्या तांडा विकासासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध व्हावा यासाठी तांड्याला ग्राम पंचायतीमध्ये गटाचा दर्जा दिला जाईल. तसेच समाजाच्या शैक्षणिक व कौशल्य विकासाच्या योजनांसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. गोर-बंजारा जमातींच्या विविध मागण्यांकरीता शिष्टमंडळाने आज मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, आमदार निलय नाईक, हरिभाऊ राठोड, तुषार राठोड यांच्यासह गोर-बंजारा जमातीचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर पवार, राजू नाईक, आंध्र प्रदेशचे माजी मंत्री अम्मसिंग तिलावत, जमातीच्या संघटनांचे राज्यातील पदाधिकारी आदी उपस्थित होते.

पोहरागड येथील संत श्री. सेवालाल यांच्या समाधी स्थळासाठी भरीव विकास निधी दिल्याबद्दल, श्री. सेवालाल जयंती सुरू केल्याबद्दल तसेच गोर बोली भाषेचा आठव्या परिशिष्टात समावेश व्हावा यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस केल्याबद्दल समाजाच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बंजारा समाजाचे तांडे विकास प्रवाहापासून दूर राहत असल्याने, त्यांना ग्रामपंचायतींतर्गत स्वतंत्र गटाचा दर्जा देण्यात येईल. जेणेकरून वित्त आयोग आणि लोकसंख्येला प्रमाण म्हणून देण्यात येणारा निधीही विकासासाठी उपलब्ध होईल. याशिवाय तांडा विकासासाठी स्वतंत्रपणेही योजना राबविण्यात येईल. रस्ते, पाणी योजनांसाठीही प्राधान्याने निधी उपलब्ध होईल.

यावेळी बंजारा विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागांच्या वसतिगृहात वाढीव जागा देणे, समाजाच्या लोककलांचा राज्यांच्या सांस्कृतिक धोरणात समावेश करणे, पोहरागड येथील कौशल्य विकास केंद्राची स्थापना व कौशल्य विकासाच्या अभ्यासक्रमांसाठी निधी, गोर-बंजारा अकादमी स्थापन करणे, गोर-बंजारा समाज भवनासाठी जागा देणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात डॅा. वसंतराव नाईक अध्यासनाची स्थापना अशा विविध बाबींबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश देण्यात येईल असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. बंजारा बहूल जिल्ह्यांमध्ये गोर-बंजारा जमातीच्या कलाकुसरींसाठी क्लस्टर योजनेंतर्गत बाजारपेठ मिळवून देणे, जात प्रमाणपत्र व पडताळणी, तांड्यांसाठी जमिनी आदींबाबतही चर्चा झाली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget