काँग्रेसला भरघोस निधी
मुंबई : स्थायी समितीच्या निधावाटपात भाजपला कमी निधी देण्यात आला असून महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या काँग्रेसला मात्र भरघोस निधी देण्यात आला आहे, असे मत व्यक्त करत हे निधावाटप मंजूर नसून त्यांनी सर्व नगरसेवकांना निधीचे समान वाटप करण्याची मागणी भाजप प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी केली आहे.
पालिका आयुक्तांनी मागील वर्षीच्या अर्थसंकल्पातील ३०९ कोटी रुपये गोठविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सर्व गटनेत्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे तो निधी नियमित करण्यात आला.
यंदा मात्र आयुक्तांनी ९०० कोटी देण्याचे कबूल करत प्रत्यक्षात ६५० कोटी दिले. मागील वर्षीपेक्षा हा निधी ५० कोटींनी कमी, तर कबूल केल्यापेक्षा २५० कोटींनी कमी झाला. भाजपमुळेच हा निधी कमी झाल्याचा सत्ताधाऱ्यांचा समज आहे. त्यामुळे जाणूनबुजून भाजपला कमी निधी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
स्थायी समितीच्या ६५० कोटी निधीपैकी सर्व नगरसेवकांना प्रत्येकी १ कोटी या प्रमाणे २२७ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारात केलेल्या वाटपात मात्र मोठी तफावत आहे. महापालिकेत शिवसेनेचे ९७ नगरसेवक असून त्यांना २३३ कोटी निधीचे वाटप करण्यात आले. तर भाजपचे ८३ नगरसेवक असून त्यांना ६० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. मात्र कॉंग्रेसचे २९ नगरससेवक असून त्यांना भाजपच्या दीडपट म्हणजे ९० कोटींचा निधी देण्यात आला. राष्ट्रवादीचे ८ नगरसेवक असून त्यांना २१ कोटी, तर समाजवादीचे ६ नगरसेवक असून त्यांना १८ कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे निधावाटपात अन्याय असल्याची भाजपची भूमिका आहे.
---------------------------------------
भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न
स्थायी समिती अध्यक्ष हे कोणत्या एका पक्षाचे नसतात. ते मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असतात. त्या निधीवर सर्व नगरसेवकांचा सारखा हक्क असतो. त्यामुळे सर्व नगरसेवकांना समान निधी मिळायला हवा. सध्याच्या निधीवाटपात शिवसेना नगरसेवकांना साडेतान ते चार कोटी निधी मिळत आहे, तर भाजपच्या नगरसेवकांना दीड ते दोन कोटी निधी मिळत आहे. भाजपला कमी निधी देऊन आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्धीयांची कोंडी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे.
--भालचंद्र शिरसाट, प्रवक्ते, भाजप
टिप्पणी पोस्ट करा