मुंबई : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आज एका विशेष आढावा व नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी देखील मार्गदर्शन केले. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीला महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याचे ज्येष्ठ अधिकारी, मनपा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर मंडळी, महापालिका क्षेत्रातील विविध खासगी रुग्णालयांचे व वैद्यकीय प्रयोग शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
..
सध्याच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोविड संशयितांची वैद्यकीय तपासणी, तपासणी अहवाल, लक्षणे असलेल्या व लक्षणे नसलेल्या रुग्णांचे व्यवस्थापन, रुग्णालयातील खाटांची उपलब्धता व व्यवस्थापन, विलगीकरण विषयक बाबी, जम्बो कोविड सेंटर, वॉर्ड वॉर रुम, सील्ड इमारती इत्यादी कोविडशी संबंधित विविध विषयांवर कोविड नियंत्रणाच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली. या अनुषंगाने चर्चिले गेलेले महत्त्वाचे मुद्दे व संबंधित आदेश पुढीलप्रमाणेः-
..
१. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या व्यक्तिंना कोविड संबंधी लक्षणे आहेत, त्यांनी आपली वैद्यकीय चाचणी निर्धारित केलेल्या ठिकाणी अगर खासगी वैद्यकीय प्रयोग शाळांकडून आवर्जून करवून घ्यावयाची आहे.
२. सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांना यापूर्वीच देण्यात आलेल्या सुचनांनुसार कोविड बाधितांच्या वैद्यकीय चाचणीचे अहवाल हे प्रथम बृहन्मुंबई महानगरपालिकेला कळविणे बंधनकारक आहे. तसेच बाधित व्यक्ती रुग्णालयात दाखल असल्यास, अशाप्रकरणी सदर चाचणी अहवाल बृहन्मुंबई महानगरपालिकेसह संबंधित रुग्णालयास कळविण्याची सवलत पूर्वीप्रमाणेच कायम आहे.
३. बाधित रुग्णांच्या वैद्यकीय चाचणीचे अहवाल हे चाचणी केल्यापासून २४ तासांच्या आत बृहन्मुंबई महानगरपालिकेला कळविणे, तसेच याबाबतची माहिती संबंधित संकेतस्थळावर देखील तात्काळ अपलोड करणे बंधनकारक आहे.
४. कोविड खाटांची संभाव्य गरज लक्षात घेऊन महापालिकेच्या सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या कार्यक्षेत्राच्या दृष्टीने आवश्यक ते सर्व नियोजन तातडीने व सुव्यवस्थितप्रकारे करावे. हे नियोजन करताना आय. सी. यू. खाटा, ऑक्सिजन खाटा, रुग्णवाहिका, मनुष्यबळ, औषधोपचार विषयक सामुग्री इत्यादी सर्व संबंधित बाबींचेही सूक्ष्मस्तरीय नियोजन करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकी दरम्यान दिले.
५. ज्या व्यक्तिंना कोविड बाधा असल्याचे निष्पन्न झाले आहे परंतु, ज्यांना कोविडची कोणतीही लक्षणे नाहीत, अशा लक्षणे नसणा-या रुग्णांचे गृह किंवा संस्थात्मक विलगीकरण तात्काळ करणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरुन अशा रुग्णांपासून इतरांना कोविड बाधा होणार नाही.
६. गृह विलगीकरणात असलेल्या व लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या हातावर विलगीकरणाचे ठसे उमटविणे बंधनकारक आहे. असे रुग्ण सार्वजनिक परिसरात किंवा घराच्याबाहेर वावरताना आढळल्यास त्यांच्याविरोधात ‘एफआयआर’ दाखल करावा.
७. गृह विलगीकरणात असलेले व लक्षणे नसलेले रुग्ण हे घरातच असल्याची खातरजमा करण्यासाठी ‘वॉर्ड वॉर रुम’ द्वारे दररोज ४ वेळा रुग्णांना दूरध्वनी करावेत व त्यांना घरातच राहण्याविषयी पुन्हा-पुन्हा सूचना द्यावी. या अनुषंगाने रुग्णाच्या घरी लॅण्डलाईन दूरध्वनी असल्यास त्यावर प्राधान्याने संपर्क साधावा.
८. कोविड बाधा असलेल्या व लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करावयाची कार्यवाही ही महापालिकेच्या संबंधित विभागाच्या ‘वॉर्ड वॉर रुम’द्वारेच करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सर्व रुग्णालयांनी आपापल्या रुग्णालयातील कोविड खाटांच्या उपलब्धतेची माहिती ही नियमितपणे ‘वॉर्ड वॉर रुम’कडे कळवावयाची आहे. जेणेकरुन, ‘वॉर्ड वॉर रुम’च्या स्तरावर खाटांचे व्यवस्थापन करणे अधिक सुलभ होईल.
९. महापालिका क्षेत्रातील इमारतींच्या पदाधिका-यांना कोविड विषयक व्यवस्थापनात सहभागी करुन घ्यावे. यामध्ये प्रामुख्याने विलगीकरणात असलेल्या व्यक्तिंचे अधिकाधिक प्रभावी विलगीकरण साध्य करणे, विलगीकरणात असलेल्या व्यक्तिंना व कुटुंबियांच्या दैनंदिन गरजांबाबत व्यवस्थापन करणे आदी बाबींचा समावेश करता येईल.
१०. ज्या इमारतींमध्ये ५ पेक्षा अधिक कोविड बाधित रुग्ण आढळून येतील, अशा इमारती सील कराव्यात.
११. विवाह सोहळे, जिमखाना/क्लब, नाईट क्लब, उपहारगृहे, चित्रपट गृह, सर्व धार्मिक स्थळे, खेळाची मैदाने, उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल, खासगी कार्यालये आदी सर्व ठिकाणी मास्कचा वापर प्रत्येकाने करणे बंधनकारक आहे. विवाह सोहळा, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम यामध्ये जास्तीत जास्त ५० व्यक्ती सहभागी होण्यास परवानगी आहे. सर्व चित्रपट गृह/ नाट्यगृह, उपहारगृह आणि खाजगी कार्यालय यामध्ये त्यांच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के व्यक्तींना परवानगी असेल. समारंभ/कार्यक्रम, खासगी कार्यालये आदी ठिकाणी या मर्यादांचे उल्लंघन केलेले आढळून आले आणि त्या ठिकाणी मास्कचा वापर होत नसल्याचे आढळले तर संबंधित व्यक्तींना दंड आकारण्यात येईल तसेच संबंधित आस्थापना/व्यवस्थापन यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
१२. कोविडशी संबंधित काही प्रलंबित बाबी असल्यास त्या याच आठवड्यात मार्गी लावाव्यात, असेही आदेश आजच्या बैठकी दरम्यान महापालिका आयुक्तांनी सर्व संबंधीतांना दिले.
===
टिप्पणी पोस्ट करा