भाटिया बागमध्ये बसविण्यात आलेल्या ट्रॉमचे महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई : ब्रिटिश काळात परिवहन सेवेमध्ये महत्त्वपूर्ण मानबिंदू असलेली पुरातन ट्रॉम मुंबईकरांना आता पुन्हा बघता येणार आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल समोरील भाटिया बाग उद्यानामध्ये ही ट्रॉम बसविण्यात आली आहे. या ट्रॉमचे लोकार्पण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आज दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ रोजी पार पडले. याप्रसंगी उप महापौर ऍड. सुहास वाडकर, स्थानिक नगरसेविका सुजाता सानप, उपायुक्त (परिमंडळ -१) हर्षद काळे, "ऐ" विभागाच्या सहाय्यक आयुक्त चंदा जाधव तसेच संबंधित महापालिका अधिकारी उपस्थित होते.
तत्पूर्वी, महापौर किशोरी पेडणेकर यांनी "ऐ" विभागातील वॉररूम, आपत्कालीन कक्ष तसेच नागरी सुविधा केंद्राची पाहणी केली. वॉररूमच्या माध्यमातून "ऐ" विभागातील कोरोना रुग्णांची सद्यस्थिती महापौरांनी जाणून घेतली. त्याचप्रमाणे नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून महसूल कशा पद्धतीने गोळा करण्यात येत आहे, याचाही आढावा महापौरांनी यावेळी घेतला. तसेच आपत्कालीन कक्षाला भेट दिल्यानंतर आपत्कालीन घटनांप्रसंगी वापरण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीचा आढावा महापौरांनी यावेळी घेतला.
महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता तसेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी गर्दी न करण्याचे केलेल्या आवाहनानुसार अत्यंत मोजक्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. मुंबईचे गतवैभव मुंबईकरांना पुन्हा अनुभवता यावे या हेतूने बृहन्मुंबई महानगरपालिकेने "बेस्ट" कडून ही ट्रॉम घेऊन भाटिया बागमध्ये बसविण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या "ऐ" विभागाच्या वतीने या ट्रॉमचे नूतनीकरण व सुशोभिकरण करण्यात आले असून नागरिकांना बाहेरून ही ट्रॉम बघता येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. तसेच या ट्रॉमध्ये संपूर्ण प्रकाशयोजना करण्यात आली असून त्याचे देखणे स्वरूप आता यापुढे मुंबईकरांना अनुभवता येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
सदर ट्रॉम सामान्य जनतेला पाहता यावी यासाठी मार्गदर्शन करणारे "बेस्ट" संग्रहालयाचे संचालक यतीन पिंपळे यांचा महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच संबंधित महापालिका अधिकाऱ्यांचे महापौरांनी यावेळी विशेष कौतुक केले.
टिप्पणी पोस्ट करा