विधानसभा/लक्षवेधी
मुंबई ( १ जुलै २०१९ ) : प्रधानमंत्री पीक विमा योजनेची रक्कम विमा कंपनीकडे न भरता अनियमितता केल्याच्या प्रकरणात बोबडे टाकळी (ता. परभणी) येथील संग्राम कक्ष संगणक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात बाधित शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांप्रमाणे पीक विम्याची नुकसान भरपाई मिळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल, असे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज विधानसभेत सांगितले.
परभणी तालुक्यातील पीक विम्याच्या अनुषंगाने सदस्य डॉ. राहुल पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. या चर्चेत सदस्य अजित पवार यांनीही सहभाग घेतला. बोबडे टाकळी येथील शेतकऱ्यांनी 2018-19 च्या खरीप व रबी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत तेथील ग्रामपंचायतमधील संग्राम कक्षाच्या संगणक चालकाकडे विम्याची रक्कम आणि अर्ज भरला होता. त्यापैकी काहींना पोहोच पावत्या दिल्या होत्या आणि काहींना नंतर देण्यात येईल असे सांगण्यात आले होते. तथापि, संबंधित संगणक चालकाने शेतकऱ्यांना बनावट पावत्या दिल्याचे आढळून आले असून या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिन्याभरात या प्रकरणात पोलीस चौकशी पूर्ण करण्यात येईल, असेही खोत यांनी यावेळी सांगितले.
पीक विम्याच्या अनुषंगाने तक्रार निवारण तसेच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तालुका स्तरावर सुविधा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी जिल्हा व तालुका स्तरावर उपस्थित राहण्याबाबत निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांना अधिक नुकसानभरपाई मिळण्याच्या दृष्टीकोनातून पीक विम्याचा जोखीम स्तर वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही खोत म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा