मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढीलप्रमाणे मुद्दे मांडले:
काल मी हुतात्मा चौक येथे गेलो होतो. संयुक्त महाराष्ट्रामध्ये ज्यांनी बलिदान दिले, त्यामुळे ही राजधानी आपल्याला मिळाली. ४ दिवसांनी २६ नोव्हेंबर येतोय. तोही एक वेगळा लढा होता. मुंबईत घुसलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांना बहाद्दर पोलिसांनी, NSG कमांडोंनी तिथे जाऊन ठोकून काढले.
ज्या ज्या वेळेला आपण असा लढा दिला त्या लढ्यात आपण यश मिळवलं. कारण आपली जिद्द! एकदा का महाराष्ट्राने काही करायचं ठरवलं की महाराष्ट्र करून दाखविल्याशिवाय राहत नाही. हा आजपर्यंतचा इतिहास आहे आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती कोरोनाबरोबरच्या लढाईमध्ये करायची आहे.
"माझे कुटुंब, माझी जबाबदारी" ही मोहीम आपण राज्यभर राबवली. ती राबवताना आशा व अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, पोलिस, महसूल यंत्रणा आणि काही स्वयंसेवी संस्था यांनी अफाट काम केले आहे. गेल्याही वेळी मी त्यांना धन्यवाद दिले आहे, याही वेळेला धन्यवाद देतो.
तुम्ही सहकार्य करत आहात म्हणूनच आपण ही लाट, तो आकडा खाली आणू शकलो. पण, मी मागेही बोललो होती की दिवाळीनंतर अधिक काळजी घ्यावी लागेल कारण गर्दी वाढली आहे. असं समजू नका की कोरोनाचं संकट नाहीसं झालं आहे. मला थोडी तुमच्यावर नाराजी पण व्यक्त करायची आहे. आजही अनेक जण मास्क वापरत नाहीत.
मी अगदी तळमळीने सांगतोय. पश्चिमात्य देशांत कोरोनाची लाट अधिक गांभीर्याने घेतली गेली आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन केले आहे. दिल्लीत दुसरी-तिसरी लाट आलीए. अहमदाबादमध्ये रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. पहिल्या लाटेशी तुलना केली तर ही दुसरी-तिसरी लाट त्सुनामी आहे की काय अशी भीती वाटते.
आपल्याकडे आरोग्य व्यवस्था, आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. अगदी रुग्णशय्या, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, महसूल यंत्रणा, पोलिस यंत्रणा आहे. पण त्यांना किती राबवून घ्यायचे? त्यांच्यावर किती ताण टाकायचा? गेले ८ महिने ते सतत दिवसरात्र काम करताहेत, अहोरात्र मेहनत करताहेत.
आजपर्यंत हे सिद्ध झालेलं आहे की ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांना सहव्याधी आहेत, त्यांच्यावर कोरोना घातक दुष्परिणाम करतो, त्यांना अधिक घायाळ करतो किंबहुना काहीजणांचे त्यात दुर्दैवी मृत्यू देखील होतात. आताच्या लाटेमध्ये तरुण देखील संक्रमित होत आहेत. तरुणांमुळे ज्येष्ठांनाही लागण होऊ शकते.
आज मी तुमच्यासमोर एवढ्यासाठीच आलो आहे की कृपा करून असं समजू नका की सगळं आता उघडलं म्हणजे कोरोना गेला. आज सुद्धा लस हाताशी आली नाही आहे. काल-परवा मी काही जणांशी बोललो. लस येते येते म्हणतात पण अजूनही हातात काही आलं नाहीए.
आता नवीन गोष्ट लक्षात येत आहे ते म्हणजे पोस्ट कोविड, कोविड होऊन गेल्यानंतरचे दुष्परिणाम. मेंदू, किडनी, पोट, फुफ्फुसे, श्वसन संस्थेवर परिणाम होतात आणि काही जणांना त्याचे नंतर दुष्परिणाम भोगावे लागतात. कशासाठी आपण ही विषाची परीक्षा घ्यायची? का आपण त्याकडे दुर्लक्ष करायचं?
म्हणून तीच त्रिसूत्री महत्त्वाची आहे… मास्क घाला, दोन हात अंतर ठेवा आणि हात धूत रहा. दोन हात, चार हात, जितकं लांब राहता येईल तितकं रहा.
अनावश्यक गर्दी टाळली गेली पाहिजे. आता ऑफिसेस सुरू झाले, सगळ्या गोष्टी सुरू झाल्या तरी अजूनही आपण शाळा नाही उघडू शकलो. निर्णय घेतला आहे पण अजूनही उघडू शकू की नाही हे प्रश्नांकित आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक आजारी असतील तर काय ही सगळी काळजी घेत आपण पुढे जात आहोत.
मला यात काही राजकारण आणायचं नाहीए. हे उघडा, ते उघडा... सगळं उघडतो, जबाबदारी घेता? जेवढी माझ्या जनतेची जबाबदारी सरकारच्या माध्यमातून माझ्यावर आहे तेवढी हे उघडा, ते उघडा म्हणणाऱ्यांवर नाही.
मी अजूनही आपल्याला सांगतो आहे की अनावश्यक ठिकाणी जाऊ नका, आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नका आणि लक्षणे दिसली तर ताबडतोब स्वतःवर उपचार करून घ्या किंबहुना चाचणी जरूर करून घ्या. हे मी आपल्याला अत्यंत तळमळीने सांगतो.
अजूनही वेळ गेलेली नाही आणि पुन्हा वेळ येणार नाही अशी खात्री मला आहे. आपण एका वळणावर उभे आहोत. आज महाराष्ट्राची रुग्णसंख्या कमी करण्यामागे जशी यंत्रणेची मेहनत आहे, तसेच आपले सहकार्य देखील आहे. पण ह्या वळणावर कोणत्या दिशेने जायचे हे आपण ठरवायचे आहे.
आपण सगळेजण जिद्दी आहात. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, साधुसंतांचा महाराष्ट्र जे मनात आणेल ते करून दाखवतो. म्हणूनच मी आपल्याला आपुलकीच्या भावनेने सांगतो आहे, गर्दी टाळा, अनावश्यक ठिकाणी जाणे टाळा, मास्क लावणे विसरू नका, हात धूत रहा, एकमेकांपासून अंतर ठेवा.
पुन्हा आपल्या सांगतो हीच त्रिसुत्री आपल्याला या व्हायरसपासून लांब ठेवू शकते. या धोक्याच्या वळणावर सावध राहण्यासाठी मी आपल्याशी संवाद साधला आहे. आपले हे महाविकास आघाडीचे सरकार जे जे शक्य असेल ते पूर्ण, पूर्ण आणि पूर्ण करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे वचन मी आपल्याला देतो.
आजपर्यंत जे सहकार्य आपल्याकडून मिळाले, तशाच सहकार्याची यापुढेही अपेक्षा करून तूर्त मी आपली रजा घेतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र!
टिप्पणी पोस्ट करा