मुंबई : आखाती व इतर देशांमधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांना विलगीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सांताक्रुज (पूर्व) येथील हॉटेल साई इनची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व उप महापौर अँड. सुहास वाडकर यांनी आज दि. १७ फेब्रुवारी २०२१ रोजी आकस्मिक पाहणी केली. यावेळी हॉटेलमधून चार प्रवासी पळून गेल्याचे निदर्शनास येताच या चार प्रवाशांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा विलगीकरणामध्ये ठेवणे तसेच हॉटेल मालकावर व संबंधित प्रवाश्यांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.
महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना यावेळी म्हणाल्या की, संबंधित हॉटेलच्या पाहणी दरम्यान चार प्रवासी येथून पळून गेल्याचे निर्दशनास आले आहे, ही बाब अत्यंत गंभीर असून याबाबत संबंधित प्रवासी व हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश संबंधित महापालिका अधिकारी व पोलिसांना दिले असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. त्यासोबतच कुठल्याही परिस्थितीत या चार प्रवाश्यांना शोधून त्यांचे विलगीकरण करणे अत्यावश्यक असून त्यांचा तातडीने शोध घेण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले.
बाहेर देशांमध्ये कोरोनाची स्थिती भयंकर असून त्यानंतरही प्रवासी अश्याप्रकारे वागून हॉटेलमालक त्यांना सहकार्य करत असेल तर ही चिंतनीय बाब आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना अवगत करून संबंधित सर्व हॉटेल मालकांना सक्त ताकीद देण्याचे निर्देश देणार असल्याचे महापौरांनी सांगितले. महापालिका कर्मचाऱ्यांनी संबंधित प्रवाश्यांना हॉटेलमध्ये सोडल्यानंतर या प्रवाश्यांची संपूर्ण जबाबदारी ही हॉटेल मालकावर असते. घडलेल्या प्रकाराबाबत हॉटेल मालकाने संबंधित पोलिस स्टेशन व महापालिकेला कळविणे गरजेचे होते, परंतु त्यांनी कुणालाही कळविले नाही, असे महापौर यावेळी म्हणाल्या. पळून गेलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांपासून इतर जण बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नसून या प्रकारचे धाडस कोणीही करू नये, यासाठी संबंधितांवर कडक कारवाई करणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.
*******
टिप्पणी पोस्ट करा