विधानसभा/तारांकित प्रश्न
मुंबई ( १ जुलै २०१९ ) : भूजलपातळीत वाढ करण्यासाठी हायड्रो फ्रॅक्चरिंग तंत्रज्ञानाचा अधिकाधिक अवलंब करण्यात येईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज विधानसभेत सांगितले.
राज्यातील विशेषत: पश्चिम विदर्भातील भूजल पातळीत वाढ करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याबाबत सदस्य रणधीर सावरकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. गतवर्षी पाऊस कमी झाल्याने भूजल पातळी खोल झाल्याची बाब खरी आहे. यावर जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शासनाने अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पाणलोटाची कामे, साखळी सिमेंट नाला बांध, जुने नालाबांध, जलस्रोतातील गाळ काढणे, जलस्रोत बळकटीकरण, विहीर पुनर्भरण आदी काम हाती घेतली आहेत. अतिशोषित पाणलोट क्षेत्रांमध्ये 200 फूटाहून अधिक खोलीची कुपनलिका घेण्यास प्रतिंबध करण्यात आलेला आला आहे. विदर्भातील घटलेली भूजलाची पातळी लक्षात घेऊन हायड्रो फ्रॅक्चरिंग तंत्रज्ञानावर अधिक लक्ष देण्यात येईल, असेही लोणीकर म्हणाले.
एका उपप्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले, गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या उद्भवापासून 500 मीटरच्या आत खासगी विहीर किंवा कुपनलिका खोदण्यास बंदी असून याबाबतच्या तक्रारींवर कठोर कारवाई करण्यात येईल. दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले, अमृत योजनेत समाविष्ट केलेल्या 44 शहरांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते शेतीसाठी देण्याचे धोरण आहे. ग्रामीण भागामध्ये सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापनाद्वारे प्रदुषणावर आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या प्रश्नावरील चर्चेत सदस्य सर्वश्री सुनील देशमुख, जयकुमार गोरे यांनी सहभाग घेतला.
टिप्पणी पोस्ट करा