(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); अडीच लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात प्रशासनाला यश | मराठी १ नंबर बातम्या

अडीच लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात प्रशासनाला यश

मुंबई ( ९ ऑगस्ट २०१९) : कोल्हापूर व सांगलीत पुरामध्ये अडकलेल्या आतापर्यंत 2 लाख 52 हजार 813 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.

शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, नौदल, वायूदल, तटरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून केंद्र शासनाकडून मदत घेण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे राज्य शासनाच्या संपर्कात असून केंद्राकडून लागेल ती मदत करण्यासाठी सूचना दिल्या असल्याची माहिती महसूल पाटील यांनी दिली.

कोल्हापूर व सांगलीमध्ये जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाचे जवानासह महसूल, जलसंपदा, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह इतर सर्व विभागाचे कर्मचारी व अधिकारी अहोरात्र पूरग्रस्तांच्या बचाव कार्यासाठी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून राबत आहेत. स्थानिक प्रशासनाबरोबरच ओडिसा, पंजाब व गुजरात राज्यातील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे 22 तसेच नौदलाच्या 26, तटरक्षक दलाचे सांगलीमध्ये 2 व कोल्हापुरात 9 पथके, सैन्यदलाचे 8 पथके, राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे सांगलीमध्ये दोन तर कोल्हापुरात एक अशी तीन पथके कार्यरत आहेत. तसेच कोल्हापुरात 76 तर सांगलीमध्ये 90 बोटींद्वारे बचाव कार्य सुरू आहे.

पूरपरिस्थितीबद्दल राज्य शासनाने केंद्र शासनाशी तत्काळ संपर्क साधल्यामुळे सैन्य दलाची व तटरक्षक दलाची पथके कार्यरत झाली आहेत. मदत व पुनर्वसन विभागाचे आपत्ती नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत असून वेळोवेळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाबरोबर मदती संदर्भात संपर्कात आहे.

सध्या कर्नाटकातील आलमट्टी धरणातून आज सायंकाळपर्यंत 4 लाख 80 हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येत असून त्यामुळे कोल्हापुरातील पाणी पातळी कालच्या पेक्षा कमी झाली आहे. तसेच सांगलीतील पाणी पातळी स्थिर आहे. पाऊस कमी झाल्यानंतर या ठिकाणची पाणीपातळी आणखी कमी होण्यास मदत होईल.

पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्य शासनाने 154 कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यातून ग्रामीण भागातील आपत्तीग्रस्त नागरिकांना प्रति कुटुंब 10 हजार तर शहरी भागातील प्रति कुटुंब 15 हजार रुपये मदत करण्यात येणार आहे. ही मदत तातडीने वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 239 गावे व सांगली जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 90 गावे अशी 12 तालुक्यातील 329 गावे पुरामुळे बाधित झाली आहेत. पुरामुळे बाधित गावातील दोन लाख 52 हजार जणांना बचाव पथकानी सुरक्षितस्थळी हलविले असून विविध 270 ठिकाणी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवासाच्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

सांगली जिल्ह्यातील सांगलवाडी व हरिपूर येथे एनडीआरएफ व एसडीआरएफची टीम बचाव कार्य सुरू करत आहेत. सांगलवाडीत वीस ते बावीस बोटीद्वारे बचावकार्य सुरू आहे. एअरलिफ्टिंगने नागरिकांना हलविण्यात येत आहे. हरिपूरमध्येही बोटीतून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मिरज, पलूस व वाळवा तालुक्यातही प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांच्या राहण्याची, जेवणाची व औषधोपचाराची सोय केली आहे. याबरोबरच जनावरांच्या बचावासाठीही प्रयत्न सुरू आहेत. कवलापूर येथे तीन हेलिकॉप्टरने बचावकार्य सुरू आहे.

पूरग्रस्त भागात अन्न पाकिटे, पिण्याचे पाणी तसेच औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे. कोल्हापूर शहरामधील पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. तसेच ज्या ठिकाणी अद्याप पाणी आहे तेथील नागरिकांना सुखरुप काढण्यात येत असून वृद्ध व आजारी नागरिकांना प्राधान्याने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. तसेच जे नागरिक उंचावर सुरक्षित ठिकाणी आहेत, त्यांना फळे, अन्न पाकिटे व पाणी पुरवठा करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे कोल्हापुरात सर्वत्र पोचून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या मदतीचे नियोजन करण्याचे काम करत आहेत. पूरग्रस्तांना ठेवण्यात आलेल्या तात्पुरत्या निवासस्थानी पाटील स्वतः जाऊन तेथील नागरिकांची चौकशी करत असून आवश्यक तेथे अन्न, औषधे व इतर साहित्याचा पुरवठा करण्यासंदर्भात सनियंत्रण करत आहेत.

कोल्हापुरातील पूरपरिस्थिती सामान्य करण्याचे काम वेगाने सुरू आहे. शिरोळ तालुक्यात मदतीसाठी पथके पाठविण्यात आली आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी राज्य व केंद्र शासन सर्व मार्गाने प्रयत्न करत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget