विधानसभा/लक्षवेधी
मुंबई ( १ जुलै २०१९ ) : ठाणे-बेलापूर महामार्गावर कळवा खाडीवरील काम सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाला शाखापूल (आर्मब्रीज) बांधण्याबाबतची व्यवहार्यता तपासून पाहण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी विधानसभेत सांगितले.
ठाणे- बेलापूर महामार्गावरील विटावा रेल्वे पुलाखालील बोगद्यात पाणी साचत असल्याने आणि एक बोगदा दुरुस्तीसाठी बंद ठेवल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यास उत्तर देताना सागर बोलत होते.
वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यातसाठी सध्या काम सुरू असलेल्या पुलाची लांबी वाढविण्याच्या मागणीवर बोलताना सागर यांनी यावेळी माहिती दिली की, विटावा रेल्वेपुलाखालील बोगद्याची पातळी लगतच्या खाडीच्या भरतीप्रसंगीच्या पाणीपातळीपेक्षा कमी असल्याने बोगद्यामध्ये पाणी येते ही वस्तुस्थिती आहे. हे पाणी काढण्यासाठी तेथे पंप बसविण्यात आलेले आहेत. पाणी साचत असल्याने वाहतुकीस अडथळा येतो. कळवा खाडीवरील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक असल्यामुळे 2010 मध्ये बंद करण्यात आला आहे. सध्या 1995-96 मध्ये बांधलेल्या पुलावरुन वाहतूक सुरू आहे.
ठाणे महानगरपालिकेने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एक अतिरिक्त पूल बांधण्याचे नियोजन 2012-13 मध्ये केले. त्याचे 65 टक्के काम झाले आहे. पुलाची वाढणारी लांबी आणि खर्च तसेच मुख्य रेल्वे लाईनवर काम करण्यासाठी मिळणारा मर्यादित वेळ पाहता या पुलाचे संकल्पन (डिझाईन) रेल्वे लाईन खालील मार्गापासून 360 मीटर आधी संपते अशा लांबीचे करण्यात आले. या पुलाच्या उतरणीच्या 405 मी. लांबीपैकी 260 मीटर लांबीचे काम झाले आहे. त्यामुळे या पुलाची लांबी वाढविणे शक्य नाही. मात्र त्यास एखादा शाखापूल (आर्मब्रीज) बांधता येण्याच्या शक्यतेची व्यवहार्यता तपासण्यात येईल व तसे शक्य असल्यास पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही सागर म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा