(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); अरुण जेटली यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख | मराठी १ नंबर बातम्या

अरुण जेटली यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख

मुंबई ( २४ ऑगस्ट २०१९) : माजी केंद्रीय अर्थ, माहिती व प्रसारण व वाणिज्य मंत्री अरुण जेटली यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

“अरुण जेटली देशातील एक द्रष्टे मुत्सद्दी, कायदेतज्ज्ञ, प्रतिभासंपन्न संसदपटू तसेच उत्कृष्ट केंद्रीय मंत्री होते. अमोघ वक्तृत्वकला लाभलेले जेटली राष्ट्राकरिता अनमोल रत्न होते.

केंद्रीय वित्त, कॉर्पोरेट, वाणिज्य, उद्योग यांसह इतर अनेक मंत्रालयांचा कारभार सांभाळताना जेटली यांनी आपल्या कामकाजाचे मापदंड निर्माण केले. त्यांनी जनसामान्यांच्या हितासाठी पथदर्शी निर्णय घेतांना उद्योग व व्यवसाय यांच्या वाढीसाठी देखील पूरक निर्णय घेतले. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात जेटली यांच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून काम करण्याचा आपल्याला बहुमान मिळाला. सोबत काम करणाऱ्या सर्वांना ते मार्गदर्शन करीत. त्यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.

(तेलंगणा राज्यनिर्मितीचे विधेयक राज्यसभेसमोर मांडले जात असताना आपण आता तेलंगणाचे मुख्यमंत्री असलेले के. चन्द्रशेखर राव तसेच खासदार खासदार केशव राव यांचेसह जेटली यांची भेट घेऊन तेलंगणा संबंधित विविध विषयांवर माहिती दिली होती. या भेटीचे छायाचित्र तसेच जेटली यांचेसमवेत केरळ दौर्‍यावर गेलो असताना घेतलेले छायाचित्र आहे.)

-----०००-----

श्रेष्ठ संसदपटू आणि कुशल प्रशासक गमावला - मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने एक श्रेष्ठ संसदपटू, आणिबाणीविरूद्ध कठोर संघर्ष करणारा नेता, मानवी हक्कांचा खंदा समर्थक, एक उत्तम व निष्णात विधिज्ञ आणि संघर्षशील नेतृत्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, जेटली यांच्या निधनाने मी अतिशय व्यथित झालो आहे. अगदी तरुण वयात एक उमदा विद्यार्थी नेता म्हणून राजकारणात सक्रीय झालेल्या जेटलीजींनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आपल्या नेतृत्वगुणांची चमक दाखवली होती. मोदी सरकारच्या पहिल्या पर्वात अर्थमंत्री म्हणून त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली. या कालावधीत अत्यंत क्रांतिकारी अशा निर्णयांनी त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबुती दिली होती. जीएसटीच्या अंमलबजावणीत त्यांनी दिलेले योगदान कायम अधोरेखित होत राहील. राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळताना वरिष्ठांच्या या सभागृहातील विविध चर्चा वादविवादांना त्यांनी एक अनोखी उंची प्राप्त करून दिली होती. महिला आरक्षण, जनलोकपाल विधेयक अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांचा आग्रही पुढाकार मूल्यांशी बांधिलकी दर्शवणारा होता. प्रकृती प्रतिकूल असतानाही 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पडद्याआड आपल्या क्षमतांचा पूर्ण विनियोग करतानाच जवळजवळ प्रत्येक दिवशी ब्लॉगच्या माध्यमातून लेखन करीत प्रचारात स्वत:ला झोकून दिलेले आम्ही त्यांना पाहिले आहे. तसेच प्रकृती साथ देत नसतानाही अलिकडच्या काळात भाजपाच्या प्रत्येक बैठकांमध्ये ते उपस्थित राहत. त्यांचा समर्पण भावच त्यातून दिसून येतो. देशाचे अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, माहिती आणि प्रसारणमंत्री, विधि व न्याय विभागाचे मंत्री, राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी देशाची केलेली सेवा कायम स्मरणात राहील. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना त्यांनी नेहमी पाठिंबा दिला. अटलजी, पर्रिकरजी, सुषमाजी यांच्या पाठोपाठ जेटलीजींच्या निधनाने संसदीय राजकारणातील अतिशय अभ्यासू असे व्यक्तिमत्त्व आपण गमावले असून माझीही वैयक्तिक हानी झाली आहे.

-----०००-----

सर्वसमावेशक- मनमिळावू नेतृत्वाचा अस्त-सुधीर मुनगंटीवार

सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या त्यांच्या भुमिकेमुळे जीएसटीची अंमलबजावणी यशस्वी

माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या निधनाने देशपातळीवर सर्वसमावेशक विचार करणारं, मनमिळावू, मुत्सदी, प्रचंड विद्वान असं जेष्ठ नेतृत्व काळाने आपल्यातून हिरावून घेतलं आहे. ही राष्ट्राची मोठी हानी आहे. एक मोठा आधारवड आज हरवला आहे अशा शब्दात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

पेशाने वकिल असलेले अरूण जेटली हे अतिशय विनम्र, अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या स्वभावामुळे विरोधक ही त्यांच्या प्रेमात पडत असत असं सांगून मुनगंटीवार म्हणाले की, देशात वस्तू आणि सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीच्यानिमित्ताने वारंवार त्यांच्याशी संवाद साधण्याचा, त्यांच्यासमवेत बैठकांमध्ये सहभागी होण्याचा योग आला. त्यावेळी त्यांचे सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व जे सर्वांना भारून टाकणारे होते ते पहायला मिळाले. त्यांच्या सर्वसमावेशक दृष्टीमुळे जीएसटीचे सर्व निर्णय पक्षीय भेद न राहता ना केवळ एकमताने तर ते एक दिलाने मंजूर झाले. सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळेच देशात या करप्रणालीची अंमलबजावणी यशस्वी ठरली असे ही मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. आधी ज्येष्ठ भगिनी आणि माजी मंत्री, राष्ट्रीय नेत्या सुषमा स्वराज यांचे आपल्यातून जाणे आणि आता अरूण जेटली यांच्या निधनाने राष्ट्र दोन अनमोल व्यक्तिमत्त्वाच्या नेतृत्वाला गमावून बसले आहे असेही मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

-----०००-----

झंझावाती नेतृत्व गमावले - विनोद तावडे

विद्यार्थी दशेपासूनच नेतृत्व, उत्कृष्ट वक्तृत्व असे गुण असेलेले देशाचे माजी केंद्रिय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने एक झंझवाती नेतृत्व गमावला असल्याची भावना सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली.

तावडे आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, अभ्यासपूर्ण युक्तिवादाने भल्याभल्यांना गारद करण्याची शक्ती अरुण जेटली यांच्याकडे होती. उत्कृष्ट वकिल म्हणून ख्याती मिळविणाऱ्या जेटली यांनी विद्यार्थी नेते ते केंद्रीय अर्थमंत्रीपदापर्यंतच्या प्रवासात त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. देश उभारणीसाठी योगदान देणाऱ्या जेटली यांच्या निधनाने अत्यंत अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटूला देश मुकला आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget