मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी मुंबई सेंट्रल स्थित बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयातील कोविड १९ लसीकरण केंद्रात आज (दिनांक ८ फेब्रुवारी २०२१) कोविड-१९ लस टोचून घेतली. कोविड लस सुरक्षित असून भयभीत होण्याचे कोणतेही कारण नाही. लसीकरणासाठी आवश्यक साठा उपलब्ध असून टप्प्या-टप्प्याने लसीकरण सुरळीतरित्या सुरु आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काकाणी यांनी यावेळी दिली.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह एकूण २१ केंद्रांवर कोविड १९ लसीकरण सुरु आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य सेवकांचे लसीकरण झाल्यानंतर आता दुसऱया टप्प्यामध्ये कोविड आघाडीवर कार्यरत इतर सेवकांचे (फ्रंटलाईन वर्कर्स) लसीकरण सुरु करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नायर रुग्णालयामध्ये अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांना लस देण्यात आली.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना श्री. काकाणी म्हणाले की, कोविड संसर्गाची स्थिती मुंबईमध्ये पूर्णपणे नियंत्रणात आहे. महानगरपालिकेला आतापर्यंत दोन टप्प्यांमध्ये मिळून २ लाख ६५ हजार लसींचा साठा प्राप्त झाला आहे. पहिल्या टप्प्याचा शुभारंभ दिनांक १६ जानेवारी २०२१ रोजी झाल्यानंतर दुसऱया टप्प्यातील फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरणही मुंबईत सुरु झाले आहे. दोन्ही टप्पे मिळून आतापर्यंत ७५ हजार ७५१ जणांना लस देण्यात आली आहे. यात ७२ हजार ३८८ आरोग्य कर्मचारी तर ३ हजार ३६३ फ्रंटलाइन वर्कर्स यांचा समावेश आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा टप्प्या-टप्प्याने जनतेसाठी खुली होत आहे. लोकल सेवा सुरु झाल्यानंतरही मागील आठवडाभरात कोविड संसर्गाची स्थिती नियंत्रणात असून हे चित्र दिलासादायक आहे. असे असले तरी कोरोना आटोक्यात येत आहे म्हणून गाफील राहून चालणार नाही. मास्कचा उपयोग, हातांची स्वच्छता, सुरक्षित अंतर राखणे या निर्देशांचे पालन करणे यापुढेही आवश्यक आहे. महानगरपालिकेने सुरु केलेली जम्बो कोविड उपचार केंद्रं देखील कार्यरत असून प्रशासकीय यंत्रणेने कोविड कामकाजामध्ये अजूनही पूर्वीइतकीच तत्परता राखली आहे, असे काकाणी यांनी आवर्जून नमूद केले. तिसऱया टप्प्यातील लसीकरण सुरु झाल्यानंतर पात्र व्यक्तिंनी लस घ्यावी. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असे आवाहनही काकाणी यांनी अखेरीस केले.
*****
टिप्पणी पोस्ट करा