मुंबई : वरळीतील माता रमाई आंबेडकर स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या संपूर्ण विधीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार असून याची लिंक तयार करून ही लिंक महापालिकेच्या पोर्टलवर टाकण्यात येणार आहे. जेणेकरून एखाद्या अंत्यसंस्काराच्या वेळी कोणी नातेवाईक परदेशातून अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकला नाही तर या लिंकच्या माध्यमातून अंत्यसंस्काराचा विधी ते परदेशात बसून बघू शकतील, अश्या प्रकारची नियोजन करणारी ही पहिली स्मशानभूमी राहणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील भागोजी किर तसेच वरळी येथील माता रमाई आंबेडकर स्मशानभूमीची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी पाहणी करून पहिल्या टप्प्यातील कामाचा संबंधित महापालिका अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
याप्रसंगी जी/दक्षिण विभागाचे प्रभाग समिती अध्यक्ष दत्ता नरवणकर तसेच जी / उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिगावकर, जी /दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे, अभिजीत पाटील तसेच संबंधित महापालिका अधिकारी उपस्थित होते.
महापौर किशोरी पेडणेकर यावेळी म्हणाल्या की, भागोजी किर यांच्या स्मारकाचे नूतनीकरण करण्यात येत असून हे काम चांगल्या दर्जाचे करण्याची सूचना करण्यात आलेली आहे. त्यासोबतच लगतच्या चैत्यभूमीच्या परिसराची पाहणी करून हा परिसरसुद्धा अधिक सुशोभित करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना दिले.
त्यासोबतच भागोजी किर स्मशानभूमीसाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीमधून अंतर्गत सुविधा अधिक चांगल्या व दर्जेदार कश्या देता येईल, याबाबतचे नियोजन करण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले.
वरळीतील माता रमाई आंबेडकर स्मशानभूमीची पाहणी केल्यानंतर महापौर म्हणाल्या की, मुंबईतील सर्वात मोठ्या स्मशानभूमीपैकी एक असलेली ही स्मशानभूमी असून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या साडेनऊ एकर जागेमध्ये ही व्यापलेली आहे. सामाजिक संस्थेच्या वतीने तीन टप्प्यांमध्ये स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम करण्यात येत असून पहिल्या टप्प्याचे काम सद्यस्थितीत वेगाने सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले. या स्मशानभूमीत आठ विद्युतदाहिनी राहणार असून प्राथमिक सोयी सुविधांनी सुसज्ज अशी ही स्मशानभूमी राहणार आहे.
त्यासोबतच अंत्यसंस्कारापूर्वी करण्यात येणारा प्रार्थनेसाठी याठिकाणी प्रार्थनास्थळसुद्धा विकसित करण्यात येणार असून या ठिकाणी बसून प्रार्थना करणे सोयीचे होणार असल्याचे महापौरांनी सांगितले. रुंद रस्ते,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच स्वच्छता तसेच पूरक व्यवस्था यावर विशेष भर देण्यात आला असून लगतच्या परिसरामध्ये नक्षत्र उद्यान सुद्धा विकसित करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
आगामी अडीच ते तीन वर्षांमध्ये हे संपूर्ण काम पूर्ण होणार असून अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज अशी ही स्मशानभूमी तयार करण्यात येणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा