(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पूर आणि साचलेल्या पाण्यातून जाणाऱ्यांनी लेप्टो प्रतिबंधक गोळ्या घ्याव्यात | मराठी १ नंबर बातम्या

पूर आणि साचलेल्या पाण्यातून जाणाऱ्यांनी लेप्टो प्रतिबंधक गोळ्या घ्याव्यात

- आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई ( २८ जुलै २०१९ ) : राज्यात मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कोकण विभाग, नाशिक, पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती तसेच पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा स्थितीत साथ रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा संभव लक्षात घेऊन आरोग्य विभागाने स्वाइन फ्लू, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस सारख्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य शिबीर आयोजीत करावीत, औषध आणि धूर फवारणी करावी, प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप करून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात, असे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

राज्याच्या काही भागात गेल्या दोन ते तीन तीन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. अशा वेळी साथरोग नियंत्रणात रहावे यासाठी आरोग्यमंत्र्यांनी आज तातडीची आढावा बैठक घेतली.

अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण झाल्यावर निर्जंतुक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा न झाल्यास दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा उद्रेक होऊ शकतो अशा वेळी आरोग्य यंत्रणेला घ्यावयाच्या प्रतिबंधक उपाययोजनांबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त गावांचा दौरा करतानाच त्या भागात वैद्यकीय पथक 24 तास उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी. औषधोपचाराबरोबरच ग्रामस्थांना निर्जंतुकीकरण केलेल्या पाण्याचा पुरवठा होण्यासाठी ब्लिचिंग पावडर, क्लोरीनच्या गोळ्या, आणि क्लोरीन द्रव यांचा वापर करण्याच्या सूचनाही आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांसाठी शाळा, मंगल कार्यालय, देवालय आदी ठिकाणी वैद्यकीय पथकांमार्फत नियमित आरोग्य तपासणी करून औषधोपचार करावा. पाणी ओसरलेल्या भागात जंतुनाशकाची फवारणी देखील करण्यात यावी. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने घरोघरी जलजन्य आजार, तसेच तापाचे रुग्ण याबाबत सर्वेक्षण करावे,अशा सूचना यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिल्या.

विशेषतः संपूर्ण कोकण विभाग नवी मुंबई, ठाणे, मुंबई या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त आहे तेथे पावसाचे पाणी साचल्यामुळे लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यूचा धोका निर्माण होऊ शकतो. यापरिस्थितीत आरोग्य विभागाने जनजागृती मोहिमेसोबतच स्थानिक महापालिकेच्या सहकार्याने डास उत्पत्ती रोखण्याकरीता धूर आणि औषध फवारणी करावी. पुराच्या अथवा पावसाच्या साचलेल्या पाण्यातून पायी चालत गेलेल्या नागरिकांना लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप करावे. आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या यांच्यामार्फत घरोघरी जाऊन आजारांबाबत सर्वेक्षण करावे. पूरग्रस्त भागात आणि पावसाचे पाणी साचलेल्या वसाहतींमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

शहरी भागात महापालिकेच्या सहकार्याने स्वच्छता मोहीमे सोबतच धूर फवारणी ग्रामीण भागात ग्रामपंचायतीमार्फत ही मोहीम राबवावी, अशी सूचनाही आरोग्यमंत्री यांनी केली. पावसाळ्यामध्ये लेप्टोस्पायरोसिस धोका उद्भवतो अशा वेळी शेतात काम करणाऱ्या मजुरांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यांचे आरोग्य शिक्षण करतानाच प्रतिबंधात्मक औषधे घेण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. राज्यात जानेवारी 2019 ते जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राज्यात सुमारे 45 हजार नागरिकांना मोफत स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. साथरोगांवरील औषधांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. स्वाइन फ्लूवरील उपचाराच्या सुमारे नऊ लाख गोळ्या उपलब्ध असल्याचा दिलासा देतानाच लेप्टोवर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय येथे उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

*लेप्टोच्या प्रतिबंधासाठी काय कराल:*
• दूषित पाण्यामुळे लेप्टोचा प्रादुर्भाव होतो
• भात व ऊस लागवड क्षेत्रात या रोगाचे प्रमाण जास्त
•शेतात काम करणाऱ्या मजुरांनी हात मोजे व चिखलात वापरायच्या बुटांचा वापर करावा
•शेती कामानंतर किंवा पुराच्या पाण्यातून चालत आल्यानंतर हात पाय गरम पाण्याने धुवावे
•पालेभाज्या स्वच्छ धुऊन खाव्यात
•गुरांच्या गोठ्याची स्वच्छता ठेवावी
•उंदरांची बिळे बुजविण्यात यावी
•हात-पायांवरील जखमांवर जंतू विरोधक मलम लावा
•ताप आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget