(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातून समाजजागृतीचे कार्य - रविंद्र वायकर | मराठी १ नंबर बातम्या

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातून समाजजागृतीचे कार्य - रविंद्र वायकर

मुंबई ( १ ऑगस्ट २०१९) : समाजासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तिला समाज कधीही विसरत नाही. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी साहित्याच्या माध्यमातून समाजजागृती करण्याचे कार्य केले. त्यांचे विचार आणि कार्य समाजाच्या कायम स्मरणात राहील, असे मत उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी आज व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई विद्यापीठाचे शाहीर अमरशेख अध्यासन व लोककला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी समारंभाचे आयोजन आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवनमध्ये करण्यात आले. या समारंभाच्या उद्घाटनप्रसंगी वायकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्‍थानी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. सुहास पेडणेकर, प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष शेखर सेन, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर, 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे आदी उपस्थित होते.

वायकर यावेळी म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांनी त्या काळात साहित्याच्या क्षेत्रात दूरदृष्टीने विचार केला होता. त्यांच्या दूरदृष्टीसारखा आजही विचार केला पाहिजे. आजच्या काळात रुढी आणि परंपरांमध्ये न जखडता पुढे जात संशोधनकार्यावर भर देणे गरजेचे आहे. संस्कृती जतन करत असतानाच समाजाला उपयोगी संशोधन करण्यावर भर दिला पाहिजे. कौशल्यपूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देण्याची आवश्यकता असून विद्यापीठांनी पुढील 10 वर्षात समाजाची आणि बाजारपेठेची मागणी काय असेल याचा विचार करुन आजचे अभ्यासक्रम तयार केले पाहिजेत, असेही ते म्हणाले. मुंबई विद्यापीठात होत असलेल्या ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कला आणि संस्कृती केंद्र’ मध्ये राज्यातील कला, संस्कृतीचे यथोचित दर्शन होईल या दृष्टीने रचना करण्यासाठी प्रयत्न होतील, असेही ते म्हणाले.

डॉ. पेडणेकर म्हणाले, लोककला अकादमी आणि शाहीर अमरशेख अध्यासन ही मुंबई विद्यापीठाची मोठी देण आहे. राज्याची लोककला संपन्न आहे. हा वारसा जतन करण्यासाठी विद्यापीठाकडून अध्यासनांना आवश्यक ते आर्थिक पाठबळ देण्यात येईल.

सेन म्हणाले,अण्णा भाऊंनी वंचित आणि शोषितांसाठी संघर्षाचा पाया रचला. त्यांनी साहित्यातून वंचितांचा आवाज समाजापर्यंत पोहोचविला. महाराष्ट्राच्या मूळ संस्कृतीचे, साहित्य, कलेचे अभिलेख स्वरुपात जतन होण्याची आवश्कता आहे. संगीत नाटक अकादमीतर्फे अण्णा भाऊ साठे यांच्या गाथा गायन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी सेन यांनी दिली.

यावेळी करंबेळकर, डॉ. अरुणा ढेरे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमरशेख अध्यासनाचे समन्वयक डॉ. प्रकाश खांडगे यांनी केले. तर स्वागत विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभाग प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांनी केले.

प्रारंभी विश्वकोश मंडळाच्या संकेतस्थळावरील लोकसाहित्य, लोकसंस्कृती ज्ञानमंडळाच्या नोंदींचे प्रकाशन वायकर यांच्या हस्ते संगणकावरील कळ दाबून करण्यात आले.

कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, पुण्यनगरीच्या संपादक राही भिडे, मुंबई विद्यापीठाच्या ॲकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्‌चे संचालक योगेश सोमण तसेच विद्यापीठातील विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget