(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); हाफकिन संस्थेच्या संग्रहालयाला पर्यटन नकाशावर स्थान - जयकुमार रावल | मराठी १ नंबर बातम्या

हाफकिन संस्थेच्या संग्रहालयाला पर्यटन नकाशावर स्थान - जयकुमार रावल

मुंबई ( १२ जुलै २०१९ ) : देशातील पहिल्या जीव - वैद्यकीय संशोधन संस्थेच्या अर्थात हाफकिन संस्थेच्या संग्रहालयाला मुंबई तसेच महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर स्थान देण्यात येईल. या संस्थेला ‘मेडीकल सायन्स टुरीजम’ क्षेत्रातील प्रमुख केंद्र बनविण्यात येईल. यासाठी एमटीडीसी आणि पर्यटन विभागामार्फत मान्यता देण्यात येईल, असे राज्याचे पर्यटन आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी येथे घोषीत केले.

हाफकिन संशोधन, प्रशिक्षण व चाचणी संस्थेच्या संग्रहालयाला त्यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेच्या संचालक डॉ. निशिगंधा नाईक यावेळी उपस्थित होत्या.

रावल म्हणाले, हाफकिन संस्थेला मोठा ऐतिहासीक वारसा आहे. देशात प्लेगची साथ आली तेव्हा त्यावर लस तयार करुन या संस्थेने फार मोठे कार्य केले होते. येथील हाफकिन यांची वास्तू, संग्रहालय, जुने राजभवन, दरबार हॉल आदी ठिकाणे पर्यटक, विद्यार्थी, अभ्यासक आदींसाठी आकर्षणाची केंद्रे आहेत. त्यामुळे या सर्व स्थळांना पर्यटन नकाशावर आणून त्याच्या विकासासाठी चालना दिली जाईल, असे त्यांनी यावेळी जाहीर केले.

हाफकिन संस्थेच्या संग्रहालयाला भेट दिल्यानंतर जगाच्या उद्धारासाठी काम करणाऱ्या या ऐतिहासिक संशोधन केंद्राचे काम बघून थक्क झालो आहे, अशी भावना व्यक्त करुन रावल यांनी विज्ञानातील ऐतिहासिक व आधुनिक घडामोडींचा सुरेख मेळ संग्रहालयात पाहायला मिळाल्याचे सांगितले. अशा ऐतिहासिक संशोधन संस्थेला सर्वांनीच सहाय्य दिले पाहिजे, असा अभिप्रायही रावल यांनी संग्रहालयाच्या अभ्यागत पुस्तकात लिहिला.

हाफकिन संस्थेच्या संग्रहालयाला राष्ट्रीय संग्रहालयाचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी अलिकडेच संस्थेने शासनाच्या योजनेंतर्गत टाटा ट्रस्टबरोबर समन्वय करार केला आहे. आता रावल यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे हाफकिन संग्रहालयाला पर्यटन नकाशात स्थान मिळावे यासाठी संस्था लवकरच औपचारिक विनंती प्रस्ताव देईल, असे संचालक डॉ. निशिगंधा नाईक यांनी यावेळी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget