(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); प्रतिभावंत कलाकार आणि कलाप्रकारांना गौरविण्यासाठी पुरस्कार पुनर्गठन समिती नेमणार | मराठी १ नंबर बातम्या

प्रतिभावंत कलाकार आणि कलाप्रकारांना गौरविण्यासाठी पुरस्कार पुनर्गठन समिती नेमणार

Add caption
मुंबई ( ३० ऑगस्ट २०१९) : कला क्षेत्रातील नाविन्यपूर्ण आणि वेगवेगळ्या कलांना वाव देऊन, भावी कलाकारांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारून प्रतिभावंत कलाकार वर्ग निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने पुरस्कार पुनर्गठन समिती नेमणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी दिली.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान सोहळा आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार घोषित मान्यवरांचा सत्कार सोहळा रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे उप सचिव विलास खाडे, राज्य संचालनालयाचे सदस्य समिती यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

तावडे म्हणाले, राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने गेल्या पाच वर्षात ७५ पुरस्कार प्रदान केले. कलाकारांना दिलेल्या पुरस्कारांविषयी सहकाऱ्यांसोबत चर्चा केल्यावर आपण तेच १२ पुरस्कार परंपरागत देत आहोत असे निष्कर्षात आले. महाराष्ट्रात विविध क्षेत्रातील विविध कला आणि कला प्रकार आहेत. नवनवीन कलांना वाव देऊन प्रतिभावंत कलाकार घडविणे आवश्यक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने पुरस्कार पुनर्गठन समिती नेमण्यात आली आहे. ही समिती कला प्रकार लक्षात घेऊन पुरस्कारांची संख्या वाढविण्यासाठी विचार करेल, या समितीमध्ये कला क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असेल, पुरस्कारासाठी योग्य उमेदवार याबाबत प्रारूप माहिती किंवा सूचना शासनाच्या वेबसाईटवर देता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तावडे पुढे म्हणाले, राज्य सांस्कृतिक पुरस्कार निवड समितीने खरे कलाकार शोधले, त्यांच्या मेहनतीचे फलित म्हणून योग्य कलाकाराचा सन्मान झाला, कोणतीही कला राजश्रित न होता राजपुरस्कृत व्हावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या निवड समितीचे विशेष अभिनंदन केले. मनोरंजन करण्याबरोबरच प्रबोधन करण्याचे काम कलाकार मंडळी करीत असतात. पडद्यावर पाहिलेले प्रेक्षकांना सहज पटते, रुजते आणि भावतेही आणि त्यामुळेच समाजाला दिशा देण्याच्या कामात कलाकारांचा मोठा वाटा असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

तावडे यावेळी म्हणाले, कोणत्याही समाजाची संस्कृती ही त्या समाजाचे आणि राज्याचे खरे वैभव असते. महाराष्ट्राला मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला असून हे क्षेत्र अधिक समृद्ध करण्यासाठी राज्य शासन कटीबध्द आहे. विविध लोककला, संस्कृती, चित्रपट, नाटक, पारंपरिक वादयसंगीत यास प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत. यापुढेही शासनाची भूमिका ही कलावंताच्या मागे भक्कमपणे उभे राहणे अशीच आहे. महाराष्ट्राच्या सर्वागीण विकासात अनेकांचे योगदान असून त्यामध्ये अनेक कलाकारांचा सिंहाचा वाटा आहे. साहित्य, कला व संस्कृतीचे जतन करणारे आणि या समृद्ध परंपरांना जोपासणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची देशात ओळख आहे. ही ओळख जपण्याऱ्या कलावंतांचा, साहित्यिकांचा जनतेच्या वतीने सन्मान करण्याची शासनाची भूमिका आहे.

सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 12 ज्येष्ठ मान्यवर व्यक्तींना त्या त्या कलाक्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाटक विभागासाठी सतीश पुळेकर, कंठ संगीतासाठी कमल भोंडे, उपशास्त्रीय संगीतासाठी मंगलाताई जोशी, मराठी चित्रपटासाठी मनोहर आचरेकर, कीर्तनासाठी तारा राजाराम देशपांडे ,शाहिरीसाठी शाहीर अंबादास तावरे, नृत्यासाठी रत्नम जनार्धनम्, आदिवासी गिरीजनसाठी नीलकंठ शिवराम उईके, वाद्यसंगीतासाठी अप्पा वढावकर, तमाशासाठी हसन शहाबुद्दीन शेख, लोक कलेसाठी लताबाई सुरवसे आणि कलादानसाठी सदाशिव देवराम कांबळे यांना आज पुरस्कार देण्यात आला. १ लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, चित्रपट (मराठी), कीर्तन, शाहिरी, नृत्य, आदिवासी गिरीजन, कलादान, वाद्यसंगीत, तमाशा लोककला या बारा क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या ज्येष्ठ कलाकाराला सन १९७६ पासून राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्यांचाही झाला सन्मान

या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये केंद्र शासनाच्या संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार विजेते अकादमी रत्न उस्ताद झाकीर हुसेन, सुगम संगीतासाठी सुरेश वाडकर, नाट्यलेखनासाठी राजीव नाईक, अभिनयासाठी सुहास जोशी यांचाही सत्कार राज्य शासनाच्या वतीने करण्यात आला.

संस्कृतिरंग या कार्यक्रमातून राज्य सांस्कृतिक पुरस्कारांच्या मानकऱ्यांना त्यांच्या शिष्यांकडून आणि मराठी कलासृष्टीतील कलाकारांकडून यावेळी मानवंदना देण्यात आली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget