मुंबई: भाजपाचे नगरसेवक आणि पालिकेतील उपनेते विनोद मिश्रा यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपल्याला मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे भाजप विकास कामांच्या आड येत आहे. आम्ही मतदार संघात चांगली कामे करत आहे. ते त्यांना पाहवत नाही. भाजपचा शिवसेनेला बदनाम करण्याचा डाव असल्याचे वक्तव्य सोमवारी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पत्रकार परिषदेत केले.
७०० कोटींच्या निधी पैकी विरोधी पक्षांना ४०० कोटी देण्यात आला आहे. तर शिवसेनेला ३०० कोटी निधी मिळाला आहे. परंतु त्यांच्या पक्षाने विनोद मिश्रा यांना किती निधी दिला, हे पाहणे आमचे काम नाही. जर त्यांना निधी मिळाला नसेल तर तो त्यांच्या पक्षाचा अंर्तगत प्रश्न आहे, असे जाधव म्हणाले.
माझ्या २०९ वॉर्डातील निधीचा विषय वारंवार काढून डिवचण्याचे भाजप काम करत आहे. मी घेतलेला निधी सर्वसामांन्य लोकांच्या हितासाठी आणि गरजुंसाठी वापरला आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेला टार्गेट करू नये. मी त्यांची माफी मागावी,असे त्यांनी म्हटले आहे. परंतु माफी मागण्याचा प्रश्नच नाही, असे ते म्हणाले.
विनोद मिश्रा यांनी माझ्यात आणि त्यांच्यात मोबाईल संभाषण झाले असल्याचे आणि मी त्यांना संदेश पाठवून धमकी दिल्याचे आरोप केले आहेत. मी ते आरोप फेटाळून लावतो. खोटेनाटे आरोप करून शिवसेनेला बदनाम करण्याचा त्यांचा डाव आम्ही शिवसैनिक हाणून पाडू, असा जाधव यांनी इशारा दिला.
टिप्पणी पोस्ट करा