(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); गुन्ह्यांचा शोध गतिमान करणाऱ्या ‘अॅम्बिस’ प्रणालीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ | मराठी १ नंबर बातम्या

गुन्ह्यांचा शोध गतिमान करणाऱ्या ‘अॅम्बिस’ प्रणालीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई, दि. 29 : सुमारे सहा लाख गुन्हेगारांची छायाचित्रे, बोटांचे ठसे, डोळ्यांचे बुबुळ इत्यादींचा एकत्रित डेटाबेस ऑनलाईन उपलब्ध करुन देणाऱ्या ‘ॲम्ब‍िस’ प्रणालीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुभारंभ केला. देशात अशा प्रकारची जागतिक प्रणाली उपयोगात आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी आनंद व्यक्त केला.

गुन्हेगारांची माहिती तत्काळ देतानाच गुन्हे व अपराध सिद्धीचे प्रमाण वाढविण्यास ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. गुन्हे तपासात गुणात्मक फरक जाणवतानाच गुन्ह्यांचा शोध ते गुन्हेगाराला शिक्षा होण्यासाठी अॅम्बिस प्रणाली महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी पोलीस आयुक्तालयातील जे.एस. भरुचा सभागृहाचे उद्‌घाटन, कचरा मुक्त मोहिमेचा शुभारंभ आणि मुंबई पोलिसांच्या रक्षक हैं हम या अभियानाचा
शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. यावेळी गृह राज्यमंत्री दिपक केसरकर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे, पोलीस गृह निर्माण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन बिहारी, महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र सायबरने पुढाकार घेऊन सुरु केलेल्या ॲम्बिस प्रणालीचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. या प्रणालीचे लोकार्पण करताना मुख्यमंत्री म्हणाले, नवनवीन तंत्रज्ञानाचे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध असल्याने कायदा व सुव्यवस्था उत्तमपणे राखण्यासाठी मदत होत आहे. या माध्यमातूनच गुन्हेगारांच्या बोटांचे ठसे, हाताचे तळवे, चेहरा व डोळ्यांचे स्कॅनिंग साठविण्यासाठी ॲम्बिस (ऑटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेन्टिफिकेशन सिस्टीम) प्रणाली गुन्ह्यांच्या तपासाची गती वाढवणारी ठरेल. त्या माध्यमातुन गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

पोलीस दलाने आधुनिकीकरणाची कास धरताना आरोपींचे फिंगर प्रिंट घेण्याची कालबाह्य पद्धत बदलून आता केवळ बोटांचे ठसेच नाही तर हाताचे तळवे, चेहरा व डोळ्यांचे स्कॅन करुन ते डिजिटल पद्धतीने साठवून ठेवण्यात येणार असल्याने गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे ॲम्बिस प्रणाली पोलीसांचे गुगल म्हणून नावारुपास येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात सीसीटीव्ही, सीसीटीएनएस आणि ॲम्बिस प्रणालीचा वापर सुरु केल्यानंतर गुन्हेगारास तत्काळ अटक होतानाच गुन्हे व अपराध सिद्धीचे प्रमाण वाढले आहे. मुंबईत बसविलेल्या सीसीटीव्हीतच शहरातील प्रत्येक भागावर नजर ठेवणे शक्य झाले आहे. त्यामुळे मुंबईत निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती, अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली परिस्थिती, सणासुदीच्या काळात वाहतूकीत करावयाचे बदल हे या माध्यमातून शक्य झाले आहे असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.

मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त मोहिमेतून कचरामुक्त मुंबई अभियान सुरु करण्यात आले आहे. सगळ्यांना एकत्रित करुन लोक, समाज आणि प्रशासन एकत्र आले तर त्यातून निर्माण होणाऱ्या उर्जेतून सकारात्मक कार्य घडते हे स्वच्छ भारत अभियानातून दिसून आले आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कचरामुक्त मुंबईद्वारे लोकांच्या सवयी बदलताना प्रबोधनाबरोबरच शासनही आवश्यक असल्याचे सांगत यामुळे केवळ बाह्य मुंबई नव्हे तर अंतर्गत मुंबईतला भाग स्वच्छ करावा, नाले, गटारी स्वच्छ ठेवून निर्मळ वातावरण राखण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. या उपक्रमाला मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.

मुंबई पोलीसांनी सुरु केलेल्या ‘रक्षक हैं हम’ या विशेष अभियानाच्या माध्यमातून लोकांमध्ये विश्वास निर्माण करतानाच पोलीस मित्र वाटले पाहिजे असे वातावरण तयार होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘रक्षक हैं हम’ अभियानाच्या माहितीपट आणि जाणीव जागृतीपर पोस्टरचे अनावरण यावेळी करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त परदेशी, मुंबई पोलीस आयुक्त बर्वे यांची भाषणे झाली. कचरामुक्त मुंबई मोहिमेच्या माध्यमातून पोलीस आणि महापालिका यंत्रणा एकत्रित आल्याने शहर स्वच्छ होतानाच गुन्हेगारी कमी होऊन नागरिकांचे जीवनमान उंचावेल असे यावेळी त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यावेळी म्हणाले, ॲम्बिस प्रणाली देशातील पहिली प्रणाली असून गुन्हेगारांची संपूर्ण माहिती याद्वारे मिळणार आहे. मुंबईतील 94 पोलीस ठाण्यांमध्ये पायलट प्रकल्प म्हणून ही प्रणाली राबविण्यात येत आहे. सुमारे 200 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना या प्रणालीचे प्रशिक्षण दिले आहे असेही त्यांनी सांगितले.

यावेळी ॲम्बिस प्रणालीसाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस निरिक्षक अविनाश सरवीर, रुपाली गायकवाड, सुरेश मगदून, सहायक पोलिस निरिक्षक प्रसाद जोशी, उल्हास भाटले, संदीप
जाधव यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कचरामुक्त मुंबईत काम करणाऱे समन्वयक अधिकारी सुभाष दळवी, मुंबई महापालिकेचे सह आयुक्त अशोक खैरे यांचा सत्कारही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

अशी आहे अॅम्बिस प्रणाली

जुन्या व पारंपरिक पद्धतींनी होणाऱ्या कामकाजाची परिभाषा बदलून राज्य पोलिस दलाने आता आधुनिकीकरणाची कास धरली आहे. आरोपींचे फिंगरप्रिंट घेण्याची कालबाह्य पद्धत बदलून आता फक्त फिंगरप्रिंटच नाही तर आरोपीच्या हाताचे तळवे, चेहरा व डोळ्यांचे स्कॅन करून या सर्वांची डिजिटल पद्धतीने साठवणूक करण्याचा निर्णय राज्य पोलीस दलाने घेतला आहे. यासाठी अद्ययावत अशी ‘अॅम्बिस’ (ऑटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेन्टिफिकेशन सिस्टीम) प्रणाली विकसित केली गेली आहे. या
प्रकल्पाअंतर्गत पोलीस ठाण्यांमध्ये संगणक आणि हाताचे तळवे, चेहरा व डोळ्यांचे स्कॅन करण्यासाठीची यंत्रसामग्री दिली जाणार आहे. तसेच दिली गेलेली ही यंत्रणा थेट मुख्य डेटाबेस शी जोडलेली असणार आहे.

• जगातील सर्वोत्तम अशी‘अँम्बिस’ प्रणाली वापरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य

• डोळ्यांचे, हाताच्या तळव्यांचे स्कॅन यांचा वापर करून गुन्हेगाराचा अचूक शोध घेण्यास मदत

• 41 युनिटमधील, 1160 पोलीस ठाण्यात उपलब्ध होणार ही सुविधा

* 2600 पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणार प्रणाली वापरण्याचे प्रशिक्षण.

• एका क्लिक वर मिळणार आरोपींची सर्व माहिती

• फिंगर प्रिंट गोळा करण्यासाठी मोबाइल स्कॅनरचा वापर

• सी.सी.टी.एन.एस आणि सीसीटीव्ही शी कनेक्टेड

• नवीन सिस्टीम नुसार डिजिटल स्वरूपात साठवले जुने साडेसहा लाख बोटांचे ठसे

• 1435 चान्सप्रिंट्स प्रणाली मध्ये उपलब्ध

• पहिल्याच दिवशी शोधल्या 85 गुन्ह्यांशी संबंधीत 118 चान्सप्रिंट्स

'ॲम्बिस' प्रणालीची अंमलबजावणी आणि पोलीस दलास हस्तांतरण करण्याची जबाबदारी सायबर विभागाला देण्यात आली आहे. 'ॲम्बिस' प्रणाली आयडेमिया या कंपनीला ही प्रणाली विकसित करण्यात गुन्हे अन्वेषण विभागातील तांत्रिक प्रतिनिधी, स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि आयआयटीमधील तज्ज्ञांनी योगदान दिले आहे. प्राईस वॉटर हाऊस कूपर्स या कंपनीने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget