अग्निशमन दलात कंत्राटी वाहनचालकांच्या नियुक्तीचा वाद चिघळला
कामगार संघटनांनी कामगार उप आयुक्त आणि महापौरांकडे घेतली धाव
मुंबई : मुंबई अग्निशमन दलात 54 कंत्राटी वाहन चालक घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर झाला असला तरी खासगीकरणा विरोधात कामगार संघटनांनी महापौर आणि कामगार उप आयुक्तांकडे धाव घेतली.
दरम्यान, अग्निशमन दलात कंत्राटी वाहन चालक घेण्यास महापौरांनी स्थगिती दिली आहे.
कामगार उप आयुक्त सुनीता म्हैसकर यांच्याकडे मंगळवारी मुंबई फायर सर्व्हिसेस युनियन आणि मुंबई अग्निशमन दल यांच्यात बैठक पार पडली. पुढील बैठक येत्या 2 मार्च रोजी पुन्हा होणार आहे.
तर मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे आयोजित बैठकीत मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनाचे पदाधिकारी आणि अग्निशमन अधिकारी उपस्थित होते, पण प्रमुख अग्निशमन अधिकारी उपस्थित नसल्याने पुढील बैठक येत्या आठ ते दहा दिवसांत पुन्हा बोलवली जाणार आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
अग्निशमन दलात 54 कंत्राटी वाहन चालक घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर झाला असला तरी या प्रस्तावाला महापौरांनी स्थगिती दिलेली आहे, असे मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनाचे सरचिटणीस बाबा कदम म्हणाले. आमचा कंत्राटी करण्याला विरोध आहे आणि पुढील बैठकीत आम्ही आमची बाजू मांडून कंत्राटी करून होऊ देणार नाही, अशी आमची कायमस्वरूपी भूमिका राहील, असे बाबा कदम यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कामगार उप आयुक्त यांच्याकडे झालेल्या बैठकीत अग्निशमन अधिकारी यांनी सांगितले की, पदोन्नतीचे रिक्त आरक्षण पदे मिळत नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी वाहन चालकांची पदे भरली जात आहेत. पण आता राज्य शासनाच्या 18 फेब्रुवारीच्या परिपत्रकानुसार, सेवा जेष्ठतानुसार पदोन्नतीचे पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाल्याची बाजू मुंबई फायर सर्व्हिसेस युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी मांडताना अग्निशमन दलात सुमारे 100 यंत्रचालकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून ते यंत्रचालक पदोन्नतीच्या प्रतिक्षेत असल्याचे सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा